औरंगाबाद जिल्हा

औरंगाबाद जिल्हा

महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असून औरंगाबादला मराठवाड्याचे द्वार संबोधले जाते. औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला जळगाव जिल्हा आहे. तसेच पूर्वेला जालना जिल्हा असून दक्षिणेला बीड व नगर जिल्हा तसेच पश्चिमेला नाशिक हा जिल्हा आहे.

दृष्टीक्षेपात औरंगाबाद

एकूण भौगोलिक क्षेत्रफळ १०,१३०.८९ चौकिमी
२०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ३७,०१,२८२
ग्रामीण लोकसंख्या २०,८१,११२
एकूण तालुके ०९
एकूण गावे १३५६
एकूण ग्रामपंचायती ८६१
एकूण सरासरी पर्जन्यमान ७२५.८ मिमी

जिल्ह्यातील तालुके
औरंगाबाद जिल्ह्यात ९ तालुके आहेत. तसेच या ९ तालुक्यांमध्ये एकूण १३४४ गावे आहेत.

तालुके पिन कोड
औरंगाबाद ४३१००१
खुलताबाद ४३११०९
सोयगांव ४३११०३
सिल्लोड ४३११०१
गंगापुर ४३११०७
कन्नड ४३११११
फुलंब्री ४३१११२
पैठण ४३११२०
वैजापूर ४२३७०१
AurangabadDistrict

soygaon sillod kannad phulambri khultabad vaijapur gangapur aurangabad paithan

 

इतिहास

सन १६१० मध्ये निजामशहाचा सरदार मलिक अंबर याने हे शहर खडकी या नावाने स्थापन केले. पुढे मलिक अंबर चा मुलगा फतेह खान याने शहराचे खडकी हे नाव बदलून फतेहनगर असे नामकरण केले. सन १६३३ मध्ये मुघलांनी निजामशाहीचा पराभव करून फतेहनगरवर ताबा मिळविला. सन १६५३ मध्ये औरंगजेब फतेहनगरचे औरंगाबाद असे नामकरण करून औरंगाबाद शहराला राजधानी म्हणून घोषित केले. औरंगाबादला दरवाजांचे शहर म्हटले जाते. मुघल बादशहा औरंगजेब याने आपली राजधानी औरंगाबाद येथे आणली त्यावेळी ५४ रस्ते भिंतीच्या सहाय्याने जोडण्यात आले.

मराठ्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून सन १६८२ मध्ये मोठी भिंत बांधली गेली. या भिंतीला मुख्य आणि उपमुख्य असे एकूण ५४ दरवाजे बनविण्यात आले. त्यापैकी काही दरवाजे सध्या अस्तित्वात असून काही दरवाजे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी १४ नहरी बांधल्या त्यातील दोन नहरी अजून चालू आहेत. औरंगजेब त्याच्या मृत्युपर्यंत औरंगाबाद येथेच राहिला. औरंगजेबाच्या मृत्युनंतर औरंगाबाद शहर, हैदराबाद निजामाच्या राजवटीत सामिल झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद हे निजामाकडून मुक्त झाले. १ नोव्हेंबर १९५६ रोजी औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाडा हा विभाग हैदराबाद राज्यातुन तत्कालीन बॉम्बे राज्यात विलीन झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद महानगरपालिका, बीबी का मकबरा, दौलताबाद येथील देवगिरी किल्ला, पानचक्की, बुध्द लेणी, मुघलकालीन एकूण ५२ दरवाजे, इ. आहेत तर सोयगाव तालुक्यातील अजिंठा गावात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे आणि खुलताबाद तालुक्यातील वेरूळ गावात जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, पैठण येथे संत एकनाथ महाराजांचे समाधीस्थळ, जायकवाडी धरण याच जिल्ह्यात आहेत. हा भारतातील एकमेव जिल्हा आहे, ज्यात २ जगप्रसिद्ध हेरिटेज वास्तू (अजिंठा लेणी व वेरूळ लेणी) आहेत. जिल्ह्यातील पैठण हे ऐतिहासीक शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच जिल्ह्यातील हिमरू शाल प्रसिद्ध आहे.

औरंगाबाद येथे संक्रांतीला पतंगबाजी रंगते. येथील पतंग देशभरात उडविले जातात. येथील पतंगांचे वैशिष्ट्य म्हणजे हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यात आकाशात चांगल्या प्रकारे उडू शकतात.

जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या ३७.०१ लाख इतकी आहे.

जिल्ह्यातील प्रमुख पीके- कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू

जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, तापी, पूर्णा

२०११ च्या जनगणनेनुसार, जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ४३.८% लोकसंख्या शहरी भागात राहत असून ४५.२% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. जिल्ह्याचे पुरुष:महिला प्रमाण हे १०००:९२३ असून ते राज्याचे पुरुष:महिला प्रमाण १०००:९२९ पेक्षा कमी आहे. जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण ७९% असून पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण हे ८७.४% आहे व महिलांचे साक्षरतेचे प्रमाण हे ७०.१% आहे.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

  • अजंठा – वेरूळ लेण्या : ५ व्या – ८ व्या शतकात गुफेत साकारलेल्या लेण्या
  • दौलताबाद किल्ला : मोहम्मद तुघलकाची राजधानी
  • खुलताबाद : मुघल बादशहा औरंगजेबाची कबर
  • बीबी का मकबरा : बेगम राबीयाची (बादशहा औरंगजेबाच्या पत्नीची) कबर
  • घृष्णेश्वर मंदीर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक (बारावे ज्योतिर्लिंग)
  • पाणचक्की
  • पैठण : संत एकनाथ यांचे गाव
  • जायकवाडी धरण : नाथसागर
  • औरंगाबाद गुफा आणि औरंगाबाद लेणी
  • ५२ दरवाजे

Check Also

सांगली जिल्हा

सांगली जिल्हा प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी …

Leave a Reply