Amazon Big Sell

चाकण किल्ला

पुण्यापासून २० मैलावर वसलेले चाकण पूर्वीचे खेडेगाव तर सध्याचे वाहन उद्योगाने प्रचंड विस्तारते शहर. चाकण मध्ये दोन्ही पैकी कुठल्याही वेशीतून प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही अंतरावर जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरून चालत आल्यास भग्नावस्थेतील तटबंदी दिसू लागते. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चाकण गावात संग्रामदुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे. इतिहासाची पाने डोळयासमोर फडफडविनारा चाकणचा भुईकोट संग्रामदुर्ग किल्ला आणखी काही वर्षांनी येथे होता असे सांगण्याची वेळ येणार हे निश्चित आहे.

याबाबत शासनाने योग्य उपाय योजना करून संवर्धनासाठी खरेखुरे प्रयत्न करावेत अशी माफक अपेक्षा दुर्गप्रेमी, इतिहास संशोधक व येथील नागरिक करीत आहेत.

शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाही नोकरी सोडुन स्वराज्यात सामिल झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा; स्वराज्यात येताना ते एकटेच नाही आले, तर चाकण सारखा अतिशय देखणा आणि मजबुत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला. शिवरायांसारखा रत्नपारखी राजा, त्यांनी ह्या अलौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामिलच करुन घेतले नाही तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारीपण बहाल केली. स्वराज्यात आलेले फिरंगोजी, परत जाताना स्वराज्याचा नेक, विश्वासू सहकारी हि पदवी, किल्लेदारीची वस्त्रे आणि प्रेमानी उचंबळुन भरुन आलेला ऊर संगाती घेऊन शिवरायांकडून चाकणकडे परतले. स्वराज्यावर एकापेक्षा एक भीषण संकटे येऊनसुद्धा फिरंगोजीनी चाकण आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, सजवला आणि अतिशय मेहेनतीने राखला.

मुघल बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शाहिस्तेखान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला. या भुईकोट दुर्गाला २१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला. खरं तर फार फार उमेदीने आणि प्रचंड सैन्यानिशी हा खान दख्खनेत आला होता. संग्रामदुर्गात फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती. संग्रामदुर्ग म्हणजे खूप भक्कम दुर्ग नव्हे. आधीच तो स्थलदुर्ग; पण खांद्काने वेढलेला. त्यामुळे थोडी बळकटी आलेला. खडकात पाणीही होते, शिवाय दिवस पावसाचे होते.

हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला; तोफा – बंदुकांचा काही उपयोग होत नाही, हे पाहिल्यावर शाहिस्ते खानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची आज्ञा केली. ताबडतोब कामाला सुरवात झाली. हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते. आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती, तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग निकामी करता आले असते. ३००-३५० मावळ्यांनिशी फिरंगोजी नरसाळ्याने चाकण झुंजवत ठेवला होता.

अखेर १४ ऑगस्ट १६६० या दिवशी मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली. पूर्वेकडील कोपऱ्याचा बुरुज अस्मानात उडाला. त्यावरचे मराठेही हवेत उडाले. आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले. फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली. तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. दुसऱ्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मोघलीसैन्याने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. मावळ्यांचे साहस पर्व कडू घोट घेत संपले.

चाकणच्या किल्ल्याचा एक टवका उडवायला एवढा संघर्ष करावा लागल्याने खानाच्या तोफांचा प्रचंड मारा सहन करतानाही, संग्रामदुर्ग किल्लाही खाना कडे पाहून तेंव्हा खदाखदा हसला असेल, पण आता मात्र शासनाच्या अनास्थेने ढसाढसा रडत असेल.

माहिती २०१२ च्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने या किल्ल्याच्या संवर्धनासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात यास एक वर्षाचा कालावधी लोटूनही किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामास सुरुवात झालेली नाही.

Asha Transcription

Check Also

रोहिडा किल्ला

Rohida Fort Rohida Fort : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. …

Leave a Reply