ताडोबा राष्ट्रीय उद्यान

ताडोबा राष्ट्रीय उद्यान

ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्हयात आहे. याची स्थापना १९५५ साली झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात आढळणार्‍या मगरी-सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे.

अलीकडेच याचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तीकरण होऊन त्याचे नाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ ११६ चौ.कि.मी. इतके आहे आणि इथले जंगल ५०९ चौ.कि.मी. एवढे आहे.

आजमितीस(सप्टेंबर २०११) अभयारण्यातील रानगव्यांची संख्या १४३ आहे. गवे आणि मगरी-सुसरी येथील प्रमुख आकर्षण आहेतच, त्याचबरोबर व्याघ्रप्रकल्पामुळे वाघांचे आकर्षणही वाढले आहे. सध्या उद्यानात ५० वाघ आहेत. त्याबरोबर बिबट्या , अस्वल , जंगली कुत्री अथवा कोळसून , तरस , उदमांजर आणि विविध प्रकारच्या रानमांजरी. हरणांच्या जातीत, नीलगाय , सांबर , चितळ , भेकर, कोल्हे, चौशिंगा, ससे व खास विदर्भात आढळणारी पिसुरी नावाची हरणाची अतिशय छोटी जात येथे आढळून येते

इथे जवळजवळ १८१ जातींचे पक्षी पाहता येतात. मच्छिमार, गरुड, करकोचे, बगळे, ससाणे, रानकोंबड्या, धनेश, भृंगराज, रॉबिन गोल्डन ओरिओल, भारद्वाज, मोर हे त्यापैकी काही.

ताडोबा जंगल हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. साग, बांबू, ऐन, हलई, धावडा, बिबळा, तेंदू, मोहा, खैर अशा विविध प्रकारच्या वृक्षांची या अरण्यात दाटी दिसते.आपली सृष्टी आपले धन भाग.

पाणी

ताडोबा, मोहर्ली व कोळसा अशा तीन वनपरिक्षेत्रात एकूण छोटे मोठे अनेक तलाव आहेत. त्यांपैकी ताडोबा, कोळसा, जामणी, पांगडी, कारवा, पिपरहेटी, बोटझरी, पिपरी, तेलीया, महालगाव, मोहर्ली, जामून झोरा, शिवणझरी, फुलझरी, आंभोरा हे महत्त्वाचे तलाव आहेत.

अंधारी नदीला ताडोबाची जीवनवाहिनी अर्थातच लाईफ लाईन ऑफ ताडोबा असे म्हटले जाते. खातोडा गेट जवळील नाला म्हणजे या नदीचे जन्मस्थान आहे. ही नदी मोहर्ली, कोळसा, मूल मार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते. या नदीमुळे ताडोबातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना नवसंजीवनी मिळाली असून ही नदीच या प्रकल्पातील पाणवठ्याचे मुख्य उगमस्थान आहे. अंधारी नदीच्या प्रवाहात वाघडोह, मोहाचा खड्डा, कळंबाचा डोह, उमरीचा पाटा, तुलाराम हे पाणवठे आहेत.

या प्रकल्पातील वन्यजीवांची तहान भागविणारे अनेक छोटे मोठे नालेसुद्धा आहेत. यात उपाशा नाला, जामून झोरा, तेलीया डॅमचा प्रामुख्याने समावेश आहे. कोसेकणार, आंबट हिरा, काटेझरी, काळा आंबा, चिखलवाही, सांबर डोह, कासरबोडी, जांबून झोरा, आंबेडोह बंधारा, चिचघाट, आंबेगड, गिरघाट, वसंत बंधारा हेही वॉटर होल ताडोबा जंगलात आहेत.

संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असाही आहे. फार पूर्वी या जंगलात हत्तींचे वास्तव्य जास्त असावे व त्यावरूनच ‘नागझिरा’ असे नाव या अभयारण्यास पडले असावे. तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा यांच्या मधोमध असलेले नागझिरा अभयारण्य १५२.८१ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले आहे. या अभयारण्याची विशेषता म्हणजे यात विद्युत पुरवठा अजिबात नाही, हे जंगल नैसर्गिकच राखले गेलेले आहे.

यात सुमारे २०० च्या जवळपास पक्षांची नोंद करण्यात आली आहे. इतर अभयारण्यांच्या मानाने छोट्या अशा अभयारण्यात वाघासमवेतच बिबळा, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर, ऊदमांजर, ताडमांजर, उडणखार, सर्प गरुड, मत्स्य गरुड, टकाचोर, खाटीक, राखी धनेश, नवरंग, कोतवाल इत्यादी अनेक प्राणी व पक्षांची नोंद निसर्गप्रेमींनी घेतली आहे.

या सोबतच नजीक असलेली स्थळे कोसमतोंडी, चोरखमारा,अंधारबन, नागदेव पहाडी इत्यादी प्रेक्षणीय आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या भंडारा शहरापासून सुमारे ४० कि. मी. अंतारावरील साकोली गावापासून अंदाजे २२ कि. मी. अंतरावर एकीकडे नागझिरा अभयारण्य असून दुसरीकडे सुमारे ३० कि. मी. अंतरावर नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे.

नागझिरा वन्यजीव अभयारण्यात जाण्यासाठी ‘पिटेझरी’ व ‘चोरखमारा’ अशी २ गेटे आहेत. अभयारण्यात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा अनेक हरणेण गवतामध्ये शांतपणे चरताना दिसतात.. पावलागणित दिसणारी हरिणे आणि त्यांच्या आजूबाजूला हुंदडणारी माकडे हे दृश्य मन मोहून टाकते. येथे ऐन, साग, बांबू, आवळा, बिब्बा, धावडा, तिवस, सप्तपर्णी यांसारखे असंख्य वृक्ष आहेत. अभयारण्यात गवताळ कुरणे मुबलक प्रमाणात असल्याने नीलगाय तसेच सांबर, चितळ, भेकर आणि गव्यांसारखे शेकडो तृणभक्षी आढळतात. येथे महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल, हळद्या, नीलपंखी, स्वर्गीय नर्तक, नवरंगी, तसेच तुरेवाला सर्पगरुड, मत्स्यगरुड, व्हाईट आईड बझार्ड सारखे शिकारी पक्षी अणि अनेक प्रकारची फुलपाखरे तसेच ठिकठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे कोळी दिसून येतात. येथे हिंस्रक पशूंची संख्यादेखील काही कमी नाही. पट्टेरी वाघाचा नैसर्गिक अधिवास येथे उत्तम आहे. तेथील मार्गदर्शकांच्या सांगण्यानुसार तेथे सुमारे ८-१० वाघ, २०-२२ बिबट्या, जवळपास ५० अस्वले आणि रानकुत्रे मुक्तसंचार करीत असतात.

येथील नागझिरा तलाव अतिशय प्रसिद्ध तितकाच जंगलासाठी महत्वाचा आहे. या जंगलात पूर्वी हत्तींचे वास्तव्य असे. संस्कृतमधील नाग या शब्दाचा अर्थ हत्ती आणि तेथील लोक पाण्याच्या झऱ्याला झिरा असे म्हणत. हत्तींचे आवडते ठिकाण म्हणजे पाणी.. म्हणून या तलावास (नाग~हत्ती आणि झिरा~झरा) ‘नागझिरा तलाव’ असे नाव पडले. व्यंकटेश माडगुळकर यांनी ज्या झाडाखाली बसून त्या काळी लिखाण केले तो कुसुम वृक्ष आजही आपणास तेथे पहावयास मिळतो. या अभयारण्यातील रस्ते पूर्णपणे नैसर्गिक स्वरूपाचे आहेत. येथे वाहन चालवण्याचे नियम अतिशय कडक आहेत. हॉर्न वाजवणे, रस्ता अडेल असे दुहेरी पार्किंग करणे तेथे चालत नाही. अभयारण्याच्या गेट बंद होण्याच्या वेळा अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. लंगूर (माकडे) व हरणांचे अलार्म कॉल्स ओळखून वाघाचा माग काढण्यात येथील मार्गदर्शक अतिशय तरबेज आहेत. हे लोक याच परिसरातील गोंड आदिवासी आहेत. पूर्वी हेच लोक विविध शस्त्रांचा वापर करून प्राण्यांची शिकार करत. तेव्हा हे वन्यजीवच आपल्या उपजीविकेचे साधन आहे, असे त्यांना वाटे. परंतु आज हेच वनवासी ‘वाल्याचे वाल्मिकी’ झाले आहेत. या लोकांमध्ये प्रचंड एकीचे बळ दिसून येते.

येथील मार्गदर्शक व वाहन चालक अतिशय चलाख आहेत.. त्यांची तीव्र निरीक्षण शक्ती, पावलांच्या ठशांवरून घेण्यात येणाऱ्या नोंदी, समयसूचकता ह्या त्यांच्या गुणांमुळे अभयारण्यास भेट देणाऱ्या लोकांना सहजतेने समृद्ध वनसृष्टीचे दर्शन घडते.अशा या जैवविविधतेने नटलेल्या नागझिरा जंगलाला दि. ३ जून १९७० रोजी ‘नागझिरा वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित केले गेले. उष्ण पानगळीचे हे अभयारण्य सध्या १५३ चौ.किमी. क्षेत्रावर वसलेले आहे. येत्या काही वर्षांतच जंगलाचा ६०० चौ.किमी. पर्यंत विस्तार करण्याचा तेथील वनविभागाचा मानस आहे.

नविन नागझिरा अभयारण्य

या नविन नागझिऱ्याच्या क्षेत्रात भंडारा जिल्ह्यातील साकोली,लाखनी यातील काही भाग तसेच, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचा काही भाग याचा समावेश आहे.या परिक्षेत्राला लागूनच नागझिरा अभयारण्य,नवेगाव राष्ट्रीय उद्यान,नवेगाव अभयारण्य आणि कोका अभयारण्य याचे क्षेत्र आहे.या क्षेत्रात १२ तलाव आहेत.ते वन्यजीवांना पोषक आहेत.येथील चांदीटिब्बा या परिसरात वन्य जीवांना पाहण्यासाठी ‘मचाण’ उभारण्यात आले आहे.

विदर्भातील गोंदिया जिल्हयात नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. अंदाजे इ. स. १३०० मध्ये या भागावर गोंड राजांचे राज्य होते. या गोंड आदिवासींचा राजा होता दलपतशाह आणि राणी होती दुर्गावती. या द्रष्ट्या राजदांपत्याने आपल्या प्रजेच्या उदरनिर्वाहासाठी उपयुक्त अशा शेतीचे महत्त्व जाणले होते. परंतु शेतीला लागणाऱ्या पाण्यासाठी लहरी पावसावर अवलंबून राहता येणार नाही हे त्यांनी ओळखले व त्यांनी या भागात विविध ठिकाणी जलाशय व तलाव बांधले. त्यामुळेच भारतातील हा गोंदिया जिल्हा आज ‘तलावांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. इथल्या या तलावांवर अनेक स्थानिक पक्ष्यांबरोबरच स्थलांतरित पक्षीही येतात. या सर्वांत डौलदार अशा सारस पक्ष्याचीही वर्णी लागते. या पाणवठ्यांमुळेच इथले प्राणीजीवनही समृध्द आहे.

आज नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र अभयारण्याचा एक भाग असलेल्या या नवेगाव तलावाने पूर्वी गोंड आदिवासी राज्य त्यानंतर ब्रिटिश राज्य आणि भारताचे स्वतंत्र राज्यही अनुभवले आहे. खूप पूर्वीपासूनच या तलावावर पक्ष्यांचे थवेच्या थवे येतात. जवळच असलेल्या दक्षिण उष्णकटिबंधीय पानगळीच्या जंगलात वाघ, चित्ते, सुस्त अस्वले आणि जंगली बैल असे अनेक वन्यजीव राहतात. या सर्वांसाठी हा तलाव हे एक वरदान ठरले आहे.

इथे तलावाच्या बाजूला असलेल्या ‘संजय कुटीर’ मध्ये राहणे हा एक आगळा वेगळा अनुभव ठरतो. इथल्या खोल्या या झाडांवर असल्यामुळे आपण या घनदाट अरण्याचाच एक भाग होऊन जातो. शहरी गजबजाटापासून दूर अशा निसर्गरम्य वातावरणात मिसळून जातो. इथून अंदाजे २ कि.मी. अंतरावर यूथ होस्टेल आहे. तलावाच्या किनाऱ्याने असंख्य पक्षी आणि पाण्यावर आलेले तहानलेले प्राणी बघत रमतगमत तिथे जाता येते. रात्रीच्यावेळी तर शेकडोंच्या संख्येने लकाकणारे उत्सुक डोळे आपल्याला बघत असतात. हरणांचे हे डोळे निरखणे हा अत्यंत रोमहर्षक अनुभव आहे.

या राष्ट्रीय उद्यानात ‘जंगल सफारी’ ला जाता येते. या जंगलातील प्राणिजगत पाहून कोणीही निसर्गवेडा नि:शब्द होतो. फक्त वाघ किंवा चित्ताच बघण्याच्या आशेने जंगलात जाऊ नका. वाघ दृष्टीस पडला नाही तरी तुमची निराशा होणार नाही कारण हे जंगल इतर अनेक प्राण्यांनी समृध्द आहे. वाघ, चित्ता यासारख्या भक्षक प्राण्याच्या येण्याची खबर इतर छोट्या प्राण्यांकडून मिळते. प्रत्येक प्राण्याचा स्वत:चा असा एक भाग असतो. हा प्राणी इथे आला आहे ही बातमी द्यायला हरणे, सांबर, लंगूर आणि मोरसुद्धा एक विशिष्ट आवाज काढतात. आपण जर नशीबवान असू तर इथे आपल्याला अशा एखाद्या रुबाबदार वाघाचे अथवा चित्त्याचे दर्शन घडते.

छायाचित्रणप्रेमींसाठीसुद्धा नवेगावाचा हा भाग एक आकर्षण ठरतो. महाराष्ट्रात सापडणाऱ्या एकूण पक्ष्यांच्या निम्मे पक्षी नवेगावात हजेरी लावतात. फुलपाखरांच्या अनेक प्रजाती इथे पाहायला मिळतात. त्यामुळेच तुमच्या ‘कॅमेऱ्यासाठी’ इथे मुबलक खाद्य उपलब्ध आहे.

पर्यटकांसाठी विशेष सूचना

नवेगाव दर्शनाचा आनंद तुम्ही कदाचित घेतलाच असेल. परत जाल तेव्हा विदर्भातील प्रसिद्ध संत्री, आंबे, संत्र्याची बर्फी या बरोबरच खोया जिलबीचा आस्वादही जरूर घ्या. इथे हल्दीरामच्या दुकानात मिळणारे, पाहताक्षणी खावेसे वाटणारे अनेक जिन्नस जरूर खाऊन बघा.

भेट देण्याच्या वेळ

ऑक्टोबर १ – जानेवारी ३१ – सकाळी ७ ते संध्याकाळी ६.
फेब्रुवारी १ – जून १५ — सकाळी ७ ते संध्याकाळी ७.
जून १६ – सप्टेंबर ३०.

राहण्याची सोय

M T D C, नवेगाव बांध आणि वनविकास विभागाच्या जागा

हवामान

उन्हाळ्यात कधी कधी तापमान ४००C च्या वर जाते. तर हिवाळ्यात इथे खूप थंडी असते. त्यावेळी गरम कपडे बरोबर न्यावेत.
ऑक्टोबर ते मे या काळात तिथे जाणे उत्तम ठरते. पक्षिनिरीक्षणासाठी नोव्हेंबर ते मार्च हा काळ योग्य आहे.

कसे जाल ?

जवळचे विमानतळ नागपूर येथे आहे. (१५० कि.मी.)
जवळचे रेल्वे स्थानक गोंदिया येथे आहे. (६५ कि.मी.)
जवळचे बस स्थानक नवेगाव येथे आहे. (उद्यानापासून १० कि.मी.)

जवळची ठिकाणे

नागझिरा अभयारण्य (६० कि.मी), इटियाडोह धरण (२० कि.मी.), तिबेटन कॅम्प आणि प्रतापगड (१५ कि.मी.)

Check Also

महडचा वरदविनायक

Varadvinayak Mahad महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ …

Leave a Reply