Amazon Big Sell

तारापूर किल्ला

तारापूर गाव १९’ ५०’ उत्तर अक्षांश व ७२’ ४२’ ३०’ पूर्व रेखांशावर वसले आहे. प्राचीन काळी ते एक बंदर होते. येथे समुद्राच्या काठी पोर्तुगीजांनी भक्कम किल्ला बांधला. तारापूर आणि खाडीपलीकडील चिंचणी या दोन्ही गावांना प्राचीन काळापासून महत्त्व आहे. येथे पारशांची वस्ती मोठय़ा प्रमाणावर होती.

तेराव्या शतकाच्या अखेरीस (इ.स. १२८०) तारापूर गाव माहीमचा बिंब राजा भीम याने नाईकांकडून जिंकून घेतले अशी आख्यायिका आहे. इ.स. १५३३ मध्ये पोर्तुगीजांनी या गावास आग लावून ते जाळले होते. इ.स. १५५६ मध्ये पोर्तुगीजांचा या भागात प्रभाव वाढला आणि ते पोर्तुगीजांच्या दमण राज्यातील एक प्रमुख व सर्वात श्रीमंत जिल्ह्याचे शहर गणले जाऊ लागले. इ.स. १५५९ मध्ये हबशांनी केलेला हल्ला यशस्वीपणे परतवून लावण्यात आला. इ.स. १५८२ आणि त्यानंतर पुन्हा १६१२ मध्ये मुघलांनी केलेले हल्लेसुद्धा पोर्तुगीजांनी परतवून लावले. इ.स. १६३४ मध्ये हे शहर अध्र्या दमण प्रदेशाच्या न्यायाधीशांचे केंद्र होते. येथून तेव्हा या समृद्ध भागातील धान्य वस्तू निर्यात होई. सुरत व दीवशी येथून मोठय़ा प्रमाणावर व्यापार चाले.

किल्ल्याभोवती तटभिंत असून तटभिंतीत गोलाकार बुरूज आहेत. त्याशिवाय किल्ल्यात शिबंदीसाठी घरे, एक चर्च, ख्रिश्चन मिशनरी मठ आणि एक दवाखाना होता. इ.स. १६३४ च्या सुमारास शिबंदीत एक कप्तान, एक नाईक व त्यांना दहा सेवक आणि एक गोलंदाज, एक पोलीस निरीक्षक आणि त्यास चार सेवक, एक दुभाषा, एक लेखनिक, एक मशालजी आणि एक छत्रधारक मुलगा यांचा समावेश होता.

शिबंदीशिवाय किल्ल्यात एक धर्मोपदेशक, ५० पोर्तुगीज, २०० स्थानिक ख्रिश्चन आणि सुमारे १०० गुलाम, उत्तम लढवय्ये, उत्कृष्ट तलवारी, दुर्बिणी आणि तोफाही होत्या. इ.स. १६७० मध्ये ओगिल्बी या शहराचा किनारी शहर म्हणून उल्लेख करतो. तर १६९५ मध्ये जेमेली कॅरेरी हे धर्मोपदेशकाचा मठ आणि फ्रान्सिस्कन रेकोलेट विद्यालयासह उत्तम प्रकारे वसविलेले शहर असा उल्लेख करतो. इ.स. १७२८ मध्ये त्याला फारशी कुमक नव्हती व फक्त साठ सैनिकांचीच शिबंदी होती.

इ.स. १७३९ मध्ये चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने या किल्ल्यावर हल्ला केला, त्यावेळी चार सुरुंग पेरण्यात आले. त्यातील दोन उडाले. त्यांनी बुरुजाला आणि वरील संरक्षक भिंतीला मोठी भगदाडे पाडली आणि बाजीबेराव (बाजी भिवराव), रामचंद्र हरी, यशवंत पवार आणि तुकाजी पवार मराठा निशाण घेऊन भगदाडांत शिरले. पोर्तुगीजांनी त्यांना प्रखर विरोध करून थोपवून धरले. परंतु राणोजी भोसले व त्याचे सैनिक दुस-या बाजूने शिडय़ांच्या साहाय्याने तटभिंत चढले आणि त्यांनी पोर्तुगीजांच्या शिबंदीत फूट पाडली. चिमाजी अप्पा वर्णन करतो की, पोर्तुगीजांचा जरी पराभव झाला तरी ते युरोपियनांसारखे अतिशय धीराने व निकराने शेवटपर्यंत लढले.

हा किल्ला घेताना बाजी भिवराव रेठरेकर हा निधडय़ा छातीचा पराक्रमी मराठा वीर कामी आला. पहिला बाजीराव पेशव्यास याचे खूप दु:ख झाले. बाजीच्या आईच्या सांत्वनासाठी तो पत्रात लिहितो, ‘.. बाजी भिवराव तोंडात गोळा लागून कैलासवासी जाहले. ईश्वर मोठे अनुचित केले. तुम्हास मोठा शोक प्राप्त जाहला. आमचा तर भाऊ गेला.. बाजू गेली, उपाय नाही.’

या युद्धाच्या वेळी खंडोजी माणकर या मराठा हेराने बजावलेल्या कामगिरीबद्दलची एक लोककथा प्रचलित आहे. खाडीत नांगरलेल्या एका फिरंगी जहाजाच्या तांडेलाकडे एक गरीब कासार (खंडोजी माणकर) बांगडय़ांचे गाठोडे पाठीवर लादून किल्ल्यात जाण्यासंबंधी विनंती करीत होता, पण त्या धामधुमीच्या दिवसात असा अनोळखी माणूस तारापूरसारख्या बळकट किल्ल्यात सोडणं योग्य नाही, याचं भान त्या तांडेलास न राहिल्यामुळे त्या कासारास गडात सोडण्यात आले.

या कासाराने किल्ल्यात हिंडून संपूर्ण किल्ला पाहिला व किल्ल्यावर असणा-या सर्व गोष्टी त्याने आपल्या नजरेत टिपून घेतल्या, पण लवकरच त्या कासाराचे सोंग पोर्तुगीजांच्या लक्षात आले व त्यांनी त्यास कैद केले. पण एक माणूस संशयावरून नुसता पोसणे ठीक न वाटल्यामुळे त्या कासाराला गुरांचा गोठा साफ करणे, योग्य वेळ पाहून गुरं चारायला घेऊन जाणे अशी कामे करण्यासाठी गुराख्याच्या हाताखाली ठेवले.

या हुशार कासाराने गुराख्याशी सलगी करून आणि गुराख्याचा वेश परिधान करून तो किल्ल्याबाहेर गुरं चारायला घेऊन गेला असता कळपातील एक गाय मुद्दाम उधळवून तो तिच्या मागे धावत जाऊन मराठय़ांच्या छावणीत पोहोचला आणि त्याने चिमाजी अप्पास किल्ल्यातील गुप्त मार्ग, भेद, बलस्थाने व शिबंदी यांची खडान् खडा माहिती पुरविली. या माहितीमुळे चिमाजीस गड जिंकणे सोपे गेले. हा कासार म्हणजे खंडोजी माणकर. त्यास चिमाजीने खारोली हे गाव इनाम दिले. अशा रितीने तारापूरचा किल्ला २४ जानेवारी १७३९ रोजी चिमाजी आप्पाने जिंकला. माहीमच्या वेढय़ापेक्षाही या वेढय़ात मराठय़ांची जास्त प्राणहानी झाली. किल्ला जिंकल्यानंतर किल्ल्यातील एकूण एक शत्रूच्या लोकांना कैद करण्याचा हुकूम चिमाजी आप्पाने दिला. एकूण ४,००० लोकांना कैद करण्यात आले व ५०० घोडे पागेस लागले.

या घनघोर लढाईत तारापूरचा किल्लेदार (कप्तान) लुईस व्हेलेझो हा कामी आला. बाकीचे सर्व अधिकारी व त्यांचे कुटुंबीय (कबिले) मराठय़ांच्या हाती लागले. बायका-मुले (कुटुंबीय) सापडण्याचे कारण पोर्तुगीज इतिहासकार असे देतात की, किल्लेदाराचे आपल्या बायकोवर अत्यंत प्रेम होते. त्यामुळे आपापले कबिले अशेरीस किंवा दूर एखाद्या बंदोबस्ताच्या ठिकाणी पाठविण्याचा हुकूम असूनही तो मोडून त्याने आपला कबिला पाठविला नाही आणि बहुधा त्यामुळेच इतर अधिका-यांनीही आपापली कुटुंबे किल्ल्यातच ठेवली व त्यामुळे ती आयतीच मराठय़ांच्या हाती लागली. पण चिमाजी आप्पाने त्या सर्वाना त्यांच्या इतमामाप्रमाणे व दर्जाप्रमाणे वागवून त्यांचा यत्किंचितही उपमर्द न होऊ देता अंत्यविधी पार पाडू दिले. किल्लेदाराच्या बायकोने आपल्या नव-याचे प्रेत त्याच्या इतमामाप्रमाणे पुरण्यास परवानगी मिळावी अशी चिमाजी आप्पाकडे विनंती केली. चिमाजी आप्पानेही उदारपणे ही विनंती तात्काळ मान्य केली. त्याच्या या दिलदार वृत्तीबद्दल पोर्तुगीज इतिहासकारांनी चिमाजी आप्पाची मुक्तकंठाने स्तुती करून त्यास धन्यवाद दिले.

इ.स. १७५० मध्ये टायफेनथॅलर लिहितो की, आता मराठय़ांच्या ताब्यात असलेले तारापूर कधीकाळी पोर्तुगीजांचे होते. मराठय़ांनी किल्ला जिंकल्यानंतर किल्ल्याच्या समुद्राकडील बाजूची युरोपियन पद्धतीने दुरुस्ती केली. इ.स. १७६० मध्ये हा किल्ला सुस्थितीत होता व चार तोफांनी संरक्षित होता. इ.स. १७७६ मध्ये रघुनाथराव पेशव्याने या किल्ल्यात आश्रय घेतला होता. इ.स. १८०३ मध्ये कसलाही प्रतिकार न होता तो ब्रिटिशांच्या ताब्यात आला. इ.स. १८१८ मध्ये कॅप्टन डिकिन्सन वर्णन करतो की, हा किल्ला मोठय़ा किल्ल्यांमधील एक, सुस्थितीतील आणि उत्तर कोकणाच्या सागरी किल्ल्यांच्या अगदी मध्यभागी असलेला किल्ला आहे. मोठाल्या ताशीव दगडी चिरांमध्ये बांधलेल्या या चौरसाकृती किल्ल्याची लांबी-रुंदी प्रत्येकी १५० मी. आहे. तटभिंतीची उंची ९ मी. व जाडी (रुंदी) तीन मीटर आहे. किल्ल्याची उत्तर बाजू भरतीच्या वेळच्या समुद्राच्या लाटांच्या तडाख्यांनी वाहून गेली आहे आणि ब-याच ठिकाणी त्याची पडझड झालेली आहे. वरील संरक्षक भिंती (पाळ्या) कोसळल्या आहेत.

आग्नेयेकडील कोप-यावर मनोरा किंवा बुरूज नाही. उर्वरित तीन बाजूंना कोरडय़ा झालेल्या खंदकाचे अवशेष पाहावयास मिळत. किल्ल्याच्या पूर्वेकडील मध्यभागी प्रमुख प्रवेशद्वार होते. किल्ल्यात मोठाल्या इमारतींचे अवशेष पाहावयास मिळत होते. येथे दोन धान्य कोठारांशिवाय एक पहारेक-याची चौकी, काही साध्या इमारती, काही चांगल्या (गोड) व मुबलक पाण्याच्या विहिरी होत्या. डहाणू किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यातही घरे व बगिचे होते. इ.स. १८६२ च्या पाहणीत तो पडक्या अवस्थेत आढळला, उत्तरेकडील बाजू पूर्णपणे पडून गेलेली आढळली. हा किल्ला पेशव्याने विकाजी मेहरजी यास १०० वर्षाच्या करारावर इनाम म्हणून दिला होता. १९व्या शतकाअखेरीस टेलर हा प्रवासी लिहितो की, खाडीच्या दक्षिण किना-याला असलेल्या पोर्तुगीजांनी १५९३ मध्ये बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष पाहावयास मिळाले.

Check Also

रोहिडा किल्ला

Rohida Fort Rohida Fort : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. …

Leave a Reply