Asha Transcription

थाळनेर

धुळे जिल्हयात तापी नदी काठी थाळनेर हा पुरातन किल्ला आजही काळाशी व स्थानिक लोकांच्या अनास्थेशी झुंज देत उभा आहे. अनेक राजवटी व त्यांचा वैभवशाली काळ पाहिलेला हा किल्ला आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. थाळनेर ही एकेकाळी खानदेशची राजधानी होती, सुरत – बुर्‍हाणपूर या व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे केंद्र होता. लता मंगेशकर यांचे आजोळ थाळनेरला होते.

इ.स. ११२८ मध्ये जिवाजी आणि गोवाजी या गवळी किंवा अहीर कुटुंबाकडे थाळनेरचा ताबा होता. देवगिरीचा राजा बाजीराव ह्याचा मुलगा दौलतराव खानदेशची पाहाणी करण्यासाठी आला असता त्याला थाळनेरची भरभराट झाल्याच आढळले, (त्याचवेळी खानदेशातील इतर २३ किल्ल्यांची धुळधाण झाली होती.) त्यामुळे खुश होऊन त्याने जिवाजी आणि गोवाजीच्या कुटुंबाला थाळनेरचा प्रमुख बनविले.

इ.स. १३७० मध्ये फिरोजशहा तुघलक याने हा प्रदेश जिंकून घेतला आणि मलिकराजा फारुकी याला दक्षिण गुजरातची सुभेदारी बहाल केली. मलिकने थाळनेरला आपली राजधानी बनविली. पुढच्याच वर्षी गुजरातच्या सुलतानाने मलिकवर हल्ला करुन त्याचा प्रदेश हिसकावून घेतला, मलिक थाळनेरच्या आश्रयाला जाऊन राहीला. इ.स.१३९९ मध्ये मलिक मेल्यावर त्याने आपल्या दुसर्‍या मुलाला थाळनेरचा ताबा दिला. त्यामुळे चिडलेल्या पहिल्या मुलाने माळव्याच्या सुलतानाच्या मदतीने थाळनेरवर हल्ला करुन त्याचा ताबा घेतला.(१४१७)

इ.स. १४९८ मध्ये गुजरातचा सुलतान मो. बेगाडा याने थाळनेर जिंकून आजूबाजूच्या प्रदेशात लुटालुट केली. १५११ मध्ये मो. बेगाडाने अर्धा खानदेश आपला वजिर मलिक हसनुद्दीन याला बहाल केला. पण पुढच्याच वर्षी त्याचा खुन झाला.गुजरातचा सुलतान चंगेज खानने इ.स. १५६६ मध्ये खानदेशचा राजा मिरान मुहम्मद खान याचा पराभव केला. इ.स. १६०० मध्ये थाळनेरचा ताबा अकबराकडे गेला, त्यावेळी सुरत – बुऱ्हाणपूर या व्यापारी मार्गावर असलेला हा किल्ला अतिशय मजबूत व संपन्न होता. १७५० मध्ये थाळनेरचा ताबा पेशव्यांकडे गेल्यावर त्यांनी तो होळकरांना दिला. १८०० मध्ये होळकरांनी तो निंबाळकरांना दिला, पण पुढच्याच वर्षी परत आपल्या ताब्यात घेतला.

इ.स. १८१८ मध्ये ब्रिटीश जनरल सर थॉमस हिसॉप जेव्हा थाळनेरचा किल्ला घेण्यासाठी गेला, त्यावेळी खानदेशच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित प्रतिकार त्याला इथे झाला. यात मराठ्यांचे २५० लोक तर इंग्रजांचे २५ जण ठार झाले.

Asha Transcription

About admin

Check Also

किल्ले रोहिडेश्वर

सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ …

Leave a Reply

Your email address will not be published.