Amazon Big Sell

दुर्गाडी किल्ला

‘अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो..’ कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेबाबत छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेले हे उद्गार! हा शिवकालीन इतिहास ताजा करतो तो कल्याणचा इतिहासकालीन दुर्गाडी किल्ला आणि त्या भोवतीचा परिसर. कल्याणच्या खाडीकिनारी हा किल्ला उभा आहे, मराठी आरमाराचा साक्षीदार म्हणून. इतिहासप्रेमींना आणि शिवबांच्या भक्तांसाठी सहजसफर करण्याचे हे एक महत्त्वाचे ठिकाण.

सातवाहन काळापासून कल्याण हे एक महत्त्वाचे बंदर म्हणून ओळखले जात होते. १६५७पर्यंत कल्याणचा ताबा आदिलशहाकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या शहराचे महत्त्व ओळखले होते. त्यामुळे त्यांनी आदिलशहाचा पराभव करून कल्याण स्वराज्यात सामील करून घेतले. या भागाचे भौगोलिक महत्त्व जाणून छत्रपतींनी कल्याणमधील खाडीकिनारी किल्ला बांधण्याचे ठरविले. किल्ल्याचे बांधकाम करताना महाराजांना तिथे अमाप संपत्ती सापडली. देवी दुर्गेच्या आशीर्वादानेच ही संपत्ती सापडली आहे, असे समजून महाराजांनी या किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर बांधले आणि त्यामुळेच या किल्ल्याला दुर्गाडी हे नाव पडले.

कल्याण रेल्वे स्थानकापासून अध्र्या तासाच्या अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर आणि तटबंदी आहे. किल्ल्याचे बरेचशे अवशेष काळाच्या ओघात नष्ट झाले. त्यामुळे किल्ला पाहण्यास अर्धा ते पाऊण तास पुरेसा आहे. गडावर जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. मात्र मूळ प्रवेशद्वार नष्ट झाले आहे. मात्र तेथील बुरूज शाबूत आहे. प्रवेशद्वारासमोरच गणेशाची मूर्ती असून, पूर्वी येथील प्रवेशद्वाराला गणेश दरवाजा असे नाव होते. किल्ल्यावरील दुर्गा देवीच्या मंदिरात नव्याने प्रतिस्थापना केलेली देवीची मूर्ती असून, पुरातन मूर्तीही मंदिरात ठेवण्यात आलेली आहे. मंदिराची बांधणी आज मजबूत स्थितीत आहे. नवरात्राच्या काळात या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. अन्य दिवशीही भावीक येथे दर्शनासाठी येत असतात.

मंदिराजवळ इदग्याची भिंत आहे. किल्ल्याच्या खाडीकडील भागाकडे तटबंदी व बुरूजाचे अवशेष आहेत. किल्ल्यावरील बरेचशे अवशेष काळाच्या ओघात लुप्त झालेले आहे. हा परिसर संवेदनशील असल्याने किल्ल्यावर नेहमीच पोलिसांचा पहारा असतो. त्यामुळे किल्ल्यावरील बराचसा भाग पाहता येत नाही. किल्ल्याच्या बाजूलाच खाडीकिनारी गणेश घाट हे रमणीय ठिकाण आहे. गणेशोत्सवाच्या काळात येथे गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते, त्यामुळे या भागाला गणेश घाट हे नाव पडले.

महापालिकेने येथे सुंदर बाग फुलविली होती, मात्र दुर्लक्ष केल्याने या बागेची दुरवस्था झाली. परंतु संध्याकाळच्या वेळेत फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे बोटिंगचीही व्यवस्था असून, सायंकाळच्या वेळेत खाडीचा झोंबरा वारा खात तरुणाई येथे जमलेली असते. दुर्गाडी किल्ल्यावरून गणेश घाटाचे आणि कल्याणच्या खाडीचे नयनरम्य दृष्य दिसते. ते पाहताना छायाचित्रण करण्याचा मोह आवरता येत नाही.

दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला अनेक इतिहासकालीन ठिकाणे आहेत. जवळच सुभेदार वाडा आहे, जिथे कल्याणच्या सुभेदाराचे निवासस्थान होते.

Asha Transcription

Check Also

रोहिडा किल्ला

Rohida Fort Rohida Fort : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. …

Leave a Reply