पवनी किल्ला

भंडारा जिल्ह्यात पवनी तालुका असलेला पवनीचा प्रसिद्ध किल्ला, भंडाऱ्या पासून ४७ आणि नागपूर पासून ८२ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या तीन बाजूनी टेकड्या आणि एका बाजूने वैनगंगा नदी वाहते. गावात शिरतानाच आपले स्वागत करतो तो पवन राजाचा किल्ला. त्यावरूनच पवनी हे गावाचं नाव पडलं आहे. गावात जाणारा मुख्य रस्ता ह्या किल्ल्याच्या दरवाजातूनच जातो. हा किल्ला अजूनही बराच सुस्थितीत आहे. किल्ल्याची एक भिंत आणि तिच्या पायथ्याशी असलेला तलाव गावात प्रवेश करतानाच लक्ष वेधून घेतात.

ऐतिहासिक
पवनी हे हीनयान पंथाचे आराधना केंद्र होते. अशोकाच्या काळात ते वैभवशाली बनले. सम्राट अशोकाचे येथे काही काळ वास्तव्य होते. त्याने मुलगी संघमित्रा हिला येथूनच श्रीलंकेला पाठवले, असे इतिहास सांगतो. दुसऱ्या उत्खननात इ.स. पूर्व पहिल्या शतकातला क्षत्रपकुमार रूपीअम्माचा स्तंभलेख (सध्या नागपूरच्या वस्तुसंग्रहालयात आहे.) आढळला.

रूपीअम्मा हा कुषाणाचा क्षत्रप होता. त्याला सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णीने पराभूत केले. या विजयानंतर त्याने नाशिक येथील गुहालेखात ‘वेनाटक स्वामी’ असे स्वत:ला संबोधले आहे. १९९४ मध्ये भारतीय पुराणवस्तू संशोधन विभागाचे डॉ. अमरेंद्रनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन झाले. यात इ.स.पूर्व १५०० पर्यंतचा इतिहास उपलब्ध करणारे सोन्याचे अलंकार, तांब्याची भांडी, पायऱ्यांच्या विहिरी, केशविन्यास करणारी महिलेची मूर्ती, अरब देशाशी व्यापार झाल्याचे स्पष्ट करणाऱ्या वस्तू आढळल्या. डॉ. मिराशी यांना हरदोला टेकडीच्या पश्चिमेस उत्खननात राजा भगदत्त यांचा शिलालेख मिळाला.

उत्खनन काळात या प्रतिनिधीने डॉ. अमरेंद्रनाथ यांची भेट घेतली असताना ते म्हणाले होते, ‘इतका प्राचीन, सुरक्षित, अभंग किल्ला महाराष्ट्रात नाही.’ उत्खननात मिळालेले ‘अरेबियन पत्थर’ पवनीचा समुद्रमार्गाने अरब देशांशी व्यापार तर, हाडांपासून बनवलेल्या सुया, २३०० वर्षांपूर्वी वीणकामात हे क्षेत्र अग्रणी होते, हे दर्शवतात. पवनीचा ऐतिहासिक वारसा जपायचा असेल तर नवीन बांधकाम पवनी किल्ल्याच्या बाहेर करावे असेही त्यांनी सुचवले होते.

पवनीवर मौर्य, शुंग, सातवाहन, सिथियन, पुन्हा सातवाहन, वाकाटक, मुसलमान धर्मीय, गोंड राजे, भोसले आणि अखेर इंग्रजांनी राज्य केले. या काळातच यादवांचे राज्य इ.स. १३१८ मध्ये लयाला गेल्यावर देवगढच्या गवळी राजांनी सत्ता प्रस्थापित केली. यानंतर चांद्याच्या गोंड राजांनी हा प्रदेश जिंकला.

इ.स. १७३९ मध्ये नागपूरच्या रघुजी भोसल्यांनी पवनीचा प्रदेश वलीशाह या गोंड राजाचा पराभव करून जिंकला. त्यांनी तुळजोरामपंत या सरदाराला पवनीत बंदोबस्ताकरिता ठेवले. त्यांचे वंशज तुळाणकर पवनीत आजही आहेत. वयोवृद्ध वामन नागोराव तुळाणकर म्हणाले, ‘आज पवनी गाव अनेक दृष्टीने शापित दिसत असले तरी ईश्वराचा त्याच्यावर वरदहस्त आहे.’ राजवटी बदलत गेल्या तरी पवनीत आर्थिक सुबत्ता होती.

इ.स. १८१८ च्या काळात पेंढाऱ्यांनी पवनीवर तीन आक्रमणे केली. दोनदा पवनीकरांनी पराभव स्वीकारला. तिसऱ्यांदा मात्र एकजूट करून लोकांनी पेंढाऱ्यांना पिटाळून लावले.

पुढे २५ सप्टेंबर १८१८ ला मेजर विल्सन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश फौजांनी भोसल्यांचा पाडाव करून पवनी हस्तगत केली. भंडारा जिल्ह्य़ात पवनी मोठे गाव असल्यामुळे १८६७ मध्ये पवनीला जिल्ह्य़ात नगरपालिकेचा पहिला मान मिळाला. १८६० च्या जनगणनेनुसार पवनीची लोकसंख्या ६० हजार होती. आज ती सुमारे ३० हजार आहे. लोकसंख्या इतरत्र वाढत असताना ती कमी होणारे पवनी हे अपवादात्मक शहर म्हणता येईल.

Check Also

रोहिडा किल्ला

Rohida Fort Rohida Fort : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. …

Leave a Reply