पारसिक किल्ला

शिवाजी महाराजांच्या आज्ञेने २४ ऑक्टोबर १६५७ साली दादाजी बापुजी रांझेकरांनी कल्याण जिंकून घेतल्यावर शिवाजी महाराज कल्याणला आले. संपूर्ण खाडीप्रदेश त्यांनी स्वतः पाहिला. पश्चिमेला ठाणे शहर होते, पण ते होते पोर्तुगीजांच्या ताब्यात. ठाणे बंदरात त्यांच्या वखारी होत्या पण त्यांच्या नजरेतील वखवख महाराजांनी नेमकी जोखली होती. पण त्यांनी व्यापार करावा, इतर उद्योग करू नयेत आणि केलेच तर त्यांना जरब बसावी त्यासाठी स्वराज्याचे आरमार असावे म्हणून त्यांनी ती पूर्व पाहणी केली होती. त्यासाठी वसई पासून कल्याण व तेथून ठाणे बेलापूर पर्यंतच्या संपूर्ण खाडी किनाऱ्याची ईत्यंभूत माहिती हेरांनी महाराजांना पुरविली होती.

महाराजांचा मनसुबा स्पष्ट होता, कल्याण येथे नाविक तळ उभारण्याचा. ठाण्याची खाडी दक्षिणोत्तर समुद्राला जाऊन मिळते. सह्याद्रीतून निघताना सोबत प्रचंड गाळ घेऊन आलेल्या भातसा नदीने उल्हास व काळू नदीला सोबत घेऊन येथे अनेक बेटे तयार केली आहेत. या बेटावरील दाट झाडीने आरमारी जहाजांना खोलवर लपण्यास सोयीचे होईल असे अनेक जलमार्ग या बेटांमुळे येथे तयार झाले आहेत. एखाद्या शत्रूची जहाजे पाठलाग करीत कल्याणपर्यंत आल्यास आपसूकच येथे लपून राहिलेल्या आरमारी जहाजांच्या तडाख्यात सापडून नेस्तनाबूत होईल, एकूणच हा सारा खाडी प्रदेश जहाज वाहतुकीस आणि आरमारी जहाजांच्या गुप्त हालचालीस अत्यंत आदर्श असल्याकारणाने कल्याण खाडीकिनारा स्वराज्याचे पहिले आरमार उभारण्याचा निर्णय शिवाजी महाराजांनी घेतला. खाडीकिनारी प्रचंड गोदी बांधण्यात आली आणि या गोदीतून निरनिराळ्या आकाराची लढावू जहाजे तयार होऊ लागली, या गोदीला संरक्षण असावे म्हणून कल्याण खाडी किनारी दुर्गाडी किल्ल्याची निर्मिती करण्यात आली.

शिवाजीराजांच्या निधनानंतर औरंगजेबाच्या दक्षिणेवरील मोहिमेच्या द्रुष्टीने हालचाली सुरु झाल्या. या मोहिमेत संभाजी महाराज एकाकी पडावेत यासाठी औरंगजेबाने दक्षिणेतील सर्व राजांना पत्रे पाठवली. पोर्तुगीजांनी मोगल सैन्यास उत्तर कोकणातील आपल्या प्रदेशातून जाण्यास वाट दिली. त्याच सुमारास कल्याण-भिवंडीकडे जाणाऱ्या तारवांस प्रतिकार करण्यासाठी मराठे पारसिक येथे किल्ला बांधण्याची तयारी करत होते. पोर्तुगीजांना ही खबर लागताच त्यांनी ही जागा लगेच ताब्यात घेऊन तेथे एक छोटेखानी किल्ला बांधला. पोर्तुगीजांनी मोगलांच्या भीतीने मोगलांशी सख्य करून अप्रत्यक्षपणे संभाजी महाराजांशी विरोधात जाण्याचे धोरण पत्करल्यामुळे पोर्तुगीजांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने संभाजी राजांनी १६८३ साली उत्तर कोकणातील पोर्तुगीज ठाणे उध्वस्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली.

या काळात अन्नाधान्याचा खूप तुटवडा निर्माण झाला होता. अशा वेळी शत्रुच्या मुलुखातील उभी पिके कापून नेण्याचे प्रकार सर्रास घडत होते. १२ सप्टेंबर १६८३ रोजी संभाजी राजांचे ५० सैनिक अंजूर गावात शिरून तेथील पिके कापून नेऊ लागले. तेव्हा पारसिक किल्ल्यावरील कँप्टनने आपले २५ सैनिक त्यांना हाकलून लावण्यासाठी पाठवले. हे सैनिक संभाजीराज्यांच्या लोकांवर चालून गेले. संभाजीच्या लोकांनी पळून जात असल्याचा बहाणा करत या सैनिकांना आपल्यामागे येऊ दिले व ज्या ठिकाणी संभाजीराजांच्या ५०० सैनिकांचा तळ होता तेथे घेऊन गेले. तळाजवळ आल्यावर संभाजीराजांच्या सैन्याने या सैनिकांवर हल्ला चढवला. हे पोर्तुगीजांचे सैनिक पळून जाऊ लागले, पण मराठ्यांचे सैन्य धावण्यात निष्णात असल्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांचे १९ सैनिक ठार मारले. २५ पैकी केवळ ६ च सैनिक पारसिकच्या किल्ल्यात परत जाऊ शकले.

संभाजी राजांच्या हत्येनंतर या प्रांतावर मोगलांचे वर्चस्व असल्यामुळे व त्यांचे पोर्तुगीजांचे सख्य असल्याने या किल्ल्यात फेरफार करण्याची आवश्यकता पोर्तुगीजांना भासली नसावी. शिवाय डोंगरांच्या पलीकडे असलेले ठाणे शहर पोर्तुगीजांच्याच ताब्यात असल्यामुळे त्यांना तशी चिंता करण्याची आवश्यकता नव्हती. त्यानंतर पुढे चिमाजी आप्पा पेशवे(१७३७-३९) यांची वसई मोहीम प्रचंड गाजली. त्याला कारण पोर्तुगीजांच्या धार्मिक छळाला कंटाळून लोकांनी पेशव्यांकडे वाड्याचे सरनाईक चौधरी, अंजूरचे गंगाची नाईक यांच्यामार्फत तक्रार खलीते पाठविल्यामुळे वसई मोहिमेला एक प्रकारे धर्मयुध्दाचे स्वरूप आले. चिमाजी आप्पाने ठाण्याचे सुभेदार रामजी बिवलकर यांच्यासह सरदेशपांडे, अंताजी रघुनाथ कावळे आणि अंजूरचे वतनदार गंगाजी नाईक यांच्या हाताखाली सैन्य दिले. एप्रिल १७३७ च्या पहिल्या आठवड्यात पेशव्यांचे सरदार शंकरजीपंत यांनी सैनिक पाठवून पारसिकच्या किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेकऱ्यांनी हा किल्ला दोन दिवस लढवला. पण शेवटी नाईलाजाने तोफांच्या कान्यात खिळे मारून त्या निकामी करून किल्लेकारी वसई किल्ल्यावर पळून गेले.

Check Also

रोहिडा किल्ला

Rohida Fort Rohida Fort : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. …

Leave a Reply