पुणे जिल्हा

पुणे जिल्हा

पुणे जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण प्रचलित आहे – पुणे तिथे काय उणे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर ईशान्य व पूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून शिवाजी महाराज व जिजाबाई यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. खेड शिवापूर येथे व पुण्यातील लाल महालयेथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील कोंढाणा, राजगड व पुरंदर हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, पुरंदर, भोर, मावळ, मुळशी व वेल्हे हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.

पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकीर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.

थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. कात्रज तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्‍न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये मराठेशाहीचा व पेशवाईचा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.

पुणे जिल्ह्याच्या सीमा

  • उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा,
  • आग्नेयेस सोलापूर जिल्हा,
  • दक्षिणेला सातारा जिल्हा,
  • पश्चिमेला रायगड जिल्हा
  • वायव्येला ठाणे जिल्हा आहे.

पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. – भीमा नदी ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. भीमेचा उगम भीमाशंकर(ता. खेड) येथे होतो.

इतर नद्या पुढीलप्रमाणे – इंद्रायणी नदी, कर्‍हा, कुकडी नदी, घोड नदी, नीरा, पवना नदी, मांडवी, मीना, भामा, मुठा नदी, मुळा नदी

आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत.

अष्टविनायकांपैकी पाच गणपती : महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात. या अष्टविनायकांपैकी पाच स्थाने पुणे जिल्हात आहेत:-चिंतामणी (थेउर)-थेऊर,महागणपती (रांजणगाव)-रांजणगाव, मोरेश्वर (मोरगाव)-मोरगाव, विघ्नहर (ओझर)-ओझर, गिरिजात्मज (लेण्याद्री)-लेण्याद्री – हे ते पाच विनायक होत.

जेजुरी : श्री खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.

भीमाशंकर : भारतातील बारापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा – भीमा नदीचा – उगम होतो.

भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.

उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- कसबा गणपती व ग्रामदेवता-तांबडी जोगेश्वरीचे मंदिर, चतु:शृंगीचे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील कानिफनाथ मंदिर, चिंचवडयेथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्र्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले – भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.

ऐतिहासिक

  • शनिवारवाडा – (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
  • लाल महाल – (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. शिवाजी महाराज व जिजाबाईयेथे वास्तव्यास होते).
  • इतर- शिंदे छत्री, विश्रामबाग वाडा, आगाखान पॅलेस, दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय.

Check Also

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, …

10 comments

Leave a Reply