पोरक्या मुलाचे आत्मवृत्त मराठी निबंध | porkya mulache aatmavrutt

मित्रांनो आई वडील हीच आपली सर्वात मोठी संपत्ति असतात. परंतु दुर्दैवाने काही मुले असेही असतात ज्यांचे आई वडील लहान वयातच त्यांना सोडून देवाघरी निघून जातात. आजच्या या लेखात आपण एका पोरक्या मुलाचे आत्मवृत्त पाहणार आहोत. ह्या मुलाचे आईवडीलाही त्याला खूप लहान वयात सोडून निघून गेलेत. तर चला porkya mulache aatmavrutt nibandh सुरू करूया…

पोरक्या मुलाचे आत्मवृत्त | porkya mulache aatmavrutt

“सांग मला रे सांग मला,
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला?“

शाळेमध्ये आज बाई “ग.दि. माडगूळकरांची” कविता शिकवत होत्या. त्याच्या पहिल्या दोन ओळीच हृदयाला चिरुन गेल्या. कसं सांगु मी आई आणखी बाबा यातुन मला कोण अधिक आवडतं ते? कारण माझे आई आणि बाबा दोघंही मी खुप लहान असतानाच एका अपघातामुळे मला सोडुन गेले? नुकताच आपल्या पायावर उभा रहायला लागलो होतो. आईच्या मायेचा ओलावा आणि बाबांच्या कणखर हातांमधली सुरक्षीतता अनुभवायला लागलोच होतो की नियतीने आमच्या छोट्याश्या पण सुखी कुटुंबावर घाला घातला आणि माझ्या आई आणि बाबांना माझ्यापासुन हिरावुन घेतले.
जवळचे असे मला कुणी नव्हतेच आणि लांबच्या नातेवाईकांनी आधीच आपले हात आखडते करुन मला पोरकं करुन टाकले. ‘पोरकं’ किती बोचणारा शब्द आहे हा. पोरकं, ज्याच हक्काच असं कुणीच नाही ह्या जगात. असा मी पोरका, कसा सांगु तुम्हाला कोण आवडे अधिक मला?

महापालीकेच्या अनाथ-आश्रमाने मला आधार दिला, लहानचे मोठे केले. स्वकष्ट करण्यातच माझं बालपण गेलं. ह्याच अनाथ-आश्रमात माझ्यासारखे अनेक ‘पोरके’ मला भेटले आणि आम्ही सर्वांनी मिळुन आपआपल्या दुःखात सुःख शोधण्याचा प्रयत्न केला. ह्या अनाथ-आश्रमानेच मला लहानवयातच मोठ्ठ बनवले, आयुष्यात येणाऱ्या खाचखळग्यांची जाणिव करुन दिले, मनावर दगड ठेवुन जगायला शिकवले. पण मातृत्वाची माया आणि पितृत्वाची सावली मात्र नाही मिळु शकली. शाळेमध्ये येणाऱ्या, रस्त्यावरुन आई-बाबांचे बोटं धरुन फिरणाऱ्या मुलाबाळांना पाहीले की आजही हृदय आक्रंदुन उठते. प्रत्येक सणांना, आनंदाच्या क्षणांना आपलं असं कुणीच नसल्याचे दुःख सलत रहाते. दुखाच्या क्षणी, कसोटीच्या क्षणी पाठीवर मायेचा हात ठेवुन, ‘तु लढ’ म्हणणारं, नुकत्याच फुललेल्या पंखांना बळं देणारं आपलं असं कुणीच नसल्याचे दुःख अधीक वेदना देतं. थंडी पावसात आश्रमातुन मिळालेल्या घोंगड्यांना आईच्या मायेची उब ती कुठुन मिळणार? नकळत केलेल्या चुकांना वेळीच सुधारण्यासाठी उचलेल्या त्या बाबांच्या हाताची सर, इतरांकडुन खाललेल्या शिव्यांनी कशी येणार?
आई-वडीलांच्या छत्रछायेशिवाय जगताना मनावर उमटलेले चरे आयुष्यभर बोचत रहाणार.

नियतीने लादलेल्या ह्या पोरक्या मुलाला काय कळणार आई-बाबा आणि काय उत्तर देणार तो ह्या प्रश्नाचे?

–समाप्त–

तर मित्रहो ही होती porkya mulache aatmavrutt marathi nibandh. आशा करतो की हा निबंध तुम्हाला आवडला असेल ह्या निबंधाला इतरांसोबतही शेअर करा. धन्यवाद..

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *