प्रचितगड

आदिलशहाचे शृंगारपुरचे सरदार सुर्वेंच्या ताब्यात १६६१ साली मंडणगड,पालगड हे किल्ले होते. उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केल्यावर शिवाजी महाराज दाभोळकडे निघाले.

वाटेत मंडणगड किल्ला होता. शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच सुर्वेंची तारांबळ उडाली व मंडणगड सोडून आपली जहागिरी असलेल्या शृंगारपूरला पळून गेला. महाराजांनी श्रृंगारपुरवर हल्ला केला. त्यावेळी दळवींचे कारभारी (दिवाण) पिलाजी शिर्के यांची योग्यता पाहून महाराजांनी त्यांना स्वराज्यात सामिल करुन घेतले.

पुढे पिलाजीची मुलगी जिऊबाई उर्फ़ राजसबाई (येसुबाई) यांच्यांशी संभाजी महाराजांचा विवाह झाला. तसेच शिवाजी महाराजांची मुलगी राजकुंवरबाई हिचा विवाह पिलाजींचा मुलगा गणोजी यांच्याशी झाला.

शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले तेंव्हा त्यांनी संभाजी महाराजांची शृंगारपूरचा सभेदार म्हणुन नेमणुक केली. शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजी महाराजांमधील लेखक , कवी जागा झाला. त्यांनी “बुधभूषणम” हा संस्कृत ग्रंथ लिहिला. “नायिकाभेद”, “नखशिक”, “सातसतक” हे ब्रज भाषेतील तीन ग्रंथ लिहिले.

किल्ल्याच्या दरवाजाखाली लावलेल्या शिडीवरुन चढल्यावर आपण उत्तराभिमुख उध्वस्त प्रवेशद्वारा समोर उभे राहातो . प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक बुरूज आहे. किल्ला चढतांना हा बुरुज आपल्याला खालूनही दिसतो.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे मोठे टाक आहे. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाक्याच्या बाजूने वर चढून टाक्याला वळसा घातल्यावर आपण प्रकेशव्दाराच्या पुढे असलेल्या डोंगराच्या नाकाडावर पोहोचतो.

किल्ल्याचा उत्तर दक्षिण पसरलेला डोंगर आणि बाजुचा डोंगर यामधे खिंड तयार झालेली आहे. या खिंडीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रवेशद्वारावर येणाऱ्या शत्रूवर मारा करण्यासाठी येथे बुरुजाची योजना केलेली आहे.

उत्तर टोकाकडील हा बुरूज पाहून परत टाक्या जवळ येउन किल्ल्याच्या दक्षिणेला जाताना एक वाट वर चढत जाताना दिसते. या वाटेने जाण्या अगोदर डाव्या बाजुला असलेल्या कारवीच्या झाडीत शिरावे. थोडे अंतर चालुन गेल्यावर एक पाण्याचे टाक पाहायला मिळते. याठिकाणी दरीच्या बाजुला तटबंदीचे अवशेषही पाहायला मिळतात.

टाक पाहून परत पायवाटेवर येउन छोटासा चढ चढुन दक्षिणेस चालत गेल्यावर आपण पत्र्‍याच्या शेड मध्ये बांधलेल्या भैरी भवानीच्या देवळापाशी येतो.

देवळाच्या परिसरात ५ तोफा ठेवलेल्या आहेत. देवळात तीन मूर्ती आहेत. मधली मुर्ती भैरी भवानीची असून बाजूच्या दोन्ही मूर्ती भैरोबाच्या आहेत. प्रचितगडावरील भवानी पंचक्रोशीतील लोकांची कुलदेवता असल्यामुळे गडावर अधुनमधुन लोकांचा वावर असतो. मंदिर पाहून पुढे गेल्यावर कारवीच्या झाडीत लपलेले घरांचे चौथरे पाहायला मिळतात.

या चौथऱ्या मधून जाणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर पायऱ्या लागतात. पायऱ्यांनी खाली उतरल्यावर उजव्या बाजूला कातळात खोदलेल खांब टाक पाहायला मिळत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे टाक २ खांबावर तोललेल असून टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत .

याठिकाणी एकूण पाण्याची ५ टाक असुन त्यापैकी ३ टाक पायऱ्यांच्या उजव्या बाजूला व २ टाक डाव्या बाजूला आहेत. टाक पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला (दरीच्या बाजूला ) तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष पाहायला मिळातात. या भागात गडमाथा बऱ्यापैकी रुंद असुन गडावरील एकमेव मोठे उंबराचे झाड येथे आहे.

त्या उंबराच्या सावलीत थोडा वेळ विसावा घेउन समोर दिसणाऱ्या उंचवट्यावरील वाड्याच्या दिशेने जावे. वाड्याचे छप्पर पडलेले आहे. भिंती कशाबशा तग धरुन उभ्या आहेतं .

वाडा उजवी कडे ठेवत वाड्याला वळसा घालून मागे जाताना तटबंदी आणि फांजीचे अवशेष पाहायला मिळतात. वाड्या मागील उतार उतरुन समोर दिसणाऱ्या उंचवट्यावर चढून गेल्यावर आपण किल्ल्याचा दक्षिण टोकावर पोहोचतो. येथे पश्चिमेला (शृंगारपूरच्या दिशेला) कातळात खोदलेला एक खड्डा आहे . त्यात टेहळ्यांना बसण्यासाठी दोन स्टुला सारखे दोन उंचवटेही कोरलेले आहेत. टेहळ्या उन , गडावरचा भन्नाट वारा यापासून संरक्षण मिळण्यासाठी अशा प्रकारचा खड्डा खोदला असावा.

किल्ल्याच्या दक्षिण टोका वरुन बाजूचा वानर टोक डोंगर आणि त्यावरचे छोटे सुळके सुंदर दिसतात. हे पाहून आल्या वाटेने परत प्रवेशद्वारापाशी पोहोचल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते.

गड पाहायला एक तास लागतो.

Check Also

रोहिडा किल्ला

Rohida Fort Rohida Fort : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. …

Leave a Reply