योगाचे महत्व

योगाचे महत्व
योगाचे १० सर्वात महत्वाचे फायदे.
१. सर्व स्तरांवर तंदुरुस्ती.
२. वजनात घट.
३. ताण तणावा पासून मुक्ती.
४. अंर्तयामी शांतता.
५. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ.
६. सजगतेत वाढ होते.
७. नाते संबंधात सुधारणा.
८. उर्जा शक्ती वाढते.
९. शरीरातल्या लवचिकपणात आणि शरीराची ठेवण सुधारते.

१०.अंतर्ज्ञानात वाढ

१. सर्व स्तरांवर तंदुरुस्ती.
नुसती शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वस्थ राहिलं पाहिजे. श्री श्री रविशंकर जी नेहमी म्हणतात “फक्तं रोग विरहीत शरीर असन्याला स्वास्थ्य महता येणार नाही, तर आनंद, प्रेम आणि उत्साह हे तुमच्या जीवनात उत्स्फूर्तपणे व्यक्त होत असतील तर त्याला खरी आरोग्य संपन्नता म्हणता येईल”. या ठिकाणी योगाच तुमच्या मदतीला धावून येतो. त्यासाठी आसने, प्राणायाम (श्र्वासोच्छ्वासाच्या लयी) आणि ध्यान धारणा या गोष्टी आरोग्य उत्तम राखायला आपल्याला उपयोगी पडतात.

२. वजनात घट.
याहून तुम्हाला अधिक काय पाहिजे ! योगाचा फायदा इथे सुद्धा होतो. सूर्य नमस्कार, कपाल भाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते योगाच्या सहाय्याने वजन कमी करा. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याची जाणीव आपल्याला होते. योग्य आहार घेतल्याने सुद्धा वजन नियंत्रणात रहायला मदत होते.

३. ताण तणावा पासून मुक्ती.
रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहाणाऱ्या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा रोज केलेला सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नष्ट करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातली विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर कशी टाकली जातात याचा अनुभव तुम्हाला श्री श्री योग लेव्हल २ कोर्स मध्ये येईल.

४. अंर्तयामी शांतता.
आपल्या सगळ्यांनाच एखाद्या शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडते. परंतू आपल्याला हवी असणारी शांती ही आपल्यामध्येच वसलेली आहे हे फार थोड्या लोकांना माहित असेल, फक्त या शांतीची अनुभूती घेण्यासाठी रोजच्या धकाधकीच्या कार्यक्रमातून थोडा वेळ काढायला हवा. या छोट्याशा सुट्टीत रोज योग आणि ध्यान केल्याने त्याचे बरेच फायदे आपल्याला मिळतात. अस्वस्थ झालेल्या मनाला काबूत आणण्यासाठी योगा सारखा दुसरा उपाय नाही.

५. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ.
शरीर, मन आणि आत्मा या तिघांचे मिळून एकसंघ अशी आपली यंत्रणा असते. त्यामुळे शारीरिक अस्वस्थपणाचे पडसाद जसे मनावर आघात करतात तसेच मानसिक अस्वस्थपणाचे परिणाम शरीरात रोगाच्या रूपाने प्रकट होतात. योगामुळे निरनिराळ्या अवयवांचे मर्दन केले जाते आणि त्यांचे स्नायू बळकट होतात. श्र्वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रामुळे आणि ध्यान धारणेमुळे शरीरात साठलेला ताण तणाव निघून जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

६. सजगतेत वाढ होते.
मन हे सतत कुठल्या ना कुठल्या क्रियेत गुंतलेले असते. ते सतत भूतकाळ आणि भविष्यकाळ यात झोके घेत असते पण वर्तमान काळात मात्र ते कधीच राहत नाही. आपल्यातली सजगता वाढल्याने मनाचे हे लक्षण आपल्या सहज लक्षात येते; आणि त्यावर वेळीच उपाय योजून आपण ताण तणावातून मुक्त होऊ शकतो; आणि मनाला शांत करू शकतो. योगा आणि प्राणायाम यांच्या मदतीने आपल्यातली सजगता वाढते. सजगता वाढल्याने इकडे तिकडे पळणाऱ्या मनाला आपण परत वर्तमान क्षणात आणू शकतो. तसे केल्याने ते आनंदी आणि एकाग्र बनते.

७. नाते संबंधात सुधारणा.
तुमचा जोडीदार, आई वडील, मित्र किंवा तुमच्या लाडक्या व्यक्ती या सगळ्यांशी असेलेलेनातेसंबंध योगामुळे सुधारतात . तणावमुक्त, आनंदी आणि समाधानी मन नात्यां सारख्या संवेदनशील संबंधात फार उपयोगी पडते. योगा आणि ध्यान धारणेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते. त्याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी होतो.

८. उर्जा शक्ती वाढते.
दिवसभराच्या कामाच्या धावपळीमुळे शेवटी तुम्हाला गलठून गेल्यासारखे वाटते कां? सतत दिवसभर काम करत राहिल्याने तुम्ही पार थकून जाता. तुमच्यात काही त्राण उरत नाही. परंतू रोज काही मिनिटे नियमित योगाचा सराव केल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहता. दिवसभराच्या कामाच्या धबडग्यातून तुम्ही मध्येच १० मिनिटांचा वेळ काढून मार्गदर्शित ध्यान जरी केलेत तरी त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्यात परत उत्साह संचारेल आणि हातात घेतलेले काम तुम्ही तत्परतेने पुरे कराल.

९. शरीरातल्या लवचिकपणात आणि शरीराची ठेवण सुधारते.
तुमच्या दैनंदिन कार्यक्रमात तुम्ही जर योगाचा समावेश केलात तर शरीर सशक्त, चपळ आणि लवचिक बनेल. रोज न चुकता योगा केलात तर तुमच्या शरीराच्या स्नायूंना बळकटी येईल. तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल. उभे राहताना, बसताना, झोपताना, चालताना त्यात एक प्रकारचा डौल येईल. चुकीच्या पद्धतीने बसण्या उठण्या मुळे पूर्वी जे अंग दुखायचे तसे ते दुखणार नाही.

१०. अंतर्ज्ञानात वाढ.
तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ करण्याची क्षमता योगा आणि ध्यान धारणा या मध्ये आहे. तशी ती झाल्यामुळे कोणती गोष्ट कधी, कुठे आणि कशी करायला हवी याचे अचूक निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि त्याचे फायदे मिळवू शकता. योगा केल्यामुळे हे बदल आपोआप होत असतात तुम्हाला फक्त याची अनुभूती घ्यायची असते. एक लक्षात ठेवा, योगा ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तिचा सराव सतत करत रहा !

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …

Leave a Reply