लोणावळा पुणे

लोणावळा पुणे

हे, भारतातील राज्य महाराष्ट्रातील, पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. लोणावळा पुण्यापासून ६४ किमी तसेच मुंबई पासून ९६ किमी अंतरावर आहे. तेथील चिक्की हा एक सुप्रसिद्ध चवीने गोड असलेला पदार्थ आहे आणि हे मुंबई व पुण्यामधील एक महत्वाचे स्टेशन आहे.पुण्यामधील उपनगरीय क्षेत्रामधून येथे येण्यासाठी लोकल रेल्वेगाड्या असतात. तसेच मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. तसेच लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजी चे मुख्यालय आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्‍या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.

पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळयात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.

लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे.

इतिहास

लोणावळा हे यादव साम्राज्याचा भाग होते. नंतर मुघलांना या जागेचे व्यूहात्मक महत्व लक्षात आल्याने त्यांनी ते काबीज केले आणि बराच काळ ते ताब्यात ठेवले. या भागातील किल्ल्यांनी आणि मावळ्यांनी मराठा आणि पेशवा राज्यांच्या इतिहासात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.१८७१ मध्ये तेव्हाचे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गवर्नर लॉर्ड एलीफिन्स्तन ने लोणावळा आणि खंडाळा शोधले.

लोकसंख्याशास्त्र

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार लोणावळाची लोकसंख्या ५७,६९८ होती.५३.४७% पुरुष तर ४६.५३% स्त्रिया आहेत. लोणावळ्याचे साक्षरता गुणोत्तर ८९.३३% आहे. लोणावळ्याची १०.३७% लोकसंख्या हि ६ वर्षाखालील मुले आहेत.

लोणावळा आणि खंडाळाच्या आसपासची पर्यटनस्थळे

राजमाची पॉईंट

राजमाची पॉईंट लोणावळा पासून ६.५ किमी अंतरावर आहे. येथून शिवाजी महाराजांचा राजमाची किल्ला तसेच आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य बघता येते.

टायगर पॉईंट

टायगर पॉईंट हा एक उंचावरील कडा आहे. जेथे सरळ उभी अशी ६५० मी. ची खोल दरी आहे.

कार्ला लेणी

कार्ला लेण्यांचे निर्माण बुद्ध भिक्षूंनी ख्रिस्तपूर्व २ ऱ्या आणि ३ ऱ्या शतकात केले. येथे एकवीरा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.

लोहगड किल्ला

मळवली रेल्वे स्थानकापासून ११.२ किमीच्या चढाईनंतर तुम्ही ह्या एकेकाळी शिवाजी महाराज्यांचा लष्करी तळ असलेल्या लोह किल्ल्याला पोहोचू शकता.

भुशी धरण

लोणावळा आणि आयएनएस शिवाजीमध्ये असलेल्या धरणाजवळील धबधबा प्रसिद्ध आहे.

राजमाची किल्ला Rajmachi Fort – हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.

पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

खंडाळ्याच्या घाटात घाट सुरु होताना राजमाची पॉईंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला. येथे जाण्यासाठी लोणावळ्याहून तुंगार्ली गावात जावे नंतर थोड्या चढणीनंतर तुंगार्ली धरणाच्या समोरुन ठाकर वस्तीवरून खाली उतरल्यावर सुमारे १८ किलोमीटर चालल्यावर राजमाचीच्या पायथ्याजवळ जाता येते. पायथ्याला उधेवाडी गांव असून गावातील घरांमध्ये रहाण्याची सोय होते. गडावर थोडीशी तटबंदी बुरुज व इमारतींचे जमीनदोस्त अवशेष दिसतात. किल्ल्याच्या वाटेवरुन जाताना एका बाजुला पावसाळ्यात उल्हास नदीच्या खोऱ्यात घनदाट झाडी प्रचंड धबधबे, उसळणारे ढग, अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती हे दृश्य अतिशय सुंदर, रमणीय आनंददायी आहे.

सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगमुळे निर्माण झालेला परिसर ‘उल्हास नदीचे खोरे’ म्हणून ओळखला जातो. याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते. याच ‘उल्हास नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मुंबईपुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी. अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. कल्याणा नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे. या बंदरापासून बोरघाटामार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग. जसा नाणेघाट तसा बोरघाट, त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. यापैकी सर्वात प्रमुख किल्ले राजमाची. किल्ल्याचा भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामुळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्ट्या एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याचा दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय.

इतिहास : राजमाची किल्ल्याच्या पोटात एक लेणं आहे. यालाच ‘कोडांणे लेणी’ असे म्हणतात. ही लेणी कोंडाणा गावापासून आग्नेयेस २ कि.मी. अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवाटीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मीती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरुनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षांपूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी ‘कोंकणाचा दरवाजा’ संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवजाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटवरील राजमाची, लोहगड, तुंग,तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाकल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीने वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होनी आंग्रे यांना हा किल्ला दिला. सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. १७७६ मध्ये सदाशिवराव तोतयाने संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला त्याने राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि बाजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. उल्हास नदीच्या या पात्रात कोंदीवडे आणि कोंढाणा जवळएका मोठ्या दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे. पूर्वी स्थानिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भा महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे. या परिसरात याला ‘जिजाऊ कुंड’ म्हणतात या कुंडात लोक मोठ्य श्रद्धेने सूर्यस्नान करतात.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : लोणवळ्याहून तुंगार्लीमार्गे राजमाचीला येतांना वाटेतच गावाच्या वेशीजवळ एक योद्ध्याचे स्मारक, अर्धवट तुटलेली तटबंदी, दरवाजाचे अवशेष, गणपति आणि मारुतिरायाची मूर्ती आहे. किल्लावरून, आजुबाजुचा दिसणारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्याच्या माचीवर वस्ती आहे तिला ‘उधेवाडी’ असे म्हणतात.

उदयसागर तलाव : पावसाळ्यात हा किल्ला मात्र ओसंडून वाहतो. तलावाच्या समोरील टेकाडं खाली उतरून गेल्यावर समोरच एक मोठे पठार लागते. पावसाळ्यात दरीतून पडणाऱ्या धबधब्याचे सुंद्र दृष्य दिसते. हिरवीगार वनश्री अगणित धबधबे आणि सतत कोळसाणारा पाऊस या अल्हाददायक वातावरणामुळे मनोन्मनी कुसुमाग्रजांच्या ओळी गुणगुणायला लागतात. ‘पलिकडे खळाळे इर्मळ निळसर पाणि उतुंग तरुंची उभी सभोती श्रेणी एकाकी धूसर पाऊलवाट मधे ही तिजवरून विहारे मनामध्ये वनराणी.

मनरंजन : उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहचतो. मनरंजनवर जाणारी वाट सोपी आहे. या किल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी आहे. किल्ल्यावर उजवीकडच्या वाटेवर जुन्या काळातीलकिल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यासमोरच छप्पर उडालेले उत्तम दगडीबांधकामाचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाकबहिरी, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो.

श्रीवर्धन : राजमाचीच्या असणाऱ्या दोन बालेकिल्ल्यापैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असे अवशेषांवरून दिसते. दरवाजाची कमान बऱ्यापैंकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. या गुहा म्हणजे दारुगोळ्याचे कोठार आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे. समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोट्याचा नयनरम्य तलाव हा सर्व परिसर दिसतो.

शंकराचे मंदिर : तलावाच्या पश्चिमेला एक सुंदर कळशीदार शंकराचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच गोमुख असून त्यातले पाणी समोरच्या टाक्यांमध्ये पडते. सध्या या मंदिराच्या उत्खननाचे काम गावकऱ्यांनी हाती घेतलेले आहे. राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती ‘कातळदरा’ या नावाने ओळखली जाते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला ‘भैरव डोंगर’ म्हणतात. अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत खडकात खोदलेल्या गुहा लागतात. श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक सखलपट्टी आहे. यावरच भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरासमोरच ३ दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे. येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन किल्ल्यावर जाणारी आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :

लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे : लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे राजमाची गावात यावे. ही वाट १९ कि.मी. ची आहे. वाटेने किल्लावर जाण्यास पाच तास लागतात.

कर्जतहून कोंदीवडे मार्गे : कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने यावे. इथून गडावर जाण्यास सुमारे ३ ते ४ तास लागतात.

उधेवाडी गावात राहण्याची सोय उत्तम होते. भैरवनाथाच्या मंदिरातही आणि बालेकिल्ल्यावर जातांना लागणाया गुहेतही राहाता येते. राजमाची रुलर एड एन्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेने बांधलेल्या खोल्यांमध्येही रहाण्याची व्यवस्था होते. राजमाची गावात जेवणाची उत्तम सोय होते. राजमाची गावात पाण्याची सोय होते. गडावर जाण्यासाठी तुंगार्ली मार्गे ५ तास, कर्जत-कोदिंवडे मार्गे २ तास लागतात.

कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुणे जिल्ह्यात मळवलीपासून (लोणावळा) ४-५ कि.मी. अंतरावर आहे. ६६ किलोमीटर अंतरावर लोणावळ्यानजीक आहेत. येथील चैत्यगृहाचे स्थापत्य शिल्पे सुंदर आहेत. कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. बोरघाट सातवाहन कालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणांहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. ५ वे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहे. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.कार्ला गुंफांमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहेत.

रचना

हा लेणी सोळा लेण्यांचा हा गट आहे व त्यात एक चैत्यगृह आणि इतर विहारे आहेत. चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. भारतात अशोकाने असे स्तंभ उभे केले होते. या मालिकेतील सारनाथच्या धर्तीवर हा इथला सिंहस्तंभ कोरला आहे. हा स्तंभ ४५ फूट उंचीचा आहे. त्याची बैठक वर्तुळाकार, आणि अंग सोळा कोनांमध्ये घडवलेले आहे. या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येतो. त्यावर आमलक, हर्मिकेचा चौथरा आहे. या संचावर चार सिंहाची आकृती कोरलेली आहे. या स्तंभाचा करविता ‘महारठी अग्निमित्रणक याच्या दातृत्वाचा भाषेतील लेख दिसतो.

चैत्यगृहाच्या उजव्या बाजूसही पूर्वी स्तंभ आणि त्यावर चक्र असावे असे अभ्यासकांना वाटते. याची एक सूचक शिल्पाकृती चैत्यगृहातील एका खांबावर काढलेली आहे. इथे सिंह आणि चक्र असलेल्या खांबांमध्ये स्तूप दिसत आहे. याशिवाय या चैत्यगृहाचे कान्हेरीच्या चैत्यगृहाशी साम्य असल्याचे दिसते कारण तेथेही असे दोन्ही स्तंभ दाखवलेले आहेत. चैत्यगृहाबाहेर सज्जा कोरलेला आहे. येथे मिथुन शिल्पाच्या जोडय़ा, हत्तींचे थर, गौतम बुद्धांचे त्यांच्या अनुयायांसह असलेले शिल्पपट, चैत्यकमानी आदि गोष्टी दिसून येतात. मिथुन शिल्पांतील स्त्रियांच्या डोक्यावर पदर घेतलेला दिसतो. तसेच कमरेला शेला आहे. पुरुषाने धोतर आणि डोक्यावर मुंडासे घातले आहे. स्त्रियांच्या हातात बांगडय़ा आहेत. तसेच पायातील विविध आकाराचे तोडे, कमरेवरच्या मेखला, गळ्यातील मण्यांचे हार, कर्णफुले, कपाळावरची कुंकू अशी आभूषणे दिसून येतात. इथे असलेल्या या मिथुन जोडय़ा तत्कालीन राज्यकर्त्यांच्या किंवा या लेण्यास दान देणाऱ्यांच्या असाव्यात असाही एक तर्क आहे. सज्ज्याच्या दोन्ही बाजूस अनेक मजली प्रासादांचे देखावे आहेत. याच्या तळाशी दोन्ही बाजूला तीन हत्तींची शिल्पे कोरलेली आहेत. यातील डाव्या बाजूकडील हत्तींवर पुढे गौतम बुद्धाच्या मूर्तीही कोरलेल्या आहेत.

चैत्यगृहाच्या सज्ज्यात या लेण्याच्या करवित्याचा लेख आहे. ‘वेजयंतितो सेठीना भूतपालेन सेलघरम परिनिठापितम् जंबुदिपम्ही उतमम्’ वैजयन्तिचा श्रेष्ठी भूतपाल याने तयार केलेले हे लेणे जम्बुद्वीपात उत्कृष्ट आहे, असा याचा अर्थ होतो.

लेख

कार्ल्यांच्या या लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपीतले ३५ लेख दिसून आले आहेत. यातील बहुतेक दानधर्म विषयक आहेत. या लेखातून तत्कालीन समाज, त्यांचे नातेसंबंध, रुढी-परंपरा, व्यापार-व्यवसाय, चलन असे अनेक विषय समजू शकतात. धेनुकाकट म्हणजे आजचे डहाणू, सोपारक (आजचे सोपारा), करिजक (कार्ल्याच्या उत्तरेला असलेले करंजगाव) प्रभास म्हणजे आजच्या काठेवाड भागातील प्रभासतीर्थ वैजयंती म्हणजे आजचे कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्य़ातील बनवासी अशा अनेक गावांचे उल्लेख या लेखांतून दिसून येतात. चैत्यगृहाच्या व्हरांडय़ाच्या भिंतीवरील एका लेखात ‘मामालाहारे’ हा शब्द आलेला आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेत एखाद्या ठरावीक गावांच्या प्रदेशास – प्रशासकीय भागास ‘आहार’ असे म्हणत. तर ‘मामल’ म्हणजे आजचे मावळ! मावळ तालुक्याचा हा सर्वात प्राचीन उल्लेख असावा. या लेखांमधून वढकी (सुतारकाम), गंधक (सुगंधी द्रव्याचा व्यापार) अशा काही व्यवसायांचीही ओळख होते.

Check Also

महडचा वरदविनायक

Varadvinayak Mahad महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ …

Leave a Reply