वटवृक्षाचे आत्मवृत्त

परवा, वटपौर्णिमा साजरी झाली. सकाळीच आमच्या परिसरातील वडाच्या झाडाजवळ बायकांची मोठी गर्दी दिसली होती. बायकांची भांडण वगैरे चालू आहे की काय, असा विचार मनात आला. पण, एवढ्या नटून-थटून कोणी भांडायला जमणार नव्हते. परंतू, जवळ गेल्यावर समजले की, सर्वजणी वडाच्या झाडाची पूजा करायला जमल्या आहेत. परिसरात ते एकच वडाचे झाड होते. त्यामुळे गर्दी होणार हे स्वभाविकच होते. तरी ह्या सर्व नशीबवानच म्हणायला हव्यात की, त्यांना निदान वडाचे झाड तरी मिळाले. मुंबईच्या स्त्रियांना तर वडाच्या झाडाची फांदी बाजारातून विकत आणावी लागते व त्याभोवती त्या प्रदक्षिणा घालतात. त्यामानाने नाशिकच्या स्त्रिया नशिबवान मानाच्या लागतील. बिचाऱ्या एकाच वडासमोर जमलेल्या सर्वजणी पाहून त्या वडाला काय वाटत असेल? असा विचार मनात आल्याने वडाच्या झाडाचे आत्मवृत्त लिहिण्याची कल्पना सुचली. अशा प्रकारचे आत्मवृत्त मी पहिल्यांदाच लिहित असल्याने ’वाचकांनी चूक-भूल देणे घेणे…’
मुलांनो, आज मी तुम्हाला माझी कैफियत सांगणार आहे. ऐकाल ना? काय करू… कोणी माझ्याकडे बघायलाही तयार नसते. निदान तुम्ही तरी माझ्याजवळ येता, खेळता. त्यामुळे मला खूप आनंद मिळतो. त्या मोठ्या लोकांना माझ्याकडे बघायला वेळच नाही. सतत आपल्या कामात गुंतलेले असतात. माझ्याकडून कोणालाही फळं व फुलं मिळत नाहीत, म्हणून मी नेहमीच दुर्लक्षित असतो. कुणीतरी सांगितलेच आहे की, जगातील कोणतीच गोष्ट ही निरूपयोगी नाही. त्यामुळे मला दिलासा मिळाला आहे. वाटत असलो तरी मीही निरूपयोगी नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. परवाच मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला.

परवा वटपौर्णिमा साजरी झाली. मी त्याला माझा वाढदिवस मानतो. कधी नव्हे ते लोक माझ्याकडे पाहतात व आपुलकीने पाणीही घालतात. माझा वाढदिवस अर्थात वटपौर्णिमा कधी आहे, याची आठवण मला कधीच ठेवावी लागत नाही. जेव्हा परिसरातील स्त्रिया माझी पूजा करायाला येतील, तेव्हाच माझा वाढदिवस असतो असे मी मानतो. पण, त्याकरिता पूर्ण वर्षभर वाट पाहावी लागते. मला याचे समाधान मात्र निश्चित आहे की, निदान वर्षातून एकदा तरी लोक माझी आठवण काढतात. याकरिता मी त्या सावित्री मातेला धन्यवाद देतो, जिने यमाच्या हातून आपल्या पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणले होते. तेव्हापासून आपल्या देशात वटपौर्णिमा साजरी केली जाते. इतर दिवशी माझ्याकडे कोणी ढुंकुनही पाहत नाही.

परवा इथे खूप स्त्रिया जमल्या होत्या. सर्वजणी माझ्या भोवती प्रदक्षिणा घालत होत्या. पण, मला त्या दोऱ्या बांधतात हे फारसे आवडत नाही. शिवाय एकदा बांधलेली दोरी परत कधीच निघत नाही. पुढच्या वर्षीपर्यंत ती तुटायला येते तोच पुन्हा नवी वटपौर्णिमा आलेली असते. त्यामुळे मला बांधून गेल्यासारखे वाटते. आता तर ती माझी ओळख बनून राहिली आहे. ज्या झाडाला दोऱ्या बांधल्या असतील, ते झाड वडाचे असते, अशी व्याख्या आधुनिक आईने मुलासाठी बनविली आहे. पूर्वी आई सांगायची की, ज्या झाडाला पारंब्या असतील ते झाड वडाचे होय. पण, आताच्या मुलांना पारंब्या म्हणजे काय? तेच माहित नसते त्यामुळे आयांनी मुलांना समजविण्याचा सोपा मार्ग सुचविला आहे. या कारणाने मात्र माझी ओळखच पुसून गेली आहे, याचे वाईट वाटते. काही दिवसांपूर्वी पाहिलेल्या एका प्रसंगाने तर माझी झोपच उडविली होती. आजच्या काळातील एक आधुनिक आई आपल्या पिंटूला घेऊन त्याच्या ’स्कूल’ला सोडायला चालली होती. तेवढ्यात त्या पिंटूचे लक्ष माझ्याकडे गेले. व त्याने उत्सुकतेने आपल्या मातोश्रींना विचारले, ’मम्मी मम्मी, त्या ट्रीचे नेम काय आहे?’ त्याची एवढी शुद्ध मराठी मला समजलीच नाही. त्याच्या आईलाही उत्तर देता आले नाही. ती म्हटली, मी तुला टुमारोला सांगते म्हणून. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा या मायलेकांची जोडी माझ्याजवळ आली तेव्हा मम्मीने पिंटूला सांगितले की, ’ही बनियन ट्री आहे!’. तेव्हा मात्र मला कसेकसेच झाले. मी काय… बनियन देणारे झाड आहे? इंग्रजीमध्ये मला ’बनियन ट्री’ म्हणतात असे जेव्हा मला समजले तेव्हा माझे भवितव्य किती ’उज्ज्वल’ आहे, याची खात्री मला पटली. आणखी काही वर्षांनी माझी ओळख ’बनियन ट्री’ अशीच होणार आहे, याचे वाईट वाटू लागले होते.

त्यादिवशी वटपौर्णिमेला बायका जमल्या तेव्हा त्या नक्की सण साजरा करायला आल्या आहेत की सामुहिक वार्तालाभ करायला? तेच समजत नव्हते. सतत शब्दसुमने ही प्रत्येकीच्या मुखातून बाहेर पडत होती. त्यामुळे कोण काय बोलत आहे, तेच समजत नव्हते. माझ्या वाढदिवसाला माझ्या जवळ सर्वात जास्त ध्वनी प्रदूषण होत असावे, असे वाटून गेले. याची मला फारशी सवय नाही. पण, दर एका वर्षाने मला हा प्रसंग निभावून न्यावाच लागतो. त्यापेक्षा तुम्ही मुलेच बरी. माझ्यासोबत खेळताना दंगा जरी केला तरी, त्याने मला त्रास होत नाही. पण, आजकाल तुम्हीही माझ्याशी कधी खेळत नाही. या परिसरात जेव्हा शहरी निवास कमी होता तेव्हा इथली मुले माझ्यासोबत सूरपारंब्या खेळायची. मलाही त्यांच्या सहवासात खूप आनंद उपभोगता यायचा. पण, आताच्या मुलांना असे खेळ माहितच नाहीत. आज मुलं केवळ घरात बसून त्या इडियट बॉक्स समोर बसलेले असतात किंवा कॉम्प्युटरवर गेम खेळत असतात. त्यांना घराबाहेर खेळाता येत नाही. फारफार तर घराबाहेर ते क्रिकेटच खेळतात. त्यामुळे माझा व तुम्हा लहान मुलांचा सहवास आता संपुष्टात येऊ लागला आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे, असे म्हणतात. पण, हा बदल निसर्गच्याच मुळाशी येवू लागला आहे. पुढील काही वर्षांत माझ्यासारख्या वडाच्या झाडाला तुम्ही मानव मात्र निरूपयोगी ठरवून टाकाल.

शहरीकरणाच्या नादात आज मोठी वृक्षकत्तल तुम्ही करत आहात. पण, त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडून गेला आहे, याचा विचार करणारे फारच थोडे आहेत. मागे एकदा तुमच्या खासदाराने वृक्षप्रेमींना सुनावले होते की, आम्ही एवढे प्रयत्न करून रस्तेविकास प्रकल्प आपल्या शहरात आणतो आणि तुम्ही ते होऊ देत नाहित. खरोखर कीव करावीशी वाटते अशा माणसांची. विकास करू नये, रस्ते बांधू नये, असे कोणी म्हणत नाही. पण, जितकी झाडे तोडायची आहेत, त्याच्या तिप्पट झाडे लावल्याशिवाय झाडे तोडण्यास कायदाही परवानगी देत नाही. आधी तिप्पट झाडे लावा मगच झाडे तोडा, अशी मागणी करणाऱ्या वृक्षप्रेमींचे काय चुकले? आमच्या इथल्या महामार्गाचे रूंदीकरण करण्यासाठी ही सारी वृक्षकत्तल होणार आहे. या रस्त्याशेजारील झाडांत आमची वडाची झाडे अर्थात वटवृक्षच सर्वात जास्त आहेत. ही सर्व झाडे तोडल्यास वडाची प्रजात या शहरात किती मोठ्या संख्येने कमी होईल, याची मला फार भीती वाटते. पण, काय करू या पृथ्वीवर कर्ता करविता हा देव नसून मानवच आहे, हेच मोठे दुर्दैव आहे. त्याच्यापुढे आम्ही तरी काय करणार?

काही वर्षांनी आज मुंबईमध्ये जशी माझी व इतर झाडांची स्थिती आहे तशीच अन्य शहरातही होणार आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल साधण्यासाठी पुढची पिढी एक जबाबदार पिढी म्हणून तयार होणे गरजेचे आहे. म्हणूनच माझी ही कहाणी मी तुम्हाला सांगितली. भविष्यात माझे अस्तित्व केवळ छायाचित्रातच मर्यादित राहू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर ते टिकवण्यासाठी आता तुम्हीच मला मदत करा…

Check Also

Shetkari Marathi Essay

भारतीय शेतकरी निबंध मराठी भारत हा कृषी देश आहे. येथे 75 टक्के गावे आहेत. या …

Ganeshotsav Marathi Nibandh

गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांच़ा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ …

Railway station varil ek tas marathi nibandh

रेल्वे स्टेशनवरील एक तास मागच्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मी मित्रांसह मुंबईहून माउंट अबूला जात होतो. …

Mi pahileli Leni

मी पाहिलेली लेणी आईला बरेच दिवस एकविरा देवीला जायचे होते. तेका दादा म्हणाला, ‘राजा,चल ना …

Leave a Reply