शाळेच मनोगत

गणिताचा रट्टाळ तास सुरू होता. गणितं पूर्ण करत असतानाच सोपानदादा सूचना घेऊन आल्याने आख्खा वर्ग हेऽऽऽऽऽऽऽ’ करून ओरडला. बाईंनी सांस्कृतिक कला मंचा’च्या निबंध स्पर्धेसाठीचे विषय वाचून दाखवले. त्यातला एक विषय ऐकून तर सगळे अजूनच चेकाळले.—कारण विषयच तसा होता—” शाळा नसतील तर—!”

विषय ऐकूनच मी मनाशी पक्कं ठरवून टाकलं होतं की, आपण स्पर्धेत भाग घ्यायचाच.’ कारण रोज सकाळी डोळे चोळत लवकर उठताना मनात येतंच—शीः! कशाला ही शाळा?’ निदान आमचे निबंध वाचून तरी शाळा-प्रकरण बंदच करायचं शहाणपण कुणाला सुचलं तर फारच छान होईल असंही मला वाटलं. याचा आणखी एक फायदा म्हणजे निबंधाचे मुद्दे काढण्यासाठी कुणाचीही मदत घ्यायला नको! कारण सगळे माझ्याच मनातले मुद्दे!

मी शाळा बंद झाल्याच्या थाटात आनंदाने उड्या मारत घरी गेले आणि एका कागदावर कच्चे मुद्दे काढायला सुरुवात केली. शाळा नसतील तर—तर—तर— कित्ती बरं होईल! लवकर उठायला नको, उशीर झाल्यामुळे होणारी शिक्षा नको, शिस्त नको,अभ्यास नको, जड जड दप्तरं नकोत, नावडते विषय नकोत, घरच्या अभ्यासासाठी घरच्यांची कटकट नको, निकालाचं दडपण नको, स्पर्धा नकोत, इतर उपक्रम नकोत—अरेच्या! डोक्याला नस्ता ताप देणार्याझ या सगळ्याच गोष्टी निकालात निघतील. मग काय? हातात वेळच वेळ!! मला हवं ते करायला रान मोकळंच होईल!
या ‘मोकळ्या राना’त स्वच्छंद बागडताना मी काय काय बरं करेन?

मला सकाळी उशिरापर्यंत झोपता येईल. भरपूर खेळता येईल. मनमुराद सायकल चालवता येईल.अवांतर वाचन तासन्‍ तास करता येईल. टी.व्ही. भरपूर पाहता येईल. मनात येईल तेव्हा माझी लाडकी हार्मोनियम काढून कितीही वेळ वाजवता येईल. माझे इतर छंदही मनसोक्त पुरवता येतील. हस्तकला, चित्रकला, मातीकाम, रंगकाम असेही वेगळेच छंद जोपासता येतील. वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देता येईल. कविता रचता येतील. गोष्टी लिहिता येतील. वेगळ्या नावीन्यपूर्ण कला शिकता येतील.

एरवी शाळेच्या परिपाठाच्या वेळी मी हार्मोनियमवर राष्ट्रगीत आणि प्रार्थना वाजवते. परिपाठाव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांमध्ये मला हार्मोनियम वाजवायची संधी मिळते. शाळेत होणार्याई ‘जनरल नॉलेज’ च्या स्पर्धेमध्ये मी केलेलं अवांतर वाचन खूपच उपयोगी पडतं. मी पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांचा आनंद, मी शिकलेल्या कला माझ्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींशी आणि शिक्षकांशी ‘शेअर’ करता येतात.मी या गोष्टी करीन तर खरं, पण त्यांचा घेतलेला आनंद मी कुणाशी शेअर करू? वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यावर कधीकधी बक्षिसं मिळतात, तेव्हा घरातून कौतुक होतंच, पण शाळेतल्या बाईही कौतुकाची थाप पाठीवर देतात.(शिवाय शाळेतल्या मित्र-मैत्रिणींमध्येही कॉलर ताठ करून मिरवता येतं.) आता हेच पाहा ना! ‘सांस्कृतिक कला मंचा’च्या वेगवेगळ्या स्पर्धांच्या सूचना शाळा नसत्या तर कुठून मिळाल्या असत्या ?

अभ्यास नाही म्हणून परीक्षाही नाहीत. शालेय जीवनातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे १०वी ची शालान्त परीक्षा. जर ही परीक्षाच दिली नाही तर कॉलेजमध्ये प्रवेश कसा मिळेल? आणि जर कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं नाही, तर नोकरी कुठून मिळेल? नोकरी नसेल तर, आपला उदरनिर्वाह कसा होईल?

आम्हाला चांगल्या सवयी लावणं, शिस्त लावणं, एक चांगला नागरिक बनवणं हे काम घरी आई-वडील करतात. आणि शाळेत शिक्षक! संस्कारधनाचे कण वेचण्यासाठीचं आमचं दुसरं घर म्हणजे शाळाच नव्हे का?
आधी शाळा नसतील तर—’ या विचारानेच मला खूप आनंद झाला होता. पण हळूहळू माझ्याच लक्षात आलं की शाळा म्हणजे फक्त न आवडणार्याठ गोष्टींची लांबलचक यादी नाही, तर ज्यांचं वर्णनही करता येणार नाही अशा कितीतरी गोष्टी त्यात सामावलेल्या आहेत. शाळा नसतील तर खूप काही चांगल्या गोष्टी करू शकू हे खरं, पण ज्या गोष्टी फक्त शाळाच आम्हाला देऊ शकते, त्या सगळ्या गोष्टींना आम्ही मुकू.

तेव्हा शाळा नसतील तर आपण खूप आनंद घेऊ शकू हे खूळ डोक्यातून काढून टाकून नव्या उमेदीने शाळेचा आनंद मनमुराद लुटू या आणि इतरांनाही तो लुटू देऊ या.

admin

Leave a Reply

Next Post

पर्यावरण दिन

Tue Apr 30 , 2019
संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंबलीने १९७२ च्या स्टॉकहोम येथील पर्यावरणविषयक परिषदेच्या निमित्ताने ‘५ जून’ हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जाहीर केला. पर्यावरणविषयक जागतिक जनजागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी व त्याबाबत राजकीय सहाय्य व कृती वाढवण्यासाठी हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. UNEP म्हणजे United Nations Environment Programme द्वारे दरव्रषी ५ जून […]
WhatsApp chat
%d bloggers like this: