loading...

सर चंद्रशेखर व्यंकट रामन

रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे झाला. १९०४ मध्ये त्यांनी मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजातून बी. ए. पदवी प्रथम क्रमांकाने व भौतिकी विषयातील सुवर्णपदक मिळवून संपादन केली. पुढे १९०७ मध्ये त्यांनी भौतिकीतील एम.ए. पदवी उच्चतम प्रावीण्यासह मिळविली. तोपावेतो त्यांनी प्रकाशकी व ध्वनिकी या विषयांत मूलभूत संशोधनही केलेले होते; परंतु त्या काळी भारतात वैज्ञानिक संशोधनाला फारसा वाव नसल्याने ते भारत सरकारच्या अर्थ खात्यातील नोकरीसाठी स्पर्धात्मक परीक्षेला बसले. या परीक्षेत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि कलकत्ता येथे त्यांची साहाय्यक महालेखापाल या पदावर नेमणूक झाली. त्यानंतरच्या दहा वर्षांत त्यांनी आपल्या कार्यालयीन कामाबरोबरच कलकत्ता येथील इंडियन ॲसोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेच्या प्रयोगशाळेत आपले संशोधन कार्य पुढे चालू ठेवले. त्यांच्या कार्याचे महत्त्व ओळखून कलकत्ता विद्यापीठात नव्यानेच स्थापन झालेल्या भौतिकीच्या पालिट अध्यासनावर १९१७ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. सोळा वर्षे या पदावर काम केल्यावर ते १९३३ मध्ये बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत भौतिकी विभागाचे प्रमुख झाले. पुढे त्यांनी बंगलोर येथेच स्वतः स्थापन केलेल्या रामन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च या संस्थेचे संचालकपद १९४८ पासून भूषविले.

loading...

कलकत्ता येथे अर्थ खात्यातील नोकरीत असताना त्यांनी कंपने व ध्वनी (यात तंतूंच्या आंदोलनांच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक अभ्यासाचा समावेश होता) आणि पश्चिमी आणि भारतीय वाद्ये (विशेषतः व्हायोलिन, चेलो, पियानो, वीणा, सतार, मृदंग, तबला इ.) यांसंबंधी संशोधन कार्य केले. कलकत्ता विद्यापीठात असताना देखील त्यांनी ॲसोसिएशनच्या प्रयोगशाळेत प्रकाशकी व भौतिकी या विषयांतील संशोधन चालू ठेवले. १९२१ मध्ये ऑक्सफर्ड येथे भरलेल्या ब्रिटिश साम्राज्य विद्यापीठ परिषदेत रामन यांनी कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. इंग्लंडमध्ये त्या वेळी त्यांनी रॉयल सोसायटीपुढे तंतुवाद्यांच्या सिद्धांतावर व्याख्यानही दिले. भारताकडे परत येत असताना भूमध्य समुद्राच्या गडद निळ्या रंगाने ते प्रभावित झाले व कलकत्त्याला आल्यावर त्यांनी या निळ्या रंगाचे कारण शोधून काढण्याचे कार्य हाती घेतले. लॉर्ड रॅली यांनी यासंबंधी दिलेले स्पष्टीकरण रामन यांना खात्रीलायक वाटले नाही. १९२२ मध्ये प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी यामध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या निबंधात त्यांनी ज्याप्रमाणे हवेतील रेणूंनी प्रकाशाचे प्रकीर्णन केल्याने आकाशाला प्राप्त होणाऱ्या रंगांचे स्पष्टीकरण देता येते. तद्वतच सागराच्या निळ्या रंगाचे स्पष्टीकरण पाण्याच्या रेणूंनी केलेल्या प्रकाशाच्या प्रकीर्णनाद्वारे देता येईल, असे प्रतिपादन केले. सर्वसाधारण परिस्थितीत पाणी सूर्यप्रकाशाचे प्रकीर्णन धूलिकणरहित हवेपेक्षा १५० पटींनी अधिक करते असे प्रयोगाने त्यांनी दाखवून दिले. १९२४-२५ मध्ये त्यांनी कॅनडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, जर्मनी, इटली व स्वित्झर्लंड या देशांचा प्रवास करून तेथील वैज्ञानिक संस्थांना भेटी दिल्या.

रामन यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर विविध पदार्थांनी (विशेषतः द्रवांनी व वायूंनी) उपलब्ध कंप्रतांच्या (दर सेकंदाला होणाऱ्या कंपनसंख्यांच्या) प्रकाशाच्या होणाऱ्या प्रकीर्णनाचा अभ्यास केला. एप्रिल १९२३ मध्ये त्यांचे सहकारी के. आर्. रामनाथन यांना नेहमीच्या प्रकीर्णित प्रकाशाबरोबरच बदललेल्या तरंगलांबींचे दुय्यम व दुर्बल प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) आढळले. रामन व के. एस्. कृष्णन यांनी हा परिणाम अलग करण्याचे कार्य हाती घेतले. त्यांनी आपाती प्रकीर्णित प्रकाशाच्या मार्गांत पूरक प्रकाश गाळण्या ठेवल्या आणि काळजीपूर्वक शुद्ध केलेल्या द्रव व धूलिकणरहित हवा या दोहोंनी सूर्यप्रकाशाच्या केंद्रित शलाकेच्या केलेल्या प्रकीर्णनात त्यांना नवीन प्रकारचे दुय्यम प्रारण आढळले. हा शोध त्यांनी ‘नेचर’ या ब्रिटिश नियतकालिकास फेब्रुवारी १९२८ मध्ये पत्राद्वारे कळविला. रामन यांनी पुढे पाऱ्याच्या विद्युत् प्रज्योतीचा प्रकाश उद्गम म्हणून उपयोग करून आपल्या प्रयोगात अधिक सुधारणा केली. दुय्यम प्रारणात अनेक वर्णपट रेषांची अधिक लांबीच्या तरंगलांब्यांकडे स्थानच्युती झाल्याचे दिसून आले. ही स्थानच्युती परीक्षित पदार्थाचे वैशिष्ट्य असल्याचे व या स्थानच्युतीवरून प्रकीर्णन करणारा रेणू ऊर्जा शोषण करीत असल्याचे दिसून आले. रामन व कृष्णन यांच्यानंतर थोड्याच काळाने जी. लँड्‌सबर्ग व एल्. मांडेलस्टाम या रशियन संशोधकांना हाच आविष्कार क्वॉर्ट्‌झमध्ये आढळला; परंतु रामन यांनी या परिणामाविषयी केलेल्या विवरणावरून त्यांनी केलेले संशोधन अधिक सखोल असल्याचे प्रस्थापित झाले. या शोधाकरिताच त्यांना नोबेल पारितोषिकाचा सन्मान प्राप्त झाला. रेणवीय संरचना व प्रारण यांसंबंधी पुढे झालेल्या संशोधनावर रामन परिणामाचा इतका मोठा प्रभाव पडला की, रामन यांना आधुनिक भौतिकीच्या इतिहासातील एक आद्य विचारवंत म्हणून सर्वत्र मान्यता मिळाली.

रामन यांनी एन्. एस्. नागेंद्रनाथ यांच्या बरोबर द्रवातील श्राव्यातीत (मानवी श्रवणक्षमतेच्या पलीकडील म्हणजे २०,००० हर्ट्‌झपेक्षा जास्त कंप्रतेच्या) ध्वनितरंगांमुळे प्रारणाच्या होणाऱ्या प्रकीर्णनासंबंधी १९३५ व १९३६ मध्ये दोन महत्त्वाचे निबंध प्रसिद्ध केले. त्यानंतर त्यांनी साध्या प्रकाशात ठेवलेल्या स्फटिकातील अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) कंपनांवर क्ष-किरणांमुळे होणाऱ्या परिणामासंबंधी प्रायोगिक व सैद्धांतिक संशोधन केले. १९४८ मध्ये त्यांनी स्फटिकांच्या वर्णपटविज्ञानीय वर्तनाचा अभ्यास करून स्फटिक गतिकीतील (स्फटिक जालकाच्या ऊष्मीय कंपनांसंबंधीच्या अभ्यासातील) मूलभूत प्रश्नाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मांडला १९५०–५८ या काळात त्यांनी प्रामुख्याने हिऱ्याच्या संरचनेचा आणि गुणधर्मांचा तसेच लॅब्रॅडोराइट, अकिक, ओपल, मोती इ. अनेक रंगदीप्त (पातळ पटलाच्या पुढील व मागील पृष्ठभागांवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशात व्यतिकरण होऊन विविध रंग निर्माण होणाऱ्या) पदार्थाच्या संरचनेचा व प्रकाशीय गुणधर्मांचा अभ्यास केला. १९६० नंतर त्यांनी रंग व त्यांची संवेदना यांविषयी संशोधन करण्यास प्रारंभ केला. त्यांनी फुलांचा वर्णपटविज्ञानीय अभ्यास करून पाकळ्यांचे रंग व विविध फुलांच्या जातींचे (गुलाब, ॲस्टर, हिबिस्कस इ.) वर्णपट यांसंबंधी १९६३ मध्ये एक निबंधमाला प्रसिद्ध केली. १९६४ मध्ये त्यांनी रंगदृष्टीसंबंधी नवीन सिद्धांत मांडला. या विषयावर त्यांनी लिहिलेले ४३ निबंध १९६८ मध्ये फिजिऑलॉजी ऑफ व्हिजन या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आले.

रामन यांनी १९२६ मध्ये इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स हे नियतकालिक स्थापन केले व ते त्याचे प्रदीर्घ काळ संपादक होते. १९३४ मध्ये त्यांनी इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसची स्थापना केली व प्रथमपासून ते तिचे अध्यक्ष होते. ॲकॅडेमीच्या प्रोसिडिंग्ज या नियतकालिकाच्या स्थापनेसही त्यांनी चालना दिली. बंगलोर येथील करंट सायन्स ॲसोसिएशनचेही ते अध्यक्ष होते. त्यांच्या काळी भारतात स्थापन झालेल्या बहुतेक सर्व संशोधन संस्थांचा पाया घालण्यात त्यांचा सहभाग होता. त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. त्यांनी विविध विषयांवर ५०० हून अधिक संशोधनपर निबंध वा लेख लिहिले आणि ते फिलॉसॉफिकल मॅगझीन, नेचर, फिजिकल, रिव्ह्यू, प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी, Zeitschrift fur Physik, इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स, प्रोसिडिंग्ज ऑफ द इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, करंट सायन्स इ. नियकालिकांत प्रसिद्ध झाले. यांखेरीज त्यांनी Handbuch der Physik या जर्मन विश्वकोशाच्या आठव्या खंडात तंतुवाद्यांच्या सिद्धांताविषयी एक महत्त्वाची नोंद लिहिली. द न्यू फिजिक्स (१९५१) या आपल्या ग्रंथात त्यांनी आधुनिक भौतिकीसंबंधीचे त्यांचे विचार परखडपणे मांडलेले आहेत.

लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १९२४ मध्ये त्यांची निवड झाली. ब्रिटिश सरकारने त्यांना १९२९ मध्ये नाईट हा किताब दिला. अनेक सन्माननीय डॉक्टरेट पदव्यांचा व वैज्ञानिक संस्थांच्या सदस्यत्वाचा त्यांना मान मिळाला होता. यांखेरीज त्यांना इटालियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे मेत्यूसी पदक (१९२८), रॉयल सोसायटीचे ह्यूझ पदक (१९३०) व फिलाडेल्फियाच्या फ्रँक्लिन इन्स्टिट्यूटचे फ्रँक्लिन पदक (१९४१) हे बहुमान प्राप्त झाले. भारत सरकारने त्यांना भारतरत्न (१९५४) हा सर्वोच्च नागरी पुरस्काराचा सन्मान दिला. ते बंगलोर येथे मृत्यू पावले.

admin

Leave a Reply

Next Post

मकरसंक्रांत

Mon Apr 29 , 2019
मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे. दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरूनन पाहिले असता, […]
loading...
WhatsApp chat
%d bloggers like this: