सांगली जिल्हा

सांगली जिल्हा

प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.मिरज येथील तंतुवाद्ये अतिशय प्रसिद्ध असून येथील वाद्ये जगभर पाठविली जातात.

सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव(कर्नाटक), नैर्ऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला रत्‍नागिरी हे जिल्हे आहेत. पश्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्‍याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.

सांगली जिल्ह्यातील तालुके :- शिराळा, वाळवा, तासगांव, खानापूर (विटा), आटपाडी, कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत व कडेगांव

जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठे महांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरजतालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. एका टोकाच्या शिराळा तालुक्यात जंगल आहे. तर दुसरीकडे जततालुक्यात मैलोनमैल ओसाड जमीन आहे. महाराष्ट्र-कर्नाटकसीमेवर असलेल्या सांगलीचा निम्मा लोकव्यवहार कानडी भाषेत चालतो. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी व उतर-दक्षिण लांबी ९६ किमी आहे.

सांगली जिल्हा कृष्णा, वारणा नदी व उत्तरेस महादेवाच्या डोंगराखालील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसला आहे. कृष्णा नदीची जिल्ह्यातली लांबी १०५ कि.मी आहे. जिल्ह्याचे तापमान किमान १४ अंश सेंटिग्रेड व कमाल ४२ अंश सेंटिग्रेड यांदरम्यान असते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४००-४५० मिलिमीटर आहे. जिल्ह्याची २००१सालची लोकसंख्या २८,२०,५७५ इतकी आहे.

सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली. सांगलीचे गणपती मंदिर हे खाजगी असल्यामुळे त्याचा सर्वा खर्च श्रीमंतराजे हे करतात.

पर्यटन

 • गणेशदुर्ग किल्ला : कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे.
 • गणेश मंदिर : १८४४ मध्ये श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी बांधलेले येथील गणेश मंदिर प्रसिद्ध असून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांनी या मंदिरात बैठका घेतल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात.
 • कृष्णा व वारणा नद्यांचा संगम : सांगलीपासून जवळच हरिपूर येथे कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम झाला असून येथील संगमेश्र्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्फूर्तिस्थळ नावाचे स्मारक आहे.
 • कृष्णा-येरळा संगमावरील ब्रम्हनाळ आणि बहे येथील रामलिंग इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
 • मिरज : मिरज हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून येथील भुईकोट किल्ला, वानलेस मिशन दवाखाना व मीरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहेत.
 • ख्वाजा मीरासाहेब दर्गा : हा ५०० वर्षे जुना असून, सर्व धर्मांतील व पंथातील लोक येथे दर्शनास येतात.
 • सागरेश्वर अभयारण्य : सांगलीजवळील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. खानापूर, पलूस, वाळवा या तालुक्यांत हे अभयारण्य पसरले असून हे हरणांसाठी राखीव आहे.या अभयारण्याची निर्मिती वृक्षमित्र.धों.म.मोहिते यांनी केली. त्यांना सागरेश्वर अभायारण्याचे जनक म्हटले जाते.
 • चांदोली (ता. बत्तीस शिराळा) : हे धरण वारणा नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली हे अभयारण्य येते. या जंगलात गवा ,अस्वल, बिबट्या हे प्राणी आढळतात

.

 • औदुंबर : सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे कृष्णाकाठी दत्त मंदिर आहे. औदुंबर येथे राहूनच प्रसिद्ध कवी सुधांशूयांनी काव्यसाधना केली.
 • पेंटलोद येथील प्रचितगड, बाणूरचा भूपाळगड, तासगावचे गणपती मंदिर, कवठे-एकंद येथील सिद्धारामाचे मंदिर व त्या ठिकाणी दसर्‍याच्या वेळी रात्रभर होणारी फटाक्यांची आतषबाजी विशेष प्रसिद्ध आहे.
 • दंडोबा येथील उंच टेकडीवर शंकराचे प्राचीन मंदिर आहे.

@पेड विजयनगर पर्यटन स्थल:- हे स्थल तासगाव तालुक्यातील पेड वा व विजयनरच्या मध्य्ठीकानी आहे.तासगाव पासून २६किमी अंतरावर आहे. अतिशय अश्या निसरगरम्य ठिकाणी हे पर्यटन स्थळ बनवण्यात आले आहे. येथे MTDC हॉटेल्स आहेत. लहान जंगल आहे. तसेच गार्डन , मनोरंजनासाठी खेळणी आहेत . या पर्यटन स्थळांमध्ये खूप अश्या मोठ्या तलावाचा समावेश आहे

Check Also

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, …

Leave a Reply