संत सोपानदेव

संत सोपानदेव (Sant Sopan Kaka)

sc_21

sc_22

संत सोपानदेवांचे अभंग

पंढरी महात्म्य

उघडली दृष्टी इंदियासकट । वैकुंठीची वाट पंढरी जाणा ।।
दृष्टीभरी पाहे विठ्ठल दैवत । पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे ।।२।।
हाची मार्ग सोपा जनासी उघड । विषयाचें चाड टाकी परतें ।।३।।
सोपान म्हणे गुंफसी सर्वथा । मग नव्हे उलथा भक्तीपंथे ।।४।।

चला रे वैष्णवहो जाऊ पंढरीयेसी । प्रेमामृत खुण मागों त्या विठ्ठलासी ।।१।।
चालिले गोपाळ दाविताती वाकुंलिया । भरले प्रेमरसे मग ते वाताती टाळीया ।।२।।
दिंड्या गरुडटके मृदुंगाचे नाद । गाताती विठ्ठलनाम करिताती आल्हाद ।।३।।
पावले पंढरी भीमा देखियेली दृष्टी । वैष्णवाचा गजरु आनंदे हेलावली सृष्टी ।।४।।
गजरु गोपाळांचा श्रवणी पडियेला । शंखचक्र करीं विठ्ठल सामोरा आला ।।५।।
कांसवदृष्टी न्याहाळीतु रंगी नाचतु पै उगला । सोपान म्हणे आम्ही केला वाळूवंटी काला ।।६।।

आणीक ऐकेगा दूता । जेथे रामनाम कथा । तेथे करद्वय जोडूनी हनुमंता । सदा सन्मुख असिजे ।।१।।
रामनामी चाले घोषु । तो धन्य देशु धन्य दिवसु । प्रेम कळा महा उल्हासु । जगन्निवासु विनवितुसे ।।२।।
दिंड्या पताका मृदंग । टाळ घोष नामें सुरंग । तेथे आपण पांडुरंग । भक्तसंगे नाचत ।।३।।
तया भक्ता तिष्ठती मुक्ती । पुरुषार्थ तरी नामें कीर्ति । रामनामीं तया तृप्ती । ऐसे त्रिजगती यमु सांगतु ।।४।।
ज्या नामें शंकर निवाला । गणिका अजामेळ पद पावला । अहिल्येचा शाप दग्ध जाला ।तोची पान्हा दिधला पांडुरंगे ।।५।।
चित्रगुप्त म्हणती यमा । काय करावे गा धर्मा । लोक रातले रामनामा । पुरुषोत्तमा विठ्ठल देवा ।।६।।
कळिकाळासी दाटुगें नाम । रुद्रे धरिलें महा प्रेम । त्रिभुवनी विस्तारलें सप्रेम । रामनाम उच्चारी यम । तोही तरला जाणा ।।७।।
ऐसे नाम अगाध बीज । उच्चारी तो होय चतुर्भुज । सोपान म्हणे हे गुज । उमाशंकर देवाचे ।।८।।

READ  संत सेना न्हावी (Sant Sena Nhavi)

अभंग – ४
सर्वकाळ ध्यान हरिरूप ज्याचें । तया सर्व रूप साचे जवळी असे ।।१।।
हरि हरि जाला प्रपंच अबोला । हरिसुख निवाला तोचि धन्य ।।२।।
हरि हेचि मन संपन्न अखंड । नित्यता ब्रह्मांड त्याचे देही ।।३।।
सोपान विदेही सर्वरूपी बिंबतू । हरिरूपी रतु जीव शिव ।।४।।

अभंग ५
मनाचे मवाळ हरिरूप चिंतिती । रामकृष्ण मूर्ति नित्य कथा ।।१।।
रामकृष्ण ध्यान सदा पै सर्वदा । न पवेल आपदा नाना योनी ।।२।।
हरि ध्यान जप मुक्त पै अनंत । जीव शिवी रत सर्वकाळ ।।३।।
सोपान प्रेमा आनंद हरीचा । तुटला मोहाचा मोहपाश ।।४।।

अभंग ६
आवडीचें मागे प्रवृत्तीचे नेघें । नाममार्गे वळगे निघे राया ।।१।।
नाम परब्रह्म नाम परब्रह्म । नित्य रामनाम जपिजेसु ।।२।।
अंतरींचिया सुखे बाहिरिलिया वेखें । परब्रह्म मुखें जपतुसें ।।३।।
सोपान निवांत रामनाम मुखांत । नेणे दुजी मात हरिविण ।।४।।

अभंग ७
सबाह्य कोंदले निवांत उगलें । रामरसें रंगलें अरे जना ।।१।।
हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण । दिननिशी प्रश्न मुखें करा ।।२।।
तरा पै संसार रामनामें निरंतर । अखंड जिव्हार रामरसा ।।३।।
सोपान जपतु रामनामी रतु । नित्यता स्मरतु रामकृष्ण ।।४।।

अभंग ८
अव्यक्ताच्या घरी प्रकृति कामारी । निघे माजि घरी दडोनिया ।।१।।
तैसे नका करू प्रगट सर्वेश्वरू । हरीनाम उच्चारू जपा वाचे ।।२।।
विज्ञानी पै ज्ञान आटलेसे संपूर्ण । उभयता चैतन्य तैसा हरि ।।३।।
सोपान निवांत रामनामी रत । संसार उचित रामनामें ।।४।।

अभंग ९

मोक्षलागी धन वेंचावे नलगे । रामकृष्ण बोलगे जपीजेसु ।।१।।
रामकृष्ण मुखें तया अनंत सुखे । तो जाय विशेषे वैकुंठभुवनी ।।२।।
वेगाचेंनी वेगे जपा लागवेगें । प्रपंच वाऊगे हरिनामे ।।३।।
सोपान संचित रामनामामृत । नित्यता सेवित हरिकथा ।।४।।

READ  संत शिरोमणी नरहरी महाराज

अभंग १०
ज्याचे मुखी हरि तोचि धन्य ये जगी । तरला पै वेगी वेदु बोले ।।१।।
हरि हाचि आत्मा तत्व पै हे सोपे । हरितील पापे हरिनामे ।।२।।
वैकुंठीचे सुख नलगे पै चित्ती । हरि हेचि मूर्ति विठ्ठल ध्यावो ।।३।।
याचेनि स्मरणे कैवल्य साचार । सोपान विचार हरि जपे ।।४।।

%d bloggers like this: