भारतीय प्रजासत्ताक दिन, २६ जानेवारी मराठी भाषण, निबंध, माहिती, चारोळ्या

INDIAN REPUBLIC DAY 26TH JANUARY – MARATHI ESSAY

Here in this article, we have given you a sample Marathi essay and speech for 69th republic day of India. You can use content from essay and speech interchangeably, with necessary modifications of course. You can also make use of this information for paragraph and articles writing. We have given some republic day related marathi charoli at end of article.

भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध – २६ जानेवारी (Essay on Republic Day in Marathi)

भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी झाली आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला आणि म्हणूनच आपण २६ जानेवारी हा दिवस देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय घटक संघटनेने राज्यघटनेचा (संविधान) स्वीकार केला आणि २६ जानेवारी १९५० रोजी ते अंमलात आले. त्या दिवसापासून आपण एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश बनलो. दिनांक २६ जानेवारीची निवड करण्यात आली कारण १९३० मध्ये याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटीश भारत ब्रिटिश कॉमनवेल्थच्या दोन नवीन स्वतंत्र राजवटीत विभागला गेला, एक म्हणजे आपला भारत आणि दुसरा पाकिस्तान. भारत स्वतंत्र झाला असला तरी जॉर्ज सहावा भारताच्या संवैधानिक राजेशाहीचा प्रमुख होता आणि अर्ल माउंटबॅटन हा गव्हर्नर जनरल होता. या वेळी भारतकडे कायमस्वरूपी संविधान नव्हते, आपण भारत सरकार अधिनियम १९३५ ची सुधारित आवृत्ती वापरत होतो.

२८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. ४ नोव्हेंबर १९४७ रोजी समितीने विधानसभे समोर पहिला मसुदा सादर केला. विधानसभेत २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांत अनेक सत्रांमध्ये यावर चर्चा आणि सुधार होत राहिला. हे सत्र जनतेसाठी खुले होते. २४ जानेवारी १९५० रोजी विधानसभेच्या ३०८ सदस्यांनी मसुदा मान्य केला आणि संविधानाच्या दोन हस्तलिखित प्रती काढल्या, ज्यापैकी एक हिंदी मध्ये होती आणि दुसरी इंग्रजी मध्ये. दोन दिवसांनी २६जानेवारी १९५० रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली आणि भारत गणराज्य बनले. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून संबोधले गेले.

READ  लिंग विचार

संपूर्ण देशातल्या शाळा, शासकीय कार्यालये आणि खासगी कंपन्यांमध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आपण आपले घर, ऑफिस, गाडी तिरंगी रंगाचे फुगे, झेंडे, रांगोळी इत्यादीनी सुशोभित करतो. काही जण प्रजासत्ताक दिन घरी साजरा करतात तर कोणी सामाजिक मोहिमा आणि कार्यक्रमांसह साजरे करतात. शाळेच्या मैदान / कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो; उत्सवपूर्ण मोर्चे काढले जातात, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. मुख्य अतिथी विद्यालय / महाविद्यालयाच्या आवारात ध्वज वंदनासाठी येतात, अनेक सन्मानित व्यक्ती प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांना उपस्तीथी लावतात. ध्वजवंदना नंतर राष्ट्रगीत गायले जाते, सर्व जण राष्ट्रगीतासाठी उभे राहून त्याचा आदर राखतात. अतिथी, शिक्षक आपले भाषण देतात. काही शाळा देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात.

भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या समोर भारत सरकार राजधानी दिल्लीच्या राजपथ येथे प्रजासत्ताक दिन साजरा करते. या दिवशी, राजपथावर भव्य परेड होते जी भारतीय संस्कृती, वारसा आणि संरक्षण क्षमता दाखवून देते. शेकडो लोक राजपथला भेट देतात आणि या राष्ट्रीय उत्सवाचा आनंद घेतात. दूरदर्शन, विविध वृत्तवाहिन्यां आणि आजकाल यूट्यूब, फेसबुक वर हा उत्सव प्रसारित केला जातो. राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान हे संपूर्ण देशाला संबोधित करतात.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे अतिथी म्हणून विविध देश, सरकारच्या प्रमुखाना आमंत्रित केले जाते. वर्ष २०१८ साठी भारत ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या १० आसियान देशांच्या राज्य किंवा सरकारच्या प्रमुखांना आमंत्रित करीत आहे.

भारतीय संविधान किंवा घटना ही प्रजासत्ताक दिनाचा मूळ गाभा आहे. हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधान आपल्या मूलभूत हक्कांचा आराखडा, शासकीय संस्थांच्या संरचना, कार्यपद्धती, शक्ती आणि कर्तव्ये प्रस्थापित करते. सोबत भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार, निर्देशक तत्त्वे आणि कर्तव्यांची स्थापना करते. संविधानानुसार भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक देश आहे, जो न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्याचा प्रयत्न करतो.

संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये देखील दिली आहेत. स्वातंत्र्य, एकात्मता, धर्मनिरपेक्षता, संस्कृती आणि शिक्षण हक्क, घटनेतील उपाय हे आपले ६ मूलभूत अधिकार आहेत. मूलभूत कर्तव्ये सर्व नागरिकांना संविधानासह भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचा आदर करण्यास, त्याच्या वारसाचे संरक्षण करणे, त्याची संमिश्र संस्कृती जतन करणे आणि त्याच्या संरक्षणास सहाय्य करण्यासाठी बाध्य करते. ते सर्व भारतीयांना सामान्य बंधुत्वाची भावना वाढवण्यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी, वैज्ञानिक स्वभाव विकसित करण्यासाठी, हिंसेला आळा घालण्यासाठी बांधील करते.

READ  The Three Most Important Lessons

भारतीय प्रजासत्ताक दिन भाषण – २६ जानेवारी मराठी मध्ये (Republic Day Speech in Marathi)

अध्यक्ष महाशय, पुज्य गुरुजन वर्ग, आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रानो, सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या ६९व्या प्रजासत्ताक दिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा. मला या भाषणाच्या स्पर्धेत सहभाग होण्याची परवानगी दिल्याबद्दल आपल्या प्रेरणास्थान प्राचार्य मॅम यांचे मी आभार व्यक्त करतो/करते. भाषणाच्या तयारीसाठी मला मिस सुवर्णा यांचे आभार मानायला आवडेल.

आज मी फक्त भारतीय प्रजासत्ताक दिनाबद्दलची माहिती देणार नाही, तर आज मी आपल्या संविधानाचे महत्त्व, मूलभूत अधिकार आणि आपली संविधानिक कर्तव्ये यांच्याबद्दल बोलणार आहे.

आज आपण भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आणि मला हे सांगायला खूप वाईट वाटते कि, हजारो भारतीय नागरिक अजूनही भारताच्या स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातील फरक ओळखत नाहीत. आपल्याला या स्वातंत्र्याची, मूलभूत हक्कांची किंमत राहिली नाही का? हजारो स्वातंत्र्यसेनानी या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले, त्यांनी आपल्या कुटुंबाचे, जीवाचे बलिदान दिले, जेणेकरून भारताची पुढची पिढी स्वतंत्र देशात जन्म घेईल. हाच तो त्यांचा स्वप्नातला भारत का, आणि हेच त्यांच्या स्वप्नातले भारतीय नागरिक का?

जे लोक फरक ओळखत नाहीत त्यांच्यासाठी सांगतो, भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी क्रूर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. तरीही, आम्ही ब्रिटिश कॉमनवेल्थचे भाग होतो. आपल्याकडे आपले स्वतःचे संविधान (राज्यघटना) नव्हते. भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी महान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या टीमने एक प्रचंड आव्हान उचलले. दोन वर्षांनी अनेक सभा झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली, आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून सन्मानित करण्यात आले. संपूर्ण जगामध्ये हे प्रदीर्घ संविधान आहे.

संविधानाने आपल्याला शिक्षण, भाषण, गोपनीयता आदी जीवनावश्यक मूलभूत अधिकार दिले. भाषणाच्या अधिकाराशिवाय मी आज येथे भाषण देऊ शकलो नसतो. आपण संवैधानिक अधिकारांसाठी लढतो, तक्रार करतो, पण आपल्या संवैधानिक कर्तव्यासाठी कोणीही लढा देताना दिसत नाही. जे अज्ञानी आहेत, मी त्यांना असे सांगू इच्छितो की आपल्याला नागरिक म्हणून संविधानात जे हक्क दिले जातात तसेच आपली कर्तव्ये देखील संविधान निर्दिष्ट करते. आपण इतके अज्ञानी आहोत की आपल्याला हे माहित ही नाही की आपली काही घटनात्मक कर्तव्ये सुद्धा आहेत.

READ  Marathi Birthday Status

आज, ६९व्या प्रजासत्ताक दिनाच्या सुवर्ण समयी संकल्प करूयात की आपण आपल्या संविधानाचा अभ्यास करू, त्याचा आदर करू. हजारो स्वतंत्र सेनानी आणि डॉ.आंबेडकरांच्या बलिदाचे, मेहनतीचे चीझ करूयात. आपल्याला आपल्या अधिकारांसाठी लढा देताच राहायचे आहे पण सोबत आपली राष्ट्रीय कर्त्यवे सुद्धा निभावली पाहिजेत.

पुन्हा एकदा मी आपल्या प्रमुख महोदयाचं आभार व्यक्त करू इच्छितो.

माझ्याबरोबर म्हणा .. भारत माता की … जय (३ वेळा) .. वंदे … मातरम् … (३ वेळा)
धन्यवाद

प्रजासत्ताक दिन चारोळ्या, शुभेच्छा

या चारोळ्या आम्ही स्वतः लिहल्या आहेत, जर त्या तुम्हाला आवडल्यात तर आम्हाला नक्की कळवा..

मतभेद सारे विसरुया,
बंधने सारी तोडूया,
एक मनाने, एक भावनेने
आज परत एकत्र येऊया…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

लहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी
उजळत ठेऊ सारे रंग त्याचे
घेऊयात प्रण हा एक मुखाने….
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

जात, धर्म, रंग, वेष
वर वरचे फरक सारे
फक्त तिरंग्याचा धर्म, जात, रंग खरा
चला आज पुन्हा एकत्र येऊ सारे…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

चला करूयात या
संविधानाचा आदर आज,
ज्याने दिला आपणास
जगण्याचा, शिकण्याचा अधिकार…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

%d bloggers like this: