जंजिरा किल्ला Janjira Fort

Janjira Fort Maharashtra India Tourism

 

महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. अनेक खाड्यामुळे हा सागर किनारा दंतुर झालेला आहे. सृष्टी सौंदर्याने नटलेल्या या सागर किनार्याजवळ अनेक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक घटनांना उजाळा देणार्या अनेक स्थळांचा समावेश होतो. या किनार्यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे.

रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र (जुने नाव सिंधूसागर) आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुका वसलेला असून तालुक्याचे मुख्य ठिकाण मुरुड येथेच आहे. मुरुडमधून चार पाच किलोमीटर अंतरावर राजपुरी हे गाव आहे. हे गाव खाडीच्या किनार्यावर आहे. येथून जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.

जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यत: कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारु आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी

या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानीसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमरवानाची नेमणूक केली.

janjira

janjira

राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमनवानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारुचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारुचे काही पिंप त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला.
पिरमरवानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमरवाना मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारु पिऊन झिंगले असताना पिरमरवानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करुन मेढेकोट ताब्यात घेतला.

READ  किल्ले रायगड Raigad Fort

पुढे पिरमरवानाच्या जागी बुर्हाणरवानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुर्हाणरवानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो.

जंजिर्याचे सिद्दी हे मुळचे ऑबिसिनियामधील. हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होवू शकला नाही.

छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिर्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते १९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. जंजिर्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुर्हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते.

एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडलेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुर्हाणखान इतर सत्ताधिशांना सुचवतोच की, तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करु नका.

या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी य किल्ल्यानजिक पाच सहा कि.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता पण तरीही जंजिरा जिंकणं महाराजांना शक्य होऊ शकलं नाही.

जंजिर्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. एकोणीस बुलंद असे बुरुज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायर्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करुन तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिर्यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात.

किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.

READ  मुल्हेरचा किल्ला Mulher Fort

जंजिर्याच्या तटबंदीवरुन विस्तृत भाग दिसतो. यात सागरातील कासा उर्फ पद्मदुर्ग व किनार्यावरील सामराजगड ही येथून दिसतो. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरुन तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल.’

असा हा अजेय जंजिरा, सिद्दि मुहमंदखान हा शेवटच्या सिद्दी असताना २० सिद्दी सत्ताधीश व त्याच्या राज्याच्या ३३० वर्षांनी ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाले.

%d bloggers like this: