रामसेज किल्ला Ramsej Fort

 Ramsej Fort Maharashtra India Tourism

 

नाशिक जिल्हा इतिहास आणि धार्मिक दृष्टीने अतिशय प्रसिद्ध जिल्हा आहे. मुंबई-दिल्ली या रेल्वे मार्गावर नाशिक आहे. तसे मुंबई – आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ नाशिक मधून जातो. पुणे, धुळे तसेच इतरही अनेक शहरांशी नाशिक गाडीमार्गे जोडलेले आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यामधील सर्वात जास्त डोंगरी किल्ले असलेला जिल्हा म्हणजे नाशिक होय. नाशिक जिल्ह्याच्या वायव्येला पेठ हा तालुका आहे. नाशिक मधून पेठ कडे जाणार्‍या मार्गावर नाशिकपासून ११ किलोमीटर अंतरावर आशेवाडी नावाचे गाव आहे. हे आशेवाडी गाव रामसेन या प्रसिद्ध किल्ल्याच्या दक्षिणेकडील पायथ्याला वसले आहे. आशेवाडी पर्यंत खाजगी वाहनानी अथवा इतर वाहनांनीही पोहोचता येते. आशेवाडीतून कातळमाथा उंचावणारा रामसेजचा किल्ला दिसतो.

ramshej

ramshej

या कातळमाथ्याला डावीकडे ठेवून वळसा मारल्यावर पूर्वेकडून गडाच्या माथ्यावर जाणारी पायवाट आहे. मराठे आणि मोगल यांच्यातील संघर्षाचा रामसेज साक्षीदार आहे. या संघर्षामधील अनेक घटना आजही आपल्याला रोमांचित करतात. नाशिक परिसर मोगलांच्या ताब्यात होता. रामसेजचा किल्ला मात्र छत्रपती शिवाजीराजांनी जिंकून घेतलेला होता. मोगल बादशहा औरंगजेबाने प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी महाराष्ट्रात पाऊल टाकले.

आपल्या युद्धाची सुरवात विजयाने व्हावी म्हणून औरंगजेबाने रामसेजचा किल्ला जिंकून घेण्यासाठी जवळ जवळ ४० हजारांची फौज रवाना केली. या मोहीमेचे नेतृत्व सोपवले होते ते फिरोजजंग या सेनापतीवर. शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग हा प्रचंड दारुगोळा आणि तोफखाना घेवून आला त्याच्या सोबत कासीमखान, पीरगुलाम, रामसिंग बुंदेला, दजियाचा राजा राव बुंदेला अशी मातब्बर मंडळी ही होती. रामसेजला वेढा पडणार अशी कुणकुण लागताच

छत्रपती संभाजी महाराजांनी साल्हेरच्या किल्लेदाराला रामसेजला नेमले आणि रामसेजच्या किल्लेदाराला साल्हेरला पाठवून दिले. रामसेजचा किल्लेदार म्हणून जो आला त्याचे नाव दुर्देवाने आज तरी ज्ञात नाही. या किल्लेदाराने मोगली सैन्याची व त्याच्या रणधुरंदर सेनानीची तमा न बाळगता कडवी झुंज देण्याची तयारी केली. मोगली सैन्याने आल्या आल्या रामसेजवर मोठा प्रखर हल्ला चढवला. गडावर सहाशे ते सातशे सैन्याची शिबंदी होती. मोगली सैन्य गडाला भिडताच वरच्या शिबंदीने वरुन दगडांचा मोठा वर्षाव केला. या प्रचंड वर्षावामुळे मोगलांना गडाला भिडताच येईना. मोठी हानी सोलून ते सैन्य माघारी फिरले आणि गडाला वेढा घालून बसले. फिरोजजंगने गडाला मोर्चे लावले, सुरुंग लावले, अचानक हल्ले वरुन बघितले. वेढा आवळून बघितले तरीही रामसेजवर काहीही परिणाम झाला नाही.

READ  किल्ले रत्नदुर्ग Ratnadurg Fort

अखेर त्याने जंगलातील झाडे कापून त्याच्या लाकडांपासून एक उंच दमदमा बांधला. या प्रचंड दमदम्यावर तोफा चढवल्या गोळाबारी करणारी पाचशे माणसे या दमदम्यावरुन गोळाबारी करीत होती तरीही रामसेजने त्यांना भीक घातली नाही. किल्ल्यावरील तोफ गोळे संपल्यावर किल्लेदाराने गुरांच्या कातडय़ामध्ये दारु भरुन ती तोफे मधून उडवण्याची शक्कल काढली. त्यामुळे पेटत्या कातडय़ाचे तुकडे मोगली छावणीवर पडू लागले त्यामुळे लागणार्‍या आगीने मोगलांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होवू लागले. रामसेजच्या वेढय़ाचा बिमोड करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे या सरदारांना पाठवले. मोगलांची व मराठय़ांची गाठ गणेशगावाजवळ पडली मोगलांना सपाटून मार खावा लागला. मोगलांनी मार खाल्लेला बघून गडावरच्या शिबंदीचा उत्साह अजूनही वाढला.

मात्र निराश झालेल्या औरंगजेबाने बहादूरखान कोकलताश याला रामसेजला पाठवले. त्यामुळे चिडून फिरोजजंग जुन्नरकडे निघून गेला पण जाताना तो प्रचंड लाकडी दमदमामात्र त्याने पेटवून दिला. मोगलांची होळी पाहून गडावरील मावळ्यांची मात्र करमणूक झाली. बहादूरखान कोकलताश याने आपल्या पराक्रमाची शर्थ केली पण मराठय़ांच्या दगडांच्या वर्षावाने त्याची शर्थ मात्र व्यर्थ ठरवली. सर्व उपाय थकले. अखेर गडावरच्या मराठय़ांना फसविण्याची युक्ती लढवण्यात आली. गडावर एकाबाजूने जोरदार हल्ला चढवायचा म्हणून नौबती, नगारे वाजू लागले सैन्याची बाजारबुणग्यांची धावपळ सुरु झाली. त्यामुळे गडावरील सर्व सैन्य त्याबाजूला गोळा झाले. त्याच वेळी मागच्या बाजूने निवडक अशा मोगली सैन्याने गुपचूप किल्ल्याच्या आत प्रवेश करुन दरवाजा उघडायचा असे ठरवले होते. या मोगली काव्याची किल्लेदाराला चांगलीच कल्पना होती.

किल्लेदाराने या गुप्त मार्गावर लोक ठेवले आणि मुख्य हल्ल्याच्या बाजूला हल्ल्याचा मोठा गोंधळ उडवला. इकडे मागच्या बाजूने दोनशे मोगल दोराच्या सहाय्याने कडा चढत होते. त्यातील पहीली दोन डोकी जशी कडय़ावर उगवली तशी दबा धरुन बसलेल्या मराठय़ांनी त्यांच्या डोक्यावर जोरदार तडाख दिला. हा तडाखा एवढा जोरदार होता की त्याने त्याचे डोळेच बाहेर पडले. ते खाली फेकले गेले त्याबरोबरोबर त्या दोराने वर चढणारे खालचे सैनिकही खाली पडले आणि बहादूरखानाची बहादूरी त्याच्याच अंगलट आली. गडावरची माणसे माणसे नसून भुते आहेत त्यांना शरण आणण्यासाठी भुतांच्या मांत्रिकाची मदत घेण्याचे ठरले. मोगलांच्या सैन्यातील एक मोतदार मांत्रिक होता.

READ  किल्ले रायरेश्वर Raireshwar Fort

त्याने ही जबाबदारी स्वीकारली. त्याने नव्वद तोळे वजनाच्या सोन्याचा एक नाग बनवला. त्या नागावर मंत्रांचा प्रभाव टाकला. हा नाग पाहताच सर्व मराठे गप पडतील असे त्याने सांगितले. मुहुर्त पाहून गडावर चढाई करण्याचे ठरवले. मांत्रिकाने नाग हातात धरला. तो पुढे करुन तो किल्ला चढू लागला. त्यामागून मोगल सैन्य निघाले. गडावरच्या मराठय़ांना काय चालले आहे ते काही समजेना. त्यामुळे ते तटावर येवून कुतहुलाने खाली बघू लागले. मराठे गप बसून बघतायेत हे पाहून मांत्रिकाला चेव चढला. त्याने हा नागाचाच प्रताप आहे असे मोगली सैन्याला सांगितले. सर्वजण गड चढू लागले. मांत्रिक जसा नजरेच्या टप्प्यात आला तसा त्याच्या हातातला तो नाग मराठय़ांना दिसला.

एव्हाना मोगली सैन्य दगडाच्या मार्‍यात आलेच होते. गडावरून सणसणत आलेला दगड मांत्रिकाच्या छाताडात बसल्याबरोबर नाग उडून पडला आणि तोही कोलमडून पडला. दगडांच्या प्रचंड वर्षावाने धूळधाण उडालेली मोगलांची सेना कशीबशी जीव वाचवून छावणीत परतली. बहादूरखानाने पुन्हा काही भुतांचे नाव काढले नाही. रामसेजचा किल्ला या किल्लेदाराने तब्बल साडेपाच वर्ष लढवला. त्यानंतर अशक्य झाल्यामुळे त्याने तो सोडला तेव्हाच तो मोगलांना मिळाला. अशा या पराक्रमी रामसेजचा विस्तारही फार मोठा नाही. गडावर पाण्याची टाक्याही भरपूर आहेत. मात्र पिण्यायोग्य पाणी कमी आहे. गडावर वाडय़ाचे जोते तसेच इतरही गडपणाच्या खाणाखूणा पहायला मिळतात. गडावरून गंजकरांग, वाघेरा, देहेर तसेच सातमाळा रांगही दृष्टीस पडते. रामसेजच्या पराक्रमाची यशोगाथा मनात उजळीतच आपण परतीची वाट चालू लागतो.

%d bloggers like this: