Chattushringi Temple Pune Maharashtra Paryatan

Chattushringi Temple Pune Information In Marathi

चतु: शृंगी मंदिर पुणे
देवीच्या शक्तिपीठांमध्ये पुणे येथील चतु:शृंगी देवीचे स्थान महत्त्वाचे आहे. इसवी सन ६१३ मध्ये पुणे येथे फक्त दहा-बारा घरे असल्याचा उल्लेख सापडतो. राष्ट्रकूट वंशातील कृष्ण राजा याने तयार केलेल्या दानपत्रामध्ये (इ.स. ७५८) या शहराचे नाव ‘पुण्य विषय’ असे असल्याचे आढळते. पुढे त्याचे ‘पुनक विषय’ झाले. आणि इ. स. ९९३ मध्ये ते ‘पुनवडी’ झाल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर ते पुणेश्वर मंदिरामुळे ‘पुणे’ असे झाले असावे. पुणे हे ऐतिहासिक ठिकाण आहे. ते विद्येचे माहेरघर आहे, तसेच ती महाराष्ट्राची एक सांस्कृतिक राजधानीही आहे. पुणे येथे अनेक मंदिरे आहेत. तेथील मंदिरे ही लाखो भाविकांची श्रद्धास्थाने बनली आहेत. त्यापैकीच शक्तिपीठ देवतेचे स्थान ‘चतु:शृंगी’ हे प्रसिद्ध आहे.
एक कथा


चतु:शृंगी देवता पुणे येथे कशी आली यासंबंधी एक कथा सांगितली जाते. इ. स. १७८६च्या सुमारास पुणे येथे दुल्लभशेठ नावाचे व्यापारी राहत होते. त्यांची स्वत:ची टांकसाळ होती. ते देवीभक्त होते. नाशिकजवळच्या वणी येथील सप्तशृंगीचे दर्शन घेण्यासाठी ते नियमित जात असत. शेवटी वार्धक्य आल्यामुळे त्यांना वणी येथे जाणे अशक्य झाले. त्यांना मोठी चुटपुट लागली. ते दु:खी झाले. शेवटी देवी त्यांच्या स्वप्नात आली. ‘‘शहराच्या वायव्य दिशेस तू जा. तेथे तुला माझे सान्निध्य लाभेल,’’ असे तिने सांगितले. दृष्टांताप्रमाणे शेठजी तेथे गेले तेव्हा तेथे त्यांना दगडाच्या लहान घुमटीमध्ये एक स्वयंभू देवीची मूर्ती दिसली. त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी तेथे एक सुंदर मंदिर बांधले. पुढे पुणे शहरातील नरपगीर गोसावी यांना देवी प्रसन्न झाल्यामुळे त्यांनी तेथे सभामंडप, पायऱ्या व विहीर बांधली.
चतु:शृंगी देवता
या देवीला चतु:शृंगी नाव का मिळाले यासंबंधीही सांगितले जाते. वणीची सप्तशृंगी येथे अवतरली हे आपणास माहीत आहेच. सप्तशृंगी देवीच्या मंदिरापाशी डोंगराची सात शिखरे होती असे म्हणतात. आता तेथे चारच शिखरे दिसतात म्हणून या देवीला ‘चतु:शृंगी’ हे नाव मिळाले असावे. सप्तशृंगी देवीलाही चतु:शृंगी म्हणत असत. अर्थात वणी येथील देवी पुणे येथे अवतरली म्हणून तिचे नाव चतु:शृंगी आहे. या भागातील डोंगरमाथा चौसपाट असल्यामुळे तिला चतु:शृंगी नाव मिळाले असेही सांगण्यात येते.
नवरात्रामध्ये चतु:शृंगी मंदिरापाशी मोठी यात्रा भरते. महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली म्हणजे साक्षात दुर्गाशक्ती! महालक्ष्मी ही वैभवाची देवता, महासरस्वती ही विद्येची देवता आणि महाकाली ही साक्षात दुर्जनांवर विजय मिळविणारी शक्तीची देवता! भारतीय संस्कृतीमध्ये देवीच्या उपासनेला म्हणूनच अनन्यसाधारण महत्त्व प्रश्नप्त झाले आहे
READ  Lal Mahal Pune, Maharashtra%d bloggers like this: