बहादूरगड किल्ला Bahadurgad Fort

बहादूरगड किल्ला Bahadurgad Fort
पेडगावचा किल्ला बहादूरगड म्हणून प्रसिध्द आहे. बहादूरगड किल्ला अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदे तालुक्यामधे आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात श्रीगोंदे तालुका आहे. या तालुक्याच्या दक्षिणसीमेवर भीमा नदी वाहते.
या भीमा नदीच्या उत्तर तीरावर बहादूरगड किल्ला आहे.
पेडगावच्या बहादूरगडाला जाण्यासाठी दोनतीन मार्ग आहेत.
दौंड हे पुणे जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव असून रेल्वे आणि गाडी रस्त्याने जोडले गेले आहे.
दौंडकडून गाडीरस्त्याने देऊळगाव पर्यंत येवून पेडगाव गाठावे लागते.
अलिकडील पेडगाव मधून नावेने पलीकडील पेडगावामधील बहादूरगडाला जावे लागते.
दुसरा मार्ग म्हणजे अहमदनगर कडून अथवा पुण्यातून श्रीगोंदेला पोहोचावे व तेथून पेडगावला यावे. हा मार्ग सोयीचा आहे.

bahadurgad

bahadurgadपेडगावचा बहादूरगड हा भीमेच्या काठावर आहे.
याची दक्षिणेकडील तटबंदी भीमानदीला समांतर अशी आहे.
साधारण आयताकृती आकाराच्या बहादूरगडाची निर्मिती मोगल सरदार बहादूरखान कोकलताश याने केली.
किल्ल्याला तीन चार प्रवेशव्दारे आहेत. मुख्य प्रवेशमार्ग गावाच्या बाजूला आहे.
किल्ल्यामधे असलेल्या अनेक वास्तू आज उध्वस्त झालेले आहेत.
याची तटबंदीमात्र कशीबशी उभी असून सर्वत्र काटेरी रान माजलेले आहे.
नदीच्या बाजूच्या तटबंदीमधे असलेले बांधकाम पहाण्यासारखे आहे.

या दुमजली इमारतीच्या खिडक्यांमधून भीमानदीचा देखावा सुंदर दिसतो.
किल्ल्यामधे सुबक नक्षीकाम असलेली दोन मंदिर आहेत. या मंदिरापैकी लक्ष्मीनारायण मंदिर त्यातल्या त्यात बर्‍या अवस्थेत आहे.
या मंदिरामधील अलंकृत स्तंभ तसेच बाहेरील मुर्ती पहाण्याजोग्या आहेत.

बहादूरखानाने हा किल्ला बांधला. या बहादूरखानाला शिवाजीराजांनी चांगलाच धडा शिकवला तोही दोनदा.
हा बहादूरखान औरंगजेबाचा दूधभाऊ आहे. त्याला औरंगजेबाने सुभेदार म्हणून दक्षिणेत पाठवले.
त्याला बहादूरखान कोकलताश अशी पदवी दिलेली होती.
याने भीमेच्या काठावर किल्ला बांधला आणि त्याला आपलेच नाव देण्याची बहादूरी केली.
बहादूरखानाच्या या बहादूरीबद्दल औरंगजेबाला काय वाटले ते औरंगजेबालाच माहीत.
छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र बहादूरखान याची बहादूरी माहिती होती. त्यांनी बहादूरखानाला मराठय़ांची बहादूरी दाखवायचे ठरवले.

READ  अंजनेरी किल्ला Anjaneri Fort

छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक नुकताच पार पडला होता.
त्यासाठी अमाप खर्चही झाला होता. तो खर्च भरुन काढायला बहादूरखानाने आपण होवून शिवाजीराजांना संधी दिली.
बहादूरखानाने बहादूरगडामधे एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरवी घोडे औरंगजेबाकडे पाठविण्यासाठी गोळा केले होते.
महाराजांच्या हेरांनी सगळा तपशिल गोळा करुन आणला होता.


महाराजांनी आपल्या सरदाराबरोबर नऊ हजाराचे सैन्य बहादूरगडावर खजिना आणण्यासाठी पाठवले.
या सददाराने आपल्या सैन्याने दोन भाग केले. एक दोन हजाराचे तर दुसरे सात हजाराचे भाग केले.
दोन हजाराच्या तुकडीने बहादूरगडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्येश गडबड उडवून देण्याचा होता तो सफल झाला.
बहादूरखान लढाईसाठी तयारी करुन मराठय़ांच्या सैन्यावर धावून गेला. त्यामुळे मराठय़ांच्या तुकडीने माघार घेवून पळायला सुरवात केली. त्यामुळे बहादूरखानाला चेव चढला. त्याने मराठय़ांना गाठण्यासाठी त्यांचा जोरदार पाठलाग सुरु केला.

मराठय़ांनी बहादूरखानाला हुलकावणी देत देत खूप लांबवर आणून सोडले.
दरम्यान मराठय़ांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादूरगडावर हल्ला चढवला.
गडामधे तुरळक सैन्य, नोकरचाकर आणि बाजारबुणगेच उरले होते. मराठय़ांनी खजिना आणि घोडे ताब्यात घेवून रायगडाकडे कूच केली.

बहादूरखान पाठलागावरुन परत आला तेव्हा त्याला मराठय़ांनी शाही खजिना लुटल्याची बातमी कळाली.
तेव्हा त्याला मराठय़ांच्या बहादूरीची जाणीव झाली.
खजिना घालवून आणि कशीबशी आपली इभ्रत वाचवून या पेडगावच्या शहाण्याला गप्प बसावे लागले.

बहादूरखानाच्या बहादूरीच्या या आणि इतरही घटना आपण बहादूरगड बघत असताना आपल्या स्मृतीपटलावर नव्याने कोरल्या जातात हे मात्र निश्चित.

%d bloggers like this: