health benefits from Aamla | तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी आवळ्याचे करा सेवन!

आवळ्याचा समावेश औषधी फळांमध्ये करण्यात येतो. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. आयुर्वेदामध्येही बहुगुणी असं आवळ्याचं महत्त्व सांगण्यात येतं. आवळा आपल्याला बाजारामध्ये वर्षभर सहज उपलब्ध होतो. तसेच आवळ्याचं लोणचं, मुरांबा, ज्यूस, चुर्ण यांसारख्या गोष्टी तयार करण्यासाठीही उपयोग होतो. आवळा अनेक व्याधी आणि आजारांवर गुणकारी ठरतो. काही फळांमधील व्हिटॅमिन्सचं प्रमाण त्यांना गरम केल्यानंतर अथवा सुकवल्यानंतर कमी होते. परंतु संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, आवळा गरम केल्यानंतर किंवा सुकवल्यानंतरही त्यातील व्हिटॅमिनचे प्रमाण कमी होत नाही.

‘सी’ व्हिटॅमिनने परिपूर्ण 

संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, आवळ्यामध्ये जितकं व्हिटॅमिन सी आढळतं तितकं इतर कोणत्याही फळामध्ये आढळत नाही. व्हिटॅमिन सी हे केस आणि त्वचेचं आरोग्या राखण्यास अत्यंत उपयुक्त असतं. त्यामुळे आवळ्याच्या सेवनानं त्वचा आणि केसांना फायदा होतो. अशा बहुगुणी आवळ्याच्या सेवनानं तारूण्य टिकवून ठेवण्यास मदत होते.

त्रिदोषनाशक

आवळा चवीला तूरट-आंबट असल्यानं पित्त, कफ आणि जुलाब यांसारख्या आजारांवर रामबाण औषध आहे. त्यामुळे त्याला आयुर्वेदामध्ये त्रिदोषनाशक असेही म्हटले जाते.

अनेक रोगांवर उपायकारक 

आवळ्याचा पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयोग होतो. तसेच स्नायू आणि दात ठिक करण्यासाठी, रक्त वाढविण्यासाठी, डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी, केस काळे आणि मुलायम करण्यासाठी, मधुमेह, सर्दी, खोकला, चेहरा तजेलदार करण्यासाठी आवळ्याचा उपयोग होतो. तर हृदयाशी निगडीत आजारांवरही औषध म्हणून आवळा गुणकारी ठरतो. तसेच आवळ्याच्या सेवनाने कोणतेही साईडईफेक्ट्स होत नाहीत. आवळ्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे आजारांपासून बचाव होतो.