क्रियापदाचे काळ

क्रियापदाचे काळ

काळ

क्रियापदांच्या रूपावरून त्याने दाखवलेली क्रिया कधी घडते, याचा जो बोध होतो, त्याला काळ म्हणतात.

काळाचे ३ प्रकार आहेत.

(1) वर्तमानकाळ
(2) भूतकाळ
(3) भविष्यकाळ

(a) वर्तमानकाळ :

जेव्हा क्रियापदांच्या रूपावरून क्रिया आता म्हणजे वर्तमानात घडते, असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा वर्तमानकाळ असतो.
उदा.
(1) मयंक अभ्यास करतो.
(2) मुकेश पाणी पितो.

(b) भूतकाळ :

जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली आहे, असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा भूतकाळ असतो.
उदा.
(1) मयंकने अभ्यास केला.
(2) मुकेशने पाणी पिले.

(c) भविष्यकाळ :

जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल, असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा भविष्यकाळ असतो.
उदा.
(1) मयंक अभ्यास करील.
(2) मुकेश पाणी पिईल.

वर्तमान काळाचे पोटप्रकार :-

(1) साधा वर्तमानकाळ :

जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळात घडते तेव्हा त्याला ‘साधा वर्तमानकाळ’ असे म्हणतात.
उदा.
मयंक अभ्यास करतो.

(2) अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ :

जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात असून ती अपूर्ण किंवा चालू असे तेव्हा त्या वर्तमान काळाला ‘अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ’ म्हणतात.
उदा.
मयंक अभ्यास करीत आहे.

(3) पूर्ण वर्तमानकाळ :

जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला ‘पूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.
उदा.
मयंकने अभ्यास केला आहे.

(4) रीती वर्तमानकाळ :

वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला ‘रीती वर्तमानकाळ’ असे म्हणतात.
उदा.
मयंक अभ्यास करीत असतो.

भविष्यकाळाचे पोटप्रकार :-

(1) साधा भविष्यकाळ :-

जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी ‘साधा भविष्यकाळ’ असतो.
उदा.
मयंक अभ्यास करील.

(2) अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ :-

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला ‘अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ’ असे म्हणतात.
उदा.
मयंक अभ्यास करत असेल.

(3) पूर्ण भविष्यकाळ :-

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.
उदा.
मयंकने अभ्यास केला असेल.

(4) रीती भविष्यकाळ :-

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला ‘रीती भविष्यकाळ’ असे म्हणतात.
उदा.
मयंक अभ्यास करत जाईल.

भूतकाळाचे पोटप्रकार :

(1) साधा भूतकाळ :

एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात.
उदा.
मुकेशने अभ्यास केला.

(2) अपूर्ण किंवा चालू भूतकाळ :

एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला ‘अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ’ असे म्हणतात.
उदा.
मुकेश अभ्यास करीत होता.

(3) पूर्ण भूतकाळ :

एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात.
उदा.
मुकेशने अभ्यास केला होता.

(4) रीती भूतकाळ :

भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला ‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात.
उदा.
मुकेश अभ्यास करत असे.

READ  अलंकार
%d bloggers like this: