अलंकार

अलंकार

अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते. तसेच लेखक कवी आपल्या मनातील आशय सुंदर, आकर्षक शब्दांतून, विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात. यालाच आलंकारिक भाषा म्हणतात. अलंकार हा मुळातले सौंदर्य वाढवणारा घटक आहे.

उदा.
ढगांशी वारा झुंजला रे
काळाकाळा कापुस पिंजला रे
आतां तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !

भाषेचे अलंकार :

भाषेला ज्याच्या – ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना ‘भाषेचे अलंकार’ असे म्हणतात. केव्हा दोन वस्तूंतील साम्य दाखवून, तर केव्हा विरोध दाखवून , केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरुन, तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा पारिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो. केव्हा शब्दांतील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तर केव्हा योजिलेल्या शब्दांमुळे अर्थांचे सौदर्य खूलून दिसते.

भाषेच्या अलंकारांचे दोन प्रकार होतात.
(1) शब्दालंकार
(2) अर्थालंकार

शब्दालंकार अलंकाराचे उपप्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे :

(1) अनुप्रास
(2) यमक
(3) श्र्लेष

अनुप्रास
जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा पद्यचरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे सौंदर्यनिर्मिती होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

उदा.
पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी ।
गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी ।

यमक 
जेव्हा पद्यचरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने येतात, तेव्हा यमक अलंकार होतो.

उदा.
राज्य गादीवरी । काढी तुझ्या आठवणी
फळा आली माय । मायेची पाठवणी

श्र्लेष 
वाक्यात किंवा पद्यचरणात एकच शब्द दोन किंवा दोहोंपेक्षा जास्त अर्थांनी वापरल्यामुळे शब्दचमत्कृती साधली जाते, तेव्हा श्र्लेष अलंकार होतो.

उदा.
(a) हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.
(b) शंकरासी पूजिले सुमनाने.

अर्थालंकार अलंकाराचे काही उपप्रकार पुढीलप्रमाणे :-

(1) उपमा
(2) उत्प्रेक्षा
(3) रूपक
(4) व्यतिरेक
(5) स्वभावोक्ती
(6) दृष्टांत
(7) अतिशयोक्ती
(8) चेतनगुणोक्ती

उपमा 
दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे ‘उपमा’ हा अलंकार होतो.

उदा.
(a) पिठासारखे स्वच्छ चांदणे पडले होते.
(b) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी !

उत्प्रेक्षा 
उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यांतील एक (उपमेय) ही जणू काही दुसरी वस्तू (उपमान) च आहे अशी कल्पना करणे याला उत्प्रेक्षा म्हणतात.

उदा.
(1) अत्रीच्या आश्रमीं । नेलें मज वाटें । माहेरची वाटें ।खरेखुरें।
(2) सतेज डोळे चमचम करती जणुं रत्नें गोजिरी.

रूपक 
उपमेय व उपमान यांत एकरुपता आहे. ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते तेथे रुपक हा अलंकार असतो.

उदा.
(1) ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाहे रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ॥
(2) जग ही एक रंगभूमी आहे.

व्यतिरेक 
उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेव्हा वर्णन केले असेल तेव्हा ‘व्यतिरेक ‘ हा अलंकार होतो.

उदा.
(1) सांज खुले सोन्याहुनी पिवळे हे पडले ऊन ।
(2) सावळा ग रामचंद्र । रत्नमंचकी झोपतो ।
त्याला पाहता लाजून । चंद्र आभाळी लोपतो ॥

स्वभावोक्ती 
एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे यथार्थ (हुबेहुब) पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन हाही एक भाषेचा अलंकार ठरतो, याला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात.

उदा.
चिमुकली पगडी झळके शिरी,
चिमुकली तरवार धरी करी;
चिमुकला चढवी वर चोळणा;
चिमुकला सरदार निघे रणा.

दृष्टांत 
एखाद्या गोष्टीचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो.

उदा.
लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ।
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।

अतिशयोक्ती 
ज्या ठिकाणी एखादी गोष्ट किंवा घटना सांगताना तिचे अवास्तव वर्णन केले जाते व त्यामुळे त्यातील असंभाव्यता स्पष्ट होते, अशा ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार होतो.

उदा.
काव्य अगोदर आले नंतर जग झाले सुंदर ।
रामायण आधी मग झाला राम जानकीवर ॥

चेतनगुणोक्ती 
निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करुन ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेथे वर्णन असते तेथे ‘चेतनगुणोक्ती’ हा अलंकार असतो.

उदा.
झडकरि मग बोले शेवंती ती उठून
“मजसम जगतीं या फुल नाहींच अन्य
सुबकचि पिवळा हा रंग माझा पहा ना
मधुर मम सुगंधा कोण घे ना शहाणा ?”

%d bloggers like this: