वाक्यसंश्लेषण (वाक्यसंकलन)

वाक्यसंश्लेषण (वाक्यसंकलन)

वाक्यसंश्लेषणाचे तीन प्रकार
एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवलवाक्ये दिली असता ती एकत्र करुन त्यांचे एक वाक्य बनविणे यालाच वाक्यसंक्ष्लेषण असे म्हणतात.

वाक्यसंश्लेषणाचे तीन प्रकार करता येतात.

(1) दोन किंवा दोनांपेक्षा अधिक केवल वाक्यांचे एक केवल वाक्य करणे.

उदा.
तो रस्त्यावरून चालत होता. त्याचा पाय घसरला. तो पडला.
तो रस्त्यावरून चालत असताना त्याचा पाय घसरून तो पडला. – केवल वाक्य

(2) दोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक संयुक्त वाक्य करणे.

उदा.
मी दुकानातून फ्रीज घेतला. मी दुकानातून टी.व्ही. घेतला.
मी दुकानातून फ्रीज आणि टीव्ही घेतला. – संयुक्त वाक्य

(3) दोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक मिश्र वाक्य करणे.

उदा.
मला हा ड्रेस पाहिजे. तो चांगला आहे.
मला हा ड्रेस पाहिजे कारण तो चांगला आहे. – मिश्र वाक्य

केवल वाक्यांचे एक केवल वाक्य
(1) केवल वाक्यांचे एक केवल वाक्य :

उदा.
(a) पुष्कळ वर्षे झाली. मी कॅशियाचे रोप आणले. बागेत एका कोप-यात ते लावले. याची मला मोठी आवड होती.
(पुष्कळ वर्षांपूर्वी मोठ्या आवडीने कॅशियाचे रोप आणून मी ते बागेत एका कोप-यात लावले.)

(b) त्याचा मैत्रिणीने मला पत्र पाठवले. त्यात त्याला आभार मानले होते.
(त्याचा मैत्रिणीने त्याला आभाराचे पत्र पाठवले.)

(2) संयुक्त वाक्य बनविणे :

दोन किंवा अधिक केवलवाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनविताना त्यांना जोडणारी योग्य अशीच उभयान्वयी अव्यये वापरावयास हवीत. उभयान्वयी अव्यये ही दोन प्रकारची आहेत.
(a) प्रधानत्वबोधक
(b) गौणत्वबोधक

केवळ प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यये योजल्याने बनणारे वाक्य केवळ – ‘संयुक्तवाक्य’ होते. प्रधानत्वबोधक व गौणत्वबोधक अशी दोन्ही प्रकारची उभयान्वयी अव्यये वापरल्यास ते ‘मिश्र संयुक्त’ वाक्य होते. या दोन्ही प्रकारांना ‘संयुक्त वाक्य’च म्हणतात.

सयुंक्तवाक्ये चार प्रकारची असतात पुढीलप्रमाणे :

(1) समुच्चयबोधक
(2) विकल्पबोधक
(3) न्यूनत्व (विरोध) बोधक
(4) परिणामबोधक

सयुंक्तवाक्ये चार प्रकारची
(1) समुच्चयबोधक :
‘आणि, व’ यांसारखे.

उदा.
रवीचा शाळेत पहिला नंबर आला. राजूचा शाळेत दुसरा नंबर आला.
(रवीचा शाळेत पहिला नंबर आणि राजूचा दुसरा आला.)

(2) विकल्पबोधक :
‘अथवा, किंवा’ यांसारखे.

उदा.
तू हे लेख वाच. तू हे लेख वाचू नकोस.
(तू हे लेख वाच किंवा वाचू नकोस.)

(3) न्यूनत्व (विरोध) बोधक :
‘पण, परंतु, परी’ यांसारखे

उदा.
आपण मरावयास हरकत नाही. आपण कीर्तिरुपाने उरावे.
( मरावे परी कीर्तिरुपे उरावे. )

(4) परिणामबोधक :
‘म्हणून, सबब’ यांसारखे

उदा.
बस उशिरा आली. मला यायला उशीर झाला.
( बस उशिरा आली म्हणून मला यायला उशीर झाला. )

मिश्र वाक्य बनविणे :

जर दोन वाक्ये गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असतील तर मिश्रवाक्य तयार होते.

गौणत्वबोधक उभयान्वयी अव्यये चार प्रकारची आहेत.

(1) कारणबोधक :
‘कारण, का, की, कारण की’ यांसारखे

उदा.
रमेशचा पहिला नंबर आला. रमेशने चांगला अभ्यास केला.
(रमेशचा पहिला नंबर आला कारण रमेशने चांगला अभ्यास केला.)

(2) उद्देशबोधक :
‘म्हणून, सबब , यास्तव’ यांसारखे

उदा.
शब्द हे दुधारी शस्त्र आहे. शब्द जपून वापरावेत.
(शब्द हे दुधारी शस्त्र आहे, म्हणून जपून वापरावेत.)

(3) स्वरुपबोधक :
‘कि, म्हणून, म्हणजे’ यांसारखे.

उदा.
तो म्हणाला. मी धंदा करीन.
(तो म्हणाला कि, मी धंदा करीन.)

(4) संकेतबोधक :
‘जर – तर, जरी – तरी’ यांसारखे.

उदा.
ते त्याला उमजले होते. ते त्याला पुरते समजले नव्हते.
(जरी ते त्याला उमजले असले, तरी पुरते समजले नव्हते.)

READ  मिश्र वाक्यात येणाऱ्या गौण वाक्याचे प्रकार
%d bloggers like this: