वृत्त

वृत्त

 

मात्रा म्हणजे काय ?
एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास ‘मात्रा’ असे म्हणतात.

अक्षरांत –हस्व व दीर्घ असे दोन प्रकारचे उच्चार आहेत. सामान्य भाषेत ज्यांना –हस्व व दीर्घ असे म्हणतात त्यांना पद्याच्या भाषेत ‘लघु – गुरु’ असे म्हणतात. ऱ्हस्व अक्षर उच्चारायला जो वेळ लागतो; त्यापेक्षा दीर्घ अक्षर उच्चारायला अधिक वेळ लागतो.

अ, इ, उ, ॠ या –हस्व उच्चारल्या जाणा-या स्वरांस किंवा क, कि, कु, कृ यांसारख्या स्वरयुक्त अक्षरांस ‘गुरु अक्षरे’ असे म्हणतात. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ या दीर्घ उच्चारल्या जाणा-या स्वरांस किंवा का, की कू, के, कै, को, कौ, यांसारख्या स्वरयुक्त अक्षरांस ‘गुरु अक्षरे असे म्हणतात.

ऱ्हस्व अक्षराला लघु म्हणतात. ते ‘U’ या चिन्हाने ओळखतात. त्याची एक मात्रा मोजतात.

दीर्घ अक्षराला गुरु म्हणतात. ते ‘_’ या चिन्हाने ओळखतात. त्याची दोन मात्रा मोजतात.

उदा.
म ना स | ज्ज ना भ | क्ति पं थे | चि जा वे !
U _ _ U _ _ U _ _ U _ _

पद्यचरणाचे गट पाडण्याची पद्धत
(1) पद्याच्या संपूर्ण चरणाच, तीन – तीन अक्षरांचे गण पाडून झाल्यानंतर शेवटी जर एक अक्षर राहिले तर ते गुरु समजावे.
उदा.
हो ते ज | ना त अ | प की र्ती | नि र क्ष | रां ची ||
_ _ U _ U U U _ U U _ U _ _

या पद्यचरणातील शेवटचे अक्षर ची हे गुरु आहे. ते गुरूच समजायचे. त्याच्या आधीचे अक्षर रां हे गुरु आहे. ते गुरूच समजायचे.

(2) पद्याच्या संपूर्ण चरणाचे, तीन तीन अक्षरांचे गण पाडून झाल्यानंतर शेवटी जर दोन अक्षरे राहिली; तर शेवटचे अक्षर गुरु समजावे व त्याच्या आधीचे लघू, गुरु जसे असेल, तसेच समजावे.
उदा.
प दा श | र ण ये | ति ते त | र ति की | र्ति ऐ शी | जु नी ||
U _ U U U _ U _ U U U _ U _ _ U _

या पद्यचरणात, पाच गण पाडून जी दोन अक्षरे शिल्लक राहिली आहेत, त्यातले जु अक्षर लघू आहे व नी हे अक्षर गुरु आहे.

छंदवृत्त
वृत्तप्रकारात छंद हा एक प्रकार आहे. छंदाच्या रचनेत गण मात्रांचे बंधन नसते. चरणातील अक्षरांची संख्या नियमित असते. पण तेही बंधन फार काटेकोरपणे पाळलेले नसते. छंदामध्ये अक्षर ऱ्हस्व असले तरी उच्चारायच्या वेळी त्याचा कल दिर्घत्वाकडे असतो. अभंग आणि ओवी हे मराठीतील सर्वात जुने आणि लोकप्रिय छंद आहेत.

(1) अभंग :- अभंगाचे मुख्यत: दोन प्रकार आहेत.
(a) मोठा अभंग
(b) लहान अभंग

भाषेचे प्रकार
भाषा हे आत्मप्रकटीकरणाचे साधन आहे. आपण आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना भाषेद्वारेच व्यक्त करत असतो. याचे दोन प्रकार आहेत.

(1) गद्य
(2) पद्य

(1) गद्य :

आपल्या मनात जसे विचार येत जातात ते जसेच्या तसे बोलून दाखविणे. आपल्या या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात.

उदा. ‘परमेश्वरा, मी जेथे जाईन, तेथे तू माझ्याबरोबर असतोस.

(2) पद्य :

हे विचार किंवा याच वाक्यातील शब्द काही ठरावीक क्रमाने लिहून ते सुरावर म्हणता येतील. अशा पध्दतीने त्याची रचना केली तर त्याला पद्य असे म्हणतात.

उदा. ‘जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती.

मात्रा मोजण्याचे नियम
(1) लघु (U) अक्षराची एक मात्रा मोजतात. ‘ल’ हे लघुचे संक्षिप्त रूप आहे.
उदा. म = U = एक मात्रा

(2) गुरु (_) अक्षराच्या दोन मात्रा मोजतात. ‘ग’ हे गुरूचे संक्षिप्त रूप आहे.
उदा. ना = _ = दोन मात्रा ( हे मोजणे दोन मात्रांपार्यंतच असते.)

(3) अक्षर लघु (U) असेल; पण त्याच्यावर पुढील अक्षराचा आघात होत असेल, तर ते गुरु समजून त्याच्या दोन मात्रा मोजतात.
उदा. सज्जना हा शब्द. स या अक्षरावर पुढील ज्ज या अक्षराचा आघात होतो, म्हणून स च्या दोन मात्रा होतात.

(4) जोडाक्षर लघु-गुरु जसे असेल तसेच धरून त्याप्रमाणे त्याच्या मात्रा मोजायच्या असतात.
उदा. सज्जना या शब्दातील ज्ज हा लघुच आहे. त्याची एक मात्रा आहे.

(5) अक्षरावरील अनुस्वाराचा स्पष्टपणे उच्चार होत असेल, तर ते गुरु धरून त्याच्या दोन मात्रा मोजायच्या असतात.
उदा. पंथेचि या शब्दात पं हे अक्षर गुरु आहे. त्याच्या दोन मात्रा होतात.

(6) अक्षरापुढे विसर्ग असेल, तर मागील अक्षरावर त्याचा आघात येतो. म्हणून विसर्गामागील अक्षर ऱ्हस्व असले, तरी ते दीर्घ धरून त्याच्या दोन मात्रा मोजायच्या.
उदा. दु:ख हा शब्द

(7) ए, ऐ, ओ, औ ( मेवा, ऐलतीर, ओढा, औषध ) हि सर्व अक्षरे गुरु आहेत. त्यांच्या प्रत्येकी दोन मात्रा होतात.

गण
पद्याच्या चरणातील अक्षरांचा लघुगुरुक्रम मांडून वृत्ताची लक्षणे ठेरविताना त्यातील तीन अक्षरांचा एकेक गट करुन तो मांडण्याची पध्दत आहे.

यांनाच गण असे म्हणतात. गण म्हणजे कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप. या अक्षरांच्या गटात काही अक्षरे लघू तर काही अक्षरे गुरु असतात.
तीन अक्षरांच्या गटातील अक्षरांना आद्य, मध्य आणि अंत्य असे म्हणतात.

आद्य म्हणजे सुरुवातीचे अक्षर, मध्य म्हणजे मधले अक्षर आणि अंत्य म्हणजे शेवटचे अक्षर होय.

आठ गणांचा तक्ता
तीन अक्षरी लघुगुरुक्रमाने एकंदर आठ गण पडतात.

(1) आद्य लघू – य – गण – य मा चा – U _ _
(2) मध्य लघू – र – गण – रा धि का – _ U _
(3) अंत्य लघू – त – गण – ता रा प – _ _ U
(4) सर्व लघू – न – गण – न म न – U U U
(5) आद्य गुरु – भ – गण – भा र त – _ U U
(6) मध्य गुरु – ज – गण – ज ना स – U _ U
(7) अंत्य गुरु – स – गण – स म रा – U U _
(8) सर्व गुरु – म – गण – मा ना वा – _ _ _

अशा प्रकारे ‘ य, र, त, न, भ, ज, स, म’ असे आठ गण पडतात.

यती
कवितेचा चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरांनंतर थांबतो. या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला यती असे म्हणतात.

उदा. ‘मना सज्जना तू कडेनेच जावे’
तू या अक्षरावर थांबतो ते अक्षर सहावे आहे म्हणून यती सहाव्या अक्षरावर आहे. नंतरची यती बाराव्या अक्षरावर आहे. म्हणजेच वे वर येते.

वृत्तांचे प्रकार
(1) अक्षरगणवृत्त
(2) जाती किंवा मात्रावृत्त
(3) अक्षर छंदवृत्त
(4) मुक्तछंद

अक्षरगणवृत्त
अक्षरगणवृत्ते म्हणजे लघु-गुरु अक्षरांचा साचेबद्ध आणि व्याकरणनिष्ठ आविष्कार करणे होय. अक्षरगणवृत्तामध्ये खालील उपप्रकार असतात अक्षरगणवृत्तात लघू म्हणजे र्‍हस्व उच्चार होणारी अक्षरे गुरू म्हणजे दीर्घ उच्चार होणारी अक्षरे यांचा क्रम रचनेतल्या प्रत्येक ओळीत पाळण्याचा नियम आहे. यामध्ये ४ ओळींची गण रचना सारखी असते, २ ओळींची सारखी असते अथवा सर्वच ओळींची वेगळी असू शकते.

अक्षरगणवृत्ताचे काही प्रकार पुढील प्रमाणे :
(1) भुजंगप्रयात
(2) वसंततिलका
(3) शार्दूलविक्रीडित
(4) मंदाक्रांता
(5) मालिनी
(6) मंदारमाला
(7) पृथ्वी

भुजंगप्रयात
भुजंगप्रयात हे अक्षरगणवृत्त आहे. त्याच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असतात.

प्रत्येक चरणात १२ अक्षरे असतात. त्या १२ अक्षरांचे चार ‘य’ गण असतात. यति सहाव्या आणि बाराव्या अक्षरावर असतो.

उदा.
मना सज्जना तू कडेनेच जावे
न होऊन कोणासही दूखवावे
कुणी दृष्ट अंगास लावीत हात
तरी दाखवावा भुजंगप्रयात

वसंततिलका
वसंततिलका हे अक्षरगणवृत्त आहे. त्याच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असतात. प्रत्येक चरणात १४ अक्षरे असतात. त्या १४ अक्षरांचे त, भ, ज, ज, ग, ग असे गण पडतात. शेवटची दोन अक्षरे गुरु असतात. यती आठव्या अक्षरावर असतो.

उदा.
आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश
फेकी रसाल तरुही मधुगंधपाश
ऐकू न ये तुज पिकस्वर मंजुळे का?
वृत्ती वसंततिलका न तुझी खुले का?

शार्दूलविक्रीडित
शार्दूलविक्रीडित हे अक्षरगणवृत्त आहे. त्याच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असतात. प्रत्येक चरणात १९ अक्षरे असतात. त्या १९ अक्षरांचे म, स ज, स, त, त, ग असे गण पडतात. यति १२ व्या व १९ व्या अक्षरांवर असतो.

उदा.
भाषा संस्कृति थोर एकच महाराष्ट्रा, तुझी देख रे
नाना धर्म असंख्य जाति असती अद्यापि सारे खरे
भेदांनी परि या किती दिन तुवा व्हावे त्रिधा पीडित
ताणूनी अपुले स्वरुप कर तू शार्दुलविक्रीडित

मंदाक्रांता
मंदाक्रांता हे अक्षरगणवृत्त आहे. त्याच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असतात. प्रत्येक चरणात १७ अक्षरे असतात. त्या १७ अक्षरांचे म, भ, त, त, ग, ग असे गण पडतात. यती ४ थ्या, १० व्या व १७ व्या अक्षरांवर असतो.

उदा.
मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढमासी
होई पर्युत्सुक विकल तो कांत एकांतवासी
तन्निःश्वास श्रवुन रिझवी कोण त्याच्या जिवासी ?
मंदाक्रांता सरस कविता कालिदासी विलासी

मालिनी
मालिनी हे अक्षरगणवृत्त आहे. त्याच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असतात. प्रत्येक चरणात १५ अक्षरे असतात. या १५ अक्षरांचे न, न, म, य, य असे गण पडतात. यति ८ व्या व १५ व्या अक्षरांवर असतो.

उदा.
पखरण बघ घाली भूवरी पारिजात,
परिमल उधळी हा सोनचाफा दिशात;
गवतहि सुमभूषा दाखवी आज देही,
धरणि हरितवस्त्रा मालिनी साजते ही.

मंदारमाला
मंदारमाला हे अक्षरगणवृत्त आहे. त्याच्या प्रत्येक कडव्यात दोन किंवा चार चरण असतात. प्रत्येक चरणात २२ अक्षरे असतात. या २२ अक्षरांचे त, त, त, त, त, त, त, ग असे गण पडतात. यति ४, १०, १६ व २२ व्या अक्षरांवर येतो.

उदा.
शोभे सभोवार मंदारमाला मुदे वाहते मंद मंदाकिनी
वीणा करी मंजु झंकार हाती, असे शारदा ही जगन्मोहिनी

पृथ्वी
पृथ्वी हे अक्षरगणवृत्त आहे. त्याच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असतात. प्रत्येक चरणात १७ अक्षरे असतात. या १७ अक्षरांचे ज, स, ज, स, य, ल, ग असे गण पडतात. यती ८ व १७ व्या अक्षरांवर असतो.

उदा.
कुठे भटकशी घना? वळुनि ऐक केकावली
न हाक ह्रदयी तुझ्या जननिची कशी पावली?
सुकूनि विरहानले मलिन दीन साध्वी पडे,
विलंबित गति त्यजी , द्रवुनि धाव पृथ्वीकडे

जाती किंवा मात्रावृत्त
ज्या कवितेच्या चरणात अक्षराचे व गणांचे बंधन नसून केवळ मात्रांचे बंधन असते त्यास त्यास ‘मात्रावृत्त’ किंवा ‘जाती’ असे म्हणतात. मराठीत ज्यांना आपण ‘पदे’ म्हणतो त्यांचा समावेश मात्रावृत्तांत होतो.

मात्रावृत्तांत पदांशिवाय अनेक प्रकारच्या पद्यरचना आढळतात. सलग वर्णन करताना म्हटले जाणारे कटाव, उपदेशाचा डोस पाजणारे फटके, परमेश्वराला आळविण्यासाठी म्हटल्या जाणा-या भूपाळ्या व आरत्या, तान्ह्या मुलांसाठी रचलेली अंगाई – गीते व पाळणे, शूरवीरांच्या कीर्तीचे गाइले जाणारे पोवाडे व समरगीते, तरुणांच्या प्रेमांची चित्रणे करणा-या लावण्या अशांचा समावेश मात्रावृत्तांतच होतो.

दिंडी वृत्त
पद्य – फुल तगरीचें सर्व गुणीं साधें
मात्रा – १९
अक्षरसंख्या – १२

पद्य – दृष्टी पडतां सहज हें चित्त वेधे
मात्रा – १९
अक्षरसंख्या – १३

पद्य – रूप नखऱ्याविण रुचिर कसें पाहीं
मात्रा – १९
अक्षरसंख्या – १४

पद्य – डौल नसुनी बेडौल मुळीं नाहीं
मात्रा – १९
अक्षरसंख्या – १२

या पद्यातील प्रत्येक चरणातील अक्षरसंख्या वेगवेगळी आहे. मात्र प्रत्येक चरणातील मात्रांची संख्या १९ आहे.

या १९ मात्रांचे ९ आणि १० असे दोन भाग पडतात. हे दिंडी मात्रावृत्त आहे.

आर्यावृत्त
पद्य – विद्येनेच मनुष्या आलें श्रेष्ठत्व या जगामाजी;
मात्रा – ३०

पद्य – न दिसे एकहि वस्तू विद्येनेंही असाध्य आहे जी.
पद्य – ३०

या पद्यात पहिल्या चरणात १२ मात्रा आहेत. दुसऱ्या चरणात १८ मात्रा आहेत. दोन्ही चरणांच्या मात्रा प्रत्येकी ३० आहेत. हे मात्रावृत्त आहे.

आर्यावृत्तात दोन मोठे चरण असतात ज्यांचे प्रत्येकी पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग पडतात. पैकी पूर्वार्धात १२ मात्रा व उत्तरार्धात १८ मात्रा अशा एकूण ३० मात्रा असतात.

मोठा अभंग
मोठ्या अभंगात चार चरण असून पहिल्या तीन चरणांत प्रत्येकी सहा अक्षरे व चौथ्या चरणात चार अक्षरे असतात. दुस-या व तिस-या चरणांच्या शेवटी यमक असते.

उदा.
जाणावा तो ज्ञानी । पूर्ण समाधानी । निःसंदेह मनी । सर्वकाळ ॥

लहान अभंग
लहान अभंगाला दोन चरण असतात व प्रत्येक चरणात सामान्यतःआठ अक्षरे असतात. क्वचित पहिल्या चरणात सहा किंवा सात अक्षरे असतात. दुस-या चरणात केव्हा केव्हा नऊ किंवा दहा अक्षरेही येतात. दोन्ही चरणांत यमक असते.

उदा.
जे जे बोले तैसा चाले । तो चि वहिले निवांत ।
अंगी असोनि जाणपण । सदा सर्वदा तो लीन ॥

ओवी
ओवीला चार चरण असतात. पहिल्या तीन चरणांच्या शेवटी यमक असते. आधुनिक ओवीला तीनच चरण असतात. चौथा चरण लहान असला की त्याला साडेतीन चरणी ओवी म्हणतात. चरणांतील अक्षरांचे बंधन फारच शिथिल असते. ओवीच्या पहिल्या तीन चरणांतील प्रत्येकात पाचपासून पंधरापर्यंत अक्षरे असतात व चौथ्या चरणात पहिल्या तीन चरणांतील अक्षरांपेक्षा अधिक अक्षरे नसतात. अलीकडच्या ओव्यांत प्रत्येकी आठ अक्षरांचे चार चरण असून दुस-या व चौथ्या चरणांचे यमक जुळविलेले असते.

उदा.
मन वढाय वढाय । यभ्या पिकातलं ढोर ॥
किती हाकला हाकला । फिरी येतं पिकांवर ॥

मुक्तछंद
मुक्तछंद हा चौथा पद्यप्रकार आहे. तो नावाप्रमाणेच मुक्त असतो. मुक्तछंदातील रचनेच्या संदर्भात अक्षरे, गण, मात्रा या कशाचेच त्याला बंधन नसते. मुक्तछंदात कडवे अमुक इतक्या चरणांचे असावे असे बंधन नसते. कडवे पाच, सहा, सात कितीही चरणांचे असू शकते. कडव्यातील चरणांची संख्या आशयाच्या अनुषंगाने ठरते. मुक्तछंदात प्रत्येक अक्षराचा उच्चार दीर्घ व आघातप्रधान करायचा असतो. कवितेला एक अंतर्गत लय असणे आवश्यक असते. मुक्तछंद हा लयबद्ध पद्धतीने वाचायचा असतो.

उदा.
“ वेगानं निघून जाताना निदान वळून तरी बघायचे होते
वस्ती जळत होती आणि आमचे हात वर होते.”

READ  Advantages & Disadvantage of Privatization
%d bloggers like this: