माहूरचा किल्ला

माहूर / माहोर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.माहूर, नांदेड जिल्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. श्रीरेणुकादेवी मंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत. इतिहास प्रेमींसाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत.

शिवकाळात औरंगजेबाच्या आदेशावरून स्वराज्यावर चालून आलेली मुघलांची मनसबदार पंडिता रायबाघन (राजव्याघ्री) उर्फ सावित्रीबाई ही सुद्धा माहुरची. सावित्रीबाई माहूरचे राजे उदाराम देशमुख यांची पत्नी. राजे उदाराम यांच्या मृत्युनंतर वऱ्हाड प्रांतात हरचंदराय नावाच्या सरदाराने बंड केले.

हे बंड सावित्रीबाईने मोडून काढले व वऱ्हाड प्रांतातील मोघली अंमल कायम राहिला. सावित्रीबाईच्या ह्या कामगिरीवर खुश होऊन औरंगजेबाने सावित्रीबाईला ‘पंडिता’ आणि ‘रायबाघन’ हे दोन किताब बहाल केले.माहूर येथे रेणुकादेवीचे मुख्य स्थान असल्यामुळे वर्षभर माहूर भक्तांनी गजबजलेले असते.

येथे येणारे सर्व भाविक रेणुकादेवीचे, अनुसयामातेचे (दत्तात्रयांची आई) आणि दत्तशिखर येथे दत्तात्रयांचे दर्शन घेऊन निघून जातात.

माहूर येथे येणाऱ्या भाविकांपैकी बोटावर मोजता येतील एवढे भाविक माहूरच्या किल्ल्याला किंवा रामगडला भेट देतात. पण माहुर येथे असलेली लेणी पर्यटकांची वाट बघत असतात.

माहूर येथील लेण्यांना पांडवलेणी म्हणून ओळखले जाते. पांडवलेणी माहूर एसटी स्थानकापासून जास्तीत जास्त १५ मिनिटावर असूनसुद्धा येथे फारसे कोणीही येत नाही.माहूर येथील लेणी उत्तराभिमुखी असून एका टेकडीत कोरलेली आहेत. लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. लेणी साधारणपणे ६व्या ते ७व्या शतकात म्हणजे राष्ट्रकुट काळात कोरलेली आहेत. ही हिंदू लेणी असून लेणी संकुलात चार लेणी आहेत.

संकुलाच्या मध्यभागी दगडी खांबांनी युक्त असे मोठे लेणे आहे. या लेण्याच्या दर्शनी भागात दोन पूर्ण स्तंभ आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. वरांड्यातून मुख्य दालनात प्रवेश करताना सहा पूर्ण स्तंभ आणि २ अर्ध स्तंभ आपले लक्ष वेधून घेतात.

या खांबांवर शंकर, पार्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे कोरलेली आहेत. पण खांबाना पांढरा रंग मारलेला असल्यामुळे मूर्ती पटकन ओळखता येत नाहीत. या दालनाला जोडून गर्भगृह आहे.

गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. गर्भगृहाच्या दरवाज्यावर दोन्ही बाजूला द्वारपालांची भव्य शिल्प कोरलेली आहेत. गर्भगृहाला पूर्ण प्रदक्षिणा मारता येते.मुख्य लेण्याच्या डाव्या बाजूला दोन अर्धवट कोरलेली असून एका लेण्यात गणपतीची मूर्ती कोरलेली आहे, दुसरे लेणे रिकामे आहे.

मुख्य लेण्याच्या उजव्या बाजूला असलेल्या लेण्यांच्या दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. स्तंभांच्या पलीकडे मोठा वरंडा असून वरांडाच्या दोन्ही बाजूना विहार कोरलेले आहेत. हे दोन्ही विहार दिसायला सारखे असून दोघांच्याही दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ कोरलेले आहेत.

या लेण्याच्या अंतर्भागात आणखीन तीन लेणी कोरलेली असून यात देवतांच्या मूर्ती पण कोरलेल्या आहेत. पण लेण्यात असलेल्या अंधारामुळे या मूर्ती पटकन दिसून येत नाहीत.

या तिन्ही लेण्यात दगडी बाकसुद्धा कोरलेले आहेत.पांडव वनवासात असताना भीमाचे आणि हिडिंब राक्षसाचे युद्ध, भीम आणि हिडिंबेचा विवाह आणि घटोत्कचाचा जन्म याच पांडवलेण्यांच्या परिसरात झाला, असा स्थानिक लोकांचा समज आहे.

माहूर येथील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे : श्री रेणुकामाता मंदिरपरशुराम मंदिरअनुसयामाता मंदिरदत्तशिखरदेवदेवेश्वर मंदिरमाहूर संग्रहालयरामगड उर्फ माहूरचा किल्ला, किल्ल्यात असलेले महालक्ष्मी मंदिरराजे उदाराम देशमुख वाडासोनापीर दर्गा.

जाण्याचे मार्ग: माहूर येथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक किनवट. किनवट पासून माहूर साधारणपणे २० कि.मी.वर. पण किनवट येथे फार कमी गाड्या थांबत असल्यामुळे शेगाव किंवा अकोले सोयीचे.

जेवण आणि राहण्याची सोय : माहूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे राहण्यासाठी भरपूर धर्मशाळा / भक्त निवास आणि जेवणासाठी भरपूर उपहारगृहे उपलब्ध आहेत.

About takmukteshwar

Check Also

शिवनेरी किल्ला

शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. शिवनेरी हे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *