महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.

पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते..

कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.

मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे.अकराव्या शतकातील शिलालेखात ‘लिंगशैषाघौषहारिणी’ असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.

मंदिराची वास्तू

कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणार्‍या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे.

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिरासही देवपण येते व म्हणूनच देवळाची डागडुजी किंवा वाढ करणे संमत असले तरी कोणताही भाग काढून टाकणे किंवा पाडणे मान्य नाही. यामुळे जुन्या देवळांची मोठी वाढ झालेली दिसते. चैत्र पौर्णिमेच्या वेळी एका मागे एक अशा चढत जाणार्‍या व दीपांनी पाजळेल्या तीन शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो .

देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणार्‍या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्‌साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत. देवळाच्या प्राकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत.

महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे ( जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो.

शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. दर शुक्रवारी व आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार-चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायकिणींचे गाणे व नाच होत असे.

नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळदकुंकू वाहून तांब्यापितळेच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर ऊद घालून उदवायच्या व देवीसमोर फेर धरून फुंकावयाच्या असतात. या घागरी फुंकणार्‍या काही स्त्रियांचे अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो. व त्या भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात. इच्छा असल्यास पूर्ण होण्याचा उपाय सांगतात, असा समज आहे. एकंदर कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा आणि संबंधित उत्सव व पूजाअर्चा महाराष्ट्रीय मंदिर-प्रथांचे उत्तम उदाहरण आहे.

इतिहास व माहिती

महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबद्दल निश्चिती झालेली नाही. देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले.

. ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे माहात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते; कारण राष्ट्रकूट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आला आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्‍तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सीम भक्‍त होते. आपणास देवीचा “वरप्रसाद” मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो.

काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर-चालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणार्‍या काळया दगडात केली आहे. देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्‍वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. या उलट जैन पंथीयांचा असा दावा आहे की, हे देऊळ मूळचे जैन देवता पद्‍मावतीचे आहे आणि त्याचे शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले. मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे इ.स. १७२२ मध्ये दुसर्‍या संभाजीने त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली. ही प्रतिष्ठापना करण्यासाठी संभाजीने सिधोजी हिंदूराव घोरपडेला पन्हाळयाहून कोल्हापूरास रवाना केले होते.

हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्‍विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा करतात.

स्वरूप

प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दॄष्टीस पडतो. या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या मूर्ती बसविलेल्या आहेत. यापैकी प्रमुख मूर्ती म्हणजे तथाकथित भरत आणि शत्रुघ्न यांच्या होय. या मूर्तीबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. या मंडपातून मणि मंडपाकडे जाता येते. या मंडपाच्या पाठीमागील भिंतीच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या दोन सुंदर मूर्ती आहेत. या द्वारपालांना जय आणि विजय अशी नावे असून त्या मूर्ती (३.०५ मी.उंच) लढाऊ पवित्र्यामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मणि मंडपामधून महालक्ष्मीची मूर्ती ज्या आतील गाभार्‍यात आहे त्या ठिकाणी जाता येते. त्या ठिकाणी बंदिस्त केलेला मार्ग असून पूर्वी तेथे काळोख होता. देवीला प्रदक्षिणा घालण्यार्‍या भाविक लोकांना त्रास होऊ नये म्हणून विजेचे दिवे लावलेले आहेत. गाभार्‍याच्या प्रदक्षिणा मार्गातील भिंतींना तसेच गाभार्‍यात व मणि मंडपात संगमरवरी फरशी बसविलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीला बरेच मजले असून त्या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती असलेल्या जागेच्या वरच्या बाजूस एक लिंग आहे. मुख्य देवळाच्या बाहेरील बाजूला अप्रतिम कोरीव काम आहे. थोडया थोडया अंतरावर कोनाडे असून प्रत्येक कोनाडयामध्ये काळया दगडात कोरलेल्या स्वर्गीय वादक आणि अप्सरांच्या मूर्ती आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले त्या बांधकामाला एक लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. ज्याला गरुड मंडप किंवा सभा मंडप म्हणतात. तो इ.स. १८४४ ते इ.स. १८६७ या दरम्यान बांधण्यात आला. महालक्ष्मीच्या मुख्य देवळाभोवती दत्तात्रय, विठोबा, काशीविश्‍वेश्‍वर, राम आणि राधा कॄष्ण अशी इतर लहान मोठी देवळे आहेत. देवळाच्या सभोवारच्या मोकळया जागेत फसरबंदी केलेली आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला पूर्वी एक एक कुंड होते आणि त्यात कारंजे होते. या कुंडामध्ये भाविक लोक धार्मिक विधी करीत.

शिलालेख

देवळाच्या निरनिराळया भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्‍वराच्या देवळाच्या भिंतीवर शके ११४० मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८ चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे, आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो.

व्यवस्था व पालखी

महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दूरदूरच्या अंतराहून शेकडो अनेक भाविक येतात. त्यात पुण्या-मुंबईहून जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी एकंदर २० पुजारी आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. वर्षातून तीन वेळा उत्सव करण्यात येतो. त्यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो.या दिवशी महालक्ष्मीची पितळी प्रतिमा पालखीमध्ये घालून तिची मिरवणूक काढण्यात येते. दुसरा उत्सव म्हणजे आश्विन महिन्यातील पंचमीच्या दिवशी. या दिवशी कोल्हापूरपासून ४.८३ कि. मी. वर असलेल्या टेंबलाईच्या देवळापर्यंत महालक्ष्मीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक नेण्यात येते. त्यावेळी कसबा बावडा गावाचा जो प्रमुख असतो त्याच्या अविवाहित मुलीकडून टेंबलाईला कोहळयाचा नैवेद्य दाखवला जातो. अश्विन पौर्णिमेला दिवे आणि ज्योती लावून देवळाची आरास करण्यात येते आणि देवीला महाप्रसाद अर्पण करण्यात येतो.

अंबाबाई मंदिरातला किरणोत्सव

दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत आणि नोव्हेंबर्मध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. ती अशी :-

१. ३१ जानेवारी (आणि ९ नोव्हेंबर) : सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात.
२. १ फेब्रुवारी (आणि १० नोव्हेंबर : सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोचतात. ३. २ फेब्रुवारी (आणि ११ नोव्हेंबर) : मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात.

या सोहळ्याला महालक्ष्मीचा किरणोत्सव म्हणतात. हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात पार पडला जातो.

परिसर

महालक्ष्मीच्या देवळाच्या परिसरात असलेल्या देवळांपैकी शेषशायी व नवग्रहांचे देऊळ शिल्प आणि प्राचीनत्व या दॄष्टीने महत्त्वाची आहेत. शेषशायीचे देऊळ पूर्व दरवाजाच्या दक्षिणेला आहे. या देवळामध्ये विष्णूची मूर्ती शेषनागाच्या अंगावर पहुडलेली आहे. या देवळामध्ये एक लिंग असून देवळाच्या समोरच सुंदर मंडप आहे. त्याच्या छताच्या आतल्या बाजूला जो घुमट आहे त्याच्यावरील शिल्प आणि कोरीव काम इतके अप्रतिम आहे की, त्याची तुलना अबू येथील विमलसभा या वास्तूच्या छतावरील कोरीव कामाबरोबरच करता येईल. या कोरलेल्या छताच्या खालच्या बाजूला जैन तीर्थकरांच्या दिगंबर मूर्ती कोरलेल्या असून त्यांच्या बाजूला कन्नड भाषेतील शिलालेख आहे. या मंडपाची बांधणी बहुधा एखाद्या भाविक जैन राजाने केली असावी.

नवग्रहांच्या देवळालाही दर्शनी बाजूला एक सुंदर मंडप असून त्या मंडपाच्या छताला आतील बाजूवर असलेल्या नऊ तावदानावरून या मंडपाला नवग्रह मंडप म्हणतात. वास्तविक या उत्तर-चालुक्य अथवा होयसाळ काळातील छताप्रमाणे या मंडपाच्या छतावर मुख्य देवतेभोवती अष्ट दिक्‌पालांचे चित्रण आहे. ही मुख्य देवता जैन असावी अशा अनुमानास बराच आधार आहे. आवरातील दोन देवळे (शेषशायी व नवग्रह) जैन आहेत हे अर्थपूर्ण आहे. हा मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्पाचा एक अतिशय उत्कृष्ट असा नमुना आहे. मंडपाच्या वरच्या बाजूला हंसांच्या प्रतिकृती व टोकाला अप्सरांच्या अतिशय सुंदर मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. उजव्या बाजूच्या एका छोटया देवळात महिषासुराला मारणार्‍या दुर्गेची प्रतिमा आणि सूर्यदेवाला वाहून नेणार्‍या सात घोडयांच्या रथाचे उत्कृष्ट कोरीव काम आहे.डाव्या बाजूला असलेल्या देवळात नवग्रहांच्या मूर्ती असून त्यांची प्रतिष्ठापना अगदी अलीकडे करण्यात आलेली आहे.

वरील दोन देवळांव्यतिरिक्‍त आणखी छोटीछोटी पूजेची ठिकाणे मुख्य मंदिराच्या परिसरात असून त्या मध्ये हरिहरेश्‍वर, मुक्‍तेश्‍वरी आदि देवळांचा उल्लेख करावा लागेल. मंदिराच्या उत्तरेकडे पूर्वी काशी आणि मनकर्णिका या नावांची दोन कुंडे होती. ही कुंडे आता मातीने भरून गेलेली आहेत आणि तेथे असलेल्या मूर्ती आणि इतर प्रतिमा वस्तुसंग्रहालयात वा इतरत्र हलविण्यात आलेल्या आहेत. हल्ली महालक्ष्मीच्या देवस्थानाचा सर्व कारभार जिल्हाधिकारी एका समितीच्या मदतीने पहतात.

कोल्हापूर भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. या भागातील भरपूर नद्या आणि सुपीक जमीन यामुळे मुख्यत: शेतीवर आधारित उद्योग असूनही कोल्हापूर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये गणला जातो.

चतुःसीमा

कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा आहे. त्याच्या पश्चिम-नैऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा, पश्चिम-वायव्येला रत्‍नागिरी जिल्हा, उत्तर-ईशान्येला सांगली जिल्हा तर दक्षिणेला कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची रांग असून तेथील भाग डोंगराळ आहे.

भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग , मध्य रांग आणि पूर्व रांग असे तीन विभाग मानले जातात. मध्य आणि पूर्व भागातील माती अग्निजन्य खडकापासून बनली असल्याने काळ्या रंगाची आहे तर पश्चिम भागात घाटातील डोंगराळ भागातील जांभ्या खडकापासून बनलेली लाल माती आहे. या भागातील बहुतेक जमीन जंगलाने व्यापली आहे.

जिल्ह्यात पंचगंगा, वारणा, दुधगंगा, वेदगंगा, भोगावती, हिरण्यकेशी नदी आणि घटप्रभा या प्रमुख नद्या आहेत. या नद्या पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे वाहतात. पंचगंगा नदी कासारी, कुंभी, तुळशी आणि भोगावती या उपनद्यांपासून बनली आहे. कृष्णा जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरुन वाहते तर तिल्लारी नदी पश्चिम सीमेवरून पश्चिमेकडे वाहते.

दळणवळण

मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. अलीकडेच पुणे-कोल्हापूर हा महामार्ग चौपदरी करण्यात आल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचून आनुषंगिक फायदे होत आहेत.

कोल्हापूर व रत्‍नागिरीला जोडणारा आंबा घाट, सावंतवाडीला जोडणारा फोंडा घाट, तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याला जोडणारा अंबोली घाट हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत. या घाटांचा फक्त घाटमाथाच कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर – मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. पुणे, मुंबई ही राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूरला जोडली गेली आहेत.

महत्वाच्या शहरापासून अंतर-
मुंबई-३९५

पुणे-२३५

नागपूर-८०४

औरंगाबाद-४६०

रत्‍नागिरी-१२९

ऐतिहासिक महत्त्व

कोल्हापूर ज्या मूळ गावापासून विस्तार पावले ते गाव ब्रह्मपुरी होय. इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापूर जिल्हा परिसरावर आंध्रभृत्य, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव व बहामनी अशा अनेक राजवटींचा अंमल होता. कोल्हापूरच्या आसपास केलेल्या उत्खननात, तेथील पुरातन अवशेषांवर सातवाहनकालीन व बौद्ध धर्माच्या खुणादेखील आढळल्या आहेत. कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च, १६७३ मध्ये पन्हाळा जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खर्‍या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला.

कोल्हापूरच्या गादीचा इतिहास – इ.स. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला त्या वेळी छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांनी पन्हाळ्यावरून राज्य चालवण्याचा प्रथम प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी रायगडाकडे कूच केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी १६९८ मध्ये सातार्‍याला छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाईंनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. राणी ताराबाईंनी पन्हाळ्यावर १७१० मध्ये स्वतंत्र राज्य स्थापनेची घोषणा केली.

करवीर गादीची स्थापना करणार्‍या सरदार राणी ताराबाईंची कारकीर्द १७०० ते १७६१ अशी प्रदीर्घ होती. या कालावधीत मराठी राज्यात दुही माजली होती. ताराबाई व संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांच्यामध्ये अनेक वर्षे संघर्ष चालू होता. त्याचे केंद्र करवीरची गादी व कोल्हापूरचा परिसरच होता. राजारामांच्या दुसर्‍या पत्‍नीचा मुलगा दुसरा संभाजी तसेच, छत्रपती शाहू यांच्यामध्येही संघर्ष चालू होता. १७३१ मध्ये याच परिसरात वारणा नदीच्या काठी शाहू व दुसरा संभाजी यांच्यामध्ये तह झाला व महाराष्ट्रातील दुर्दैवी कलहाची सांगता झाली.

१७८२ मध्ये कोल्हापूरची राजधानी पन्हाळ्याहून कोल्हापूरला आली. तिसरा शिवाजी यांचे त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १८१२ पर्यंत (५२ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द) कोल्हापूर गादीवर वर्चस्व होते. १८१८ च्या दरम्यान बहुतांश महाराष्ट्र ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता. पण ब्रिटिशांनी कोल्हापूर संस्थान खालसा केले नाही, त्याचे अस्तित्त्व कायम ठेवले. पुढे १९४९ मध्ये संस्थान भारतीय संघराज्यात विलीन होईपर्यंत कोल्हापूर स्वतंत्र होते.

राजकीय संरचना

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा व १० विधानसभा मतदारसंघ आहेत.

लोकसभा मतदारसंघ : कोल्हापूर, हातकणंगले.

विधानसभा मतदारसंघ : चंदगड,राधानगरी, कागल,कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ.

तसेच ६७ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३४ पंचायत समिती मतदारसंघ जिल्ह्यात आहेत.
हवामान

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात कोरडे तर पश्मिम घाटातील भागांत थंड हवामान असते. जिल्ह्यात पाऊस मुख्यपणे जून ते सप्टेंबर या काळात नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांमुळे मिळतो, एप्रिल आणि मे महिन्यांत वळिवाचा पाऊसही पडतो. जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. येथील गगनबावड्यामध्ये वार्षिक सरासरी ५००० मि.मी. पाऊस असतो. त्यामानाने पूर्वेकडील तालुक्यांमध्ये कमी म्हणजे वार्षिक सरासरी ५०० मि.मी. पाऊस असतो.
उद्योग

कोल्हापुरातील मुख्य उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय होत. याशिवाय कोल्हापूर शहराजवळ लोहकाम ( ज्यात मुख्यत: मोटारींचे भाग तयार केले जातात अशा फाउंड्रीज) आणि कोल्हापुरी चपला बनवण्याचे बरेच छोटे कारखाने आहेत. इचलकरंजी या शहरात बरेच वस्त्रकामाशी संबंधित उद्योग आणि कारखाने आहेत. हे कारखाने तयार मालाची थेट निर्यात करतात. हुपरी हे गाव चांदीकामासाठी प्रसिद्ध आहे. सहकार व उद्योगधंदे – कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते. सहकारी चळवळ भारतात व महाराष्ट्रात रुजण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात (१९१२-१३) कोल्हापूर संस्थानात सहकारी संस्था अधिनियम राजर्षी शाहू महाराजांनी लागू केला होता. तसेच सहकार तत्त्वाच्या अगदी जवळ जाणरी भिसी पद्धत किंवा पुष्टीफंड योजना १९ व्या शतकात फक्त कोल्हापूर जिल्ह्यात अस्तित्वात होती. भिशी पद्धत सहकारी बँकेची छोटी प्रतिकृती असून गेली २०० वर्षे जिल्ह्यात अस्तित्वात आहे. याचाच परिणाम म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यात हजारो सहकारी संस्था (सहकारी बँका, पतसंस्था, दूध सोसायट्या, सहकारी साखर कारखाने, शेतकी सहकारी संस्था… इ.) कार्यरत आहेत.

जिल्ह्यात कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी, हुपरी, यड्राव, हातकणंगले शिरोळ, शिरोली, हलकर्णी व गडहिंग्लज या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. इचलकरंजी येथील औद्योगिक वसाहत ही सहकारी तत्त्वावरील देशातील सर्वांत मोठी वसाहत आहे. जिल्ह्यातील इचलकरंजी या गावाला महाराष्ट्राचे मँचेंस्टर म्हटले जाते. येथील यंत्रमाग व हातमाग उद्योग प्रसिद्ध आहे. दी डेक्कन को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल (१९६२) व कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी संस्था (१९६२) या महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी सूत गिरण्या इचलकरंजी येथे सुरू करण्यात आल्या. (काही पुस्तकांत या गिरण्या देशांतील पहिल्या सूत गिरण्या असल्याचा उल्लेख आढळतो.)

जिल्ह्यातील अभियांत्रिकी उद्योग भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील हजारो अभियांत्रिकी कार्यशाळांमध्ये, फाऊंड्रीजमध्ये ऑईल इंजिन्स, शेतीची अवजारे, विविध यंत्रांचे सुटे भाग, तांब्याची व ॲल्युमिनियमची तार इत्यादी गोष्टी बनवल्या जातात. येथील यंत्रांची, सुट्या भागांची फिलिपाईन्स, सिरिया, इराण, घाना, इजिप्त या देशांमध्ये निर्यात केली जाते.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ ही जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण संस्था गोकूळ या नावाने ओळखली जाते. या संस्थेच्या गोकूळ दुधाचा पुरवठा पूर्ण महाराष्ट्रात (प्रामुख्याने मुंबईला) केला जातो. एकूण २५०० सहकारी दूध सोसायट्या (डेअर्‍या) या संघाच्या सभासद आहेत. जिल्ह्यात वारणानगर येथे दुधाचे पदार्थ तयार करण्याचा उद्योग आहे. वारणा सहकारी दूध उत्पादक संघाचे वारणा दूध तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ मुंबई, ठाणे, पुण्यासह कर्नाटक व गोवा या राज्यातही जातात.

पूर्वीपासूनच्या उसाच्या भरघोस उत्पादनामुळे जिल्ह्यातील गूळ उद्योगाला सुमारे १५० वर्षांची परंपरा आहे. येथील गूळ महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांतही प्रसिद्ध आहे. येथील साखरही प्रसिद्ध असून पूर्वीपासून साखरेची निर्यात केली जाते.

जिल्ह्यातील कागल, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यामुळे जिल्ह्यात विडी उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालतो.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत बनणार्‍या कोल्हापुरी चपला भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पर्यटकांसाठी हा आकर्षणाचा मुद्दा आहेच, शिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांत कोल्हापुरी चपलांची निर्यात केली जाते. कागल तालुक्यातील कापशी हे गावही या चपलांसाठी प्रसिद्ध आहे.

येथील हुपरी हे गाव चांदीवरील कलाकुसरीच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. येथे सोनार समाजासह मराठा, ब्राह्मण, जैन व मुस्लीम कारागीरही या उद्योगात व्यस्त आहेत. कोल्हापुरी डोरले (मंगळसूत्र) व कोल्हापुरी साज (गळ्यातील दागिना) महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत.

जिल्ह्यात हिरडा या औषधी वनस्पतीची खूप झाडे आहेत. त्यामुळे हिड्यांपासून टॅनिन (औषधी अर्क) बनवण्याचा कारखाना आंबा गावाजवळ सुरू करण्यात आला आहे.

शेती

जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. पश्चिमेकडील भागात मुख्यत: भात पिकतो. खरीप पिकांमध्ये मुख्यत: भाताव्यतिरिक्त ऊस, भुईमूग, सोयाबीन व ज्वारी, नाचणी काही प्रमाणात असतात. रब्बी पिकांमध्ये मुख्यतः ज्वारी, गहू आणि तूर ही पिके घेतली जातात. तांदूळ हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. प्रामुख्याने चंदगड, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांत ते मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. ऊस हेही जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक आहे. त्याचप्रमाणे कागल, हातकणंगले व शिरोळ या तालुक्यांत तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. दर हेक्टरी खतांचा सर्वांत अधिक वापर करणारा हा जिल्हा आहे.

सहकारी तत्त्वावर ऊस शेती ही पद्धत कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे २०० वर्षांपासून रूढ आहे. या पद्धतीस उसाची फड पद्धत असे म्हणतात. कोणताही लिखित कायदा, नियमावली, लेखी करार या गोष्टी नसतानाही केवळ शेतकर्‍याच्या परस्पर सहकार्याच्या भावनेमुळे ही पद्धत अखंडपणे चालू आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात ही सहकारी शेती पद्धत आजही अस्तित्वात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात भात संशोधन केंद्र (राधानगरी), फळ संशोधन केंद्र (आजरा) ही उपकेंद्रे असून ऊस संशोधन केंद्र (कोल्हापूर) हे प्रादेशिक संशोधन केंद्रही कार्यरत आहे. कृषी मालाची विक्री, कृषीविषयक आवश्यक माहितीचा प्रचार यांसाठी इंटरनेटने जोडलेले देशातील पहिले गाव म्हणजे जिल्ह्यातील वारणा हे होय.

रत्नागिरी येथील श्री ज्योतिबादेवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे.

स्थान

समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट उंचीवरील या ज्योतिबा डोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भोतिक व ऐहिक ऎश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वागीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि. मी. वर आहे.

सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे. त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो, तोच ज्योतिबाचा डोंगर ! या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले हे ज्योतिबाबाचे पुरातन मंदिर आहे.
महत्त्व

दक्षिण काशी म्हणून भारतभर ख्यातकीर्द असलेल्या करवीरपीठास धर्म शास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहे.दख्खनचा राजा श्री.जोतिबा श्री जोतिबा ,श्री कात्यायनी देवी ,नृसिंहवाडी येथील श्रीक्षेत्र दत्तात्रय मंदीर, बाहुबली येथील जैन धर्मियांचे पवित्र क्षेत्र त्याचप्रमाणे विशाळगड दर्गा आदि धर्मस्थळांमुळे कोल्हापूरचा लौकिक त्रिखंडात झाला आहे.त्यामुळे कोल्हापूरास अलौकिक स्थान महात्म्य प्राप्त झाले आहे.या धर्मस्थळांपैकी वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे.समुद्रसपाटीपासुन सुमाले ३१०० फूट उंचीवरील या जोतिबा डोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भौतिक व एतहासिक एश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आ स्थान माहात्म्य व पूर्वपीठिका . डोंगरावरील उंच-सखल भागात वाडी रत्नागिरीचे गावठाण वसले असून , सुमारे ५ हजार लोकवस्तीच्या या गावात ९९‍ लोक गुरव समाजाचे आहे.देवताकृत्य तसेच नारळ,गुलाल व मेवामिठाई दुकाने यावरच त्यांची गुजराण होते.

वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि.मी.वर आहे.सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे.त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो,तोच जोतिबाचा डोंगर या डोंगरावर प्राचीन काळापूसन प्रसिद्ध असलेले हे जोतिबाचे पुरातन मंदीर आहे.

श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक तेज:पुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ! ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश ! वायू, तेज, आप (पाणी) आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा ज्योतिबा ! पौगंड ऋषीच्या वंशाला दिवा नव्हता.त्यांनी तपश्चर्या करून ब्रदिनाथांना संतुष्ट केले.ब्रदिनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले त्याप्रमाणे चैत्र शुद्ध पष्ठीच्या मुहूर्तावर स्वता आठ वर्षांची बालमुर्ती होऊन ब्रदिनाथ हे ऋषी दांपत्यासमोर अवतरले ही बालमुर्ती ब्रदिनाथांची प्राणज्योती । म्हणून त्यांचे नाव जोतिबा असे ठेवले.आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमलांबुजाची तीव्र इच्छा होती,त्याप्रमाणे तिच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली,तेच जोचिबाचे रूप होय.श्री जोतिबाला गुलाल,दवणा,खोबरे व खारका प्रिय। त्याच्या दवण्याला गंध हा सत्व,रज,तम गुणयुक्त आहे.

पुजा

श्री जोतिबा हे बद्रिकेदाराचे रूप. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजःपुंज अवतार म्हणजेच जोतिबा होय. जोतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली आहे. जोतिबा देव दख्खन केदार, सौदागर, खवळनाथ या नावांनीही ओळखला जातो. जोतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती साडेचार फूट उंचीची आहे. मूर्ती बटू भैरवनाथाच्या अवतारातील असून चतुर्भुज आहे. मूर्तीच्या हाती खड्‌ग, त्रिशूल, डमरू असून त्यांचे वाहन घोडा आहे.

जोतिबा देवाची रोज तीन वेळा पूजा बांधली जाते. पहिली साधी पूजा सकाळच्या महाभिषेकापूर्वी, दुसरी खडी पूजा अभिषेकानंतर तर तिसरी पूजा बैठी असते. ती दुपारनंतर बांधण्यात येते. दर शनिवारी “श्रीं’ची दुपारी बारा ते तीन वेळेत घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते. सर्व पूजा डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या असतात. दक्षिण मोहिमेत श्री केदारनाथ व औंदासूर या राक्षसाची समोरासमोर भेट झाली. निकराचे युद्ध झाले; परंतु औंदासुराचा वध मूळ माया श्री यमाईदेवीच्या हस्ते असल्याने जोतिबा देवांनी देवीस “यमाई’ अशी साद घातली. तेव्हापासून देवीचे नाव यमाई असे रूढ झाले. यमाई ही जोतिबाची बहीण आहे.

चैत्र यात्रेदिवशी सासनकाठी व पालखी सोहळा सर्व लवाजमा यमाईदेवीच्या भेटीस जातो. देवीस मीठ-पीठ वाहण्याची पर्वापार परंपरा आहे. नवीन लग्न झालेले दांपत्य मंदिरासमोर दगडांच्या व खापरांच्या उतरंडी लावतात. ही उतरंड म्हणजे चौदा चौक कड्या व सात समुद्ररूपी विश्‍वाचे प्रतीक. “आम्ही नवजीवनाची सुरवात तुझ्या दारातून करतो, तेव्हा आमचा संसार सुखी कर’ असे साकडे घालून भाविक देवीस मीठ-पीठ अर्पण करतात. यमाईदेवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत. ही शिल्पे माणसाने, माणसाशी माणसासारखे वागावे ही शिकवण देतात. बहीण भावाचे, अर्धपशूचे, कृष्ण व दुधाचे माठ घेऊन जाणाऱ्या गवळणी, रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी शिल्पे आहेत. जोतिबाच्या धार्मिक विधीत उंट, घोडे, हत्तीला पूर्वीपासून मोठा मान आहे. पालखी सोहळा, धूपारती यात प्राण्यांचा सहभाग असतो.

सासनकाठी मिरवणुक

रत्नासुर व कोल्हासुर या राक्षसांनी अत्याचार सुरू केला होता. तेव्हा करवीर निवासनी श्री महालक्ष्मीने केदारनाथांचा (जोतिबा) धावा केला. तेव्हा जोतिबा देवाने राक्षसांचा संहार केला. हे राक्षस मारल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचा राज्याभिषेक केदारनाथांनी केला व ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले, तेव्हा महालक्ष्मी व चोपडाई देवीने त्यांना वाडी रत्नागिरीवर परत आणले व त्यांचा राज्याभिषेक केला. सोहळ्यास यमाई देवीस निमंत्रण देण्याचे विसरल्याने त्या रुसल्या. त्यांचा रुसवा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ औंध गावी जात होते. त्यावेळी यमाई देवीने केदारनाथांना सांगितले की तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरीवरील चाफेबनात येते. तेव्हापासून केदारनाथ चैत्र पौर्णिमेस श्री यमाई देवीची भेट घेण्यासाठी सासनकाठी लवाजम्यासह जातात. हीच चैत्र यात्रा होय.

चैत्र यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. . सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात. हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचविल्या जातात. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचतो. सर्वांच्या मुखात जोतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर असतो.

हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो,त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार फक्त संत नावजीनाथच्या किवळ काठीस पानाचा विडा देऊन आमंत्रण् देतात आणि तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होतो. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान इनाम पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा,त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्या मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी होतात. मान नसलेल्या ५७ आणि इतर २९ अशा एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठ्यांच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होते.फक्त संत नावजीनाथ किवळ (जि. सातारा) याच सासनकाठीला यमाई मंदिराच्या दारात उभे राहण्याचा मान आहे.सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होतो. त्यानंतर ‘श्रीं’ची पालखी व संत नावजीनाथांची सासन काठी परत श्री जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होते.

मंदिर

श्री जोतिबाचे आज जे मोठे मंदीर दिसते आहे त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते.मूळ मंदीर कराडजवळच्या किवळ येथील नावजीबुवा साळुंखे-किवळकर (संत नावजीनाथ) नामक भक्ताने बांधले व त्याचे नंतर आजचे देवालय आहे ते इ.स.१७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मुळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले.मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्या वेसाल्ट दगडात करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या वायव्य दिशेस साडेसतरा किलोमीटर अंतरावर वाडीरत्नागिरी येथे दख्खनचा राजा जोतिबाचे भव्य पुरातन असे मंदिर आहे. हे तीर्थ ज्या पर्वतावर वसलेले आहे, त्या डोंगराचे मूळ नाव मौनागिरी. डोंगरावर उत्तरेकडील बाजूस खोलगट भागामध्ये जोतिबाचे मंदिर आहे. मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली शैलीतील असून, या ठिकाणी तीन मंदिरांचा समूह आहे. मुख्य मंदिर हे प्राचीन असून उर्वरित दोन मंदिरे ही अठराव्या शतकात बांधल्याचा उल्लेख आढळतो. प्रत्येक मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. जोतिबा मंदिर हे अतिप्राचीन असून ते महालक्ष्मी मंदिराच्या बरोबरीचे आहे. पन्हाळा राजधानी असलेल्या शिलाहार या राजाने ते बांधल्याची आख्यायिका आहे. जोतिबाचे परमभक्त नावजी यांनी मंदिर बांधल्याचा उल्लेखही आढळतो. आजचे देवालय हे 1730 मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मूळ ठिकाणी भव्य रूपात पुर्नचित करून बांधले. मंदिर उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना आहे. मंदिराचा दगड मंदिरातील तापमान संतुलित राखण्याचे काम करतो. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये गाभाऱ्याबरोबरच मंदिराच्या बाहेर व मंडपात भाविकांना गारव्याचा अनुभव घेता येतो. जोतिबावरील नंदीचे दक्षिणाभिमुख मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. असे मंदिर क्वचित आढळते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एकाऐवजी दोन नंदी आहेत. हे दोन्ही नंदी म्हणजे ईश्‍वराच्या सगुण, निर्गुणाच्या भक्तीचे प्रतीक होय. या मंदिरासमोरील महादेव मंदिराला जोडूनच आदीमाया चोपडाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराभोवती अष्टप्रधानांची स्थापना केलेली आहे. या शिवाय गोरक्षनाथ (आदिनाथ), रामेश्‍वर, शंखभैरव, हरिनारायण मंदिर, दत्त मंदिर आहेत. दुसरे केदारेश्वराचे देवालय.विशेष म्हणजे ते खांबाच्या आधाराशिवाय उभे आहे.हे मंदीर इ.स.१८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले.केदारलिंग व केदारेश्वर यामध्ये चर्पंटावा म्हणजे चोपडाई देवालय आहे.इ.स.१७५० मध्ये प्रीतीराव चव्हाण (हिम्मतबहादूर) यांनी बांधले. यी तीन देवळांचा एक गट होतो.चौथे सामाश्वरीचे देवालय हे इ.स.१७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी बांधले.

सण उत्त्सव

जोतिबावर सरता रविवार, लळित सोहळा, नगरप्रदक्षिणा, अकरा मारुती दिंडी, नवरात्रोत्सव, पालखी सोहळे, श्रावण षष्ठी यात्रा असे अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. जोतिबाचे मंदिर हे ठरावीक दिवसांसाठीच रात्रंदिवस खुले असते. चैत्र यात्राकाळात तीन दिवस, श्रावण षष्ठी यात्रेत, चैत्र षष्ठीस, लळित सोहळ्यास, विजयादशमीचा जागर या दिवशी ते रात्रंदिवस खुले असते.

भक्त

जोतिबाच्या दक्षिणद्वारी कापूर-अगरबत्ती जेथे लावली जाते, त्या पायरीला लागून आडवी मूर्ती आणि ज्यावर भक्तिभावाने गुलाल-फुले वाहिली जातात त्या पादुका परमभक्त नावजी बुवांच्या. देवाच्या दारी पायरीजवळ अजरामर होऊन राहण्याचा मान किवळ (ता. कराड) येथील नावजी ससे (पाटील) यांना लाभला आहे. या पायरीवर दक्षिण बाजूलाच देवालयाच्या शिखरावर नावजींचा बैठ्या स्वरूपातील पुतळा आहे.

कोल्हापूर भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. या भागातील भरपूर नद्या आणि सुपीक जमीन यामुळे मुख्यत: शेतीवर आधारित उद्योग असूनही कोल्हापूर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये गणला जातो.

चतुःसीमा

कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा आहे. त्याच्या पश्चिम-नैऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा, पश्चिम-वायव्येला रत्‍नागिरी जिल्हा, उत्तर-ईशान्येला सांगली जिल्हा तर दक्षिणेला कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची रांग असून तेथील भाग डोंगराळ आहे.

भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग , मध्य रांग आणि पूर्व रांग असे तीन विभाग मानले जातात. मध्य आणि पूर्व भागातील माती अग्निजन्य खडकापासून बनली असल्याने काळ्या रंगाची आहे तर पश्चिम भागात घाटातील डोंगराळ भागातील जांभ्या खडकापासून बनलेली लाल माती आहे. या भागातील बहुतेक जमीन जंगलाने व्यापली आहे.

जिल्ह्यात पंचगंगा, वारणा, दुधगंगा, वेदगंगा, भोगावती, हिरण्यकेशी नदी आणि घटप्रभा या प्रमुख नद्या आहेत. या नद्या पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे वाहतात. पंचगंगा नदी कासारी, कुंभी, तुळशी आणि भोगावती या उपनद्यांपासून बनली आहे. कृष्णा जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरुन वाहते तर तिल्लारी नदी पश्चिम सीमेवरून पश्चिमेकडे वाहते.

दळणवळण

मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. अलीकडेच पुणे-कोल्हापूर हा महामार्ग चौपदरी करण्यात आल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचून आनुषंगिक फायदे होत आहेत.

कोल्हापूर व रत्‍नागिरीला जोडणारा आंबा घाट, सावंतवाडीला जोडणारा फोंडा घाट, तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याला जोडणारा अंबोली घाट हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत. या घाटांचा फक्त घाटमाथाच कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर – मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. पुणे, मुंबई ही राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूरला जोडली गेली आहेत.

महत्वाच्या शहरापासून अंतर-
मुंबई-३९५

पुणे-२३५

नागपूर-८०४

औरंगाबाद-४६०

रत्‍नागिरी-१२९

ऐतिहासिक महत्त्व

कोल्हापूर ज्या मूळ गावापासून विस्तार पावले ते गाव ब्रह्मपुरी होय. इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापूर जिल्हा परिसरावर आंध्रभृत्य, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव व बहामनी अशा अनेक राजवटींचा अंमल होता. कोल्हापूरच्या आसपास केलेल्या उत्खननात, तेथील पुरातन अवशेषांवर सातवाहनकालीन व बौद्ध धर्माच्या खुणादेखील आढळल्या आहेत. कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च, १६७३ मध्ये पन्हाळा जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खर्‍या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला.

कोल्हापूरच्या गादीचा इतिहास – इ.स. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला त्या वेळी छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांनी पन्हाळ्यावरून राज्य चालवण्याचा प्रथम प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी रायगडाकडे कूच केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी १६९८ मध्ये सातार्‍याला छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाईंनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. राणी ताराबाईंनी पन्हाळ्यावर १७१० मध्ये स्वतंत्र राज्य स्थापनेची घोषणा केली.

करवीर गादीची स्थापना करणार्‍या सरदार राणी ताराबाईंची कारकीर्द १७०० ते १७६१ अशी प्रदीर्घ होती. या कालावधीत मराठी राज्यात दुही माजली होती. ताराबाई व संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांच्यामध्ये अनेक वर्षे संघर्ष चालू होता. त्याचे केंद्र करवीरची गादी व कोल्हापूरचा परिसरच होता. राजारामांच्या दुसर्‍या पत्‍नीचा मुलगा दुसरा संभाजी तसेच, छत्रपती शाहू यांच्यामध्येही संघर्ष चालू होता. १७३१ मध्ये याच परिसरात वारणा नदीच्या काठी शाहू व दुसरा संभाजी यांच्यामध्ये तह झाला व महाराष्ट्रातील दुर्दैवी कलहाची सांगता झाली.

१७८२ मध्ये कोल्हापूरची राजधानी पन्हाळ्याहून कोल्हापूरला आली. तिसरा शिवाजी यांचे त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १८१२ पर्यंत (५२ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द) कोल्हापूर गादीवर वर्चस्व होते. १८१८ च्या दरम्यान बहुतांश महाराष्ट्र ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता. पण ब्रिटिशांनी कोल्हापूर संस्थान खालसा केले नाही, त्याचे अस्तित्त्व कायम ठेवले. पुढे १९४९ मध्ये संस्थान भारतीय संघराज्यात विलीन होईपर्यंत कोल्हापूर स्वतंत्र होते.

राजकीय संरचना

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा व १० विधानसभा मतदारसंघ आहेत.

लोकसभा मतदारसंघ : कोल्हापूर, हातकणंगले.

विधानसभा मतदारसंघ : चंदगड,राधानगरी, कागल,कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ.

तसेच ६७ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३४ पंचायत समिती मतदारसंघ जिल्ह्यात आहेत.
हवामान

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात कोरडे तर पश्मिम घाटातील भागांत थंड हवामान असते. जिल्ह्यात पाऊस मुख्यपणे जून ते सप्टेंबर या काळात नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांमुळे मिळतो, एप्रिल आणि मे महिन्यांत वळिवाचा पाऊसही पडतो. जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. येथील गगनबावड्यामध्ये वार्षिक सरासरी ५००० मि.मी. पाऊस असतो. त्यामानाने पूर्वेकडील तालुक्यांमध्ये कमी म्हणजे वार्षिक सरासरी ५०० मि.मी. पाऊस असतो.
उद्योग

कोल्हापुरातील मुख्य उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय होत. याशिवाय कोल्हापूर शहराजवळ लोहकाम ( ज्यात मुख्यत: मोटारींचे भाग तयार केले जातात अशा फाउंड्रीज) आणि कोल्हापुरी चपला बनवण्याचे बरेच छोटे कारखाने आहेत. इचलकरंजी या शहरात बरेच वस्त्रकामाशी संबंधित उद्योग आणि कारखाने आहेत. हे कारखाने तयार मालाची थेट निर्यात करतात. हुपरी हे गाव चांदीकामासाठी प्रसिद्ध आहे. सहकार व उद्योगधंदे – कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते. सहकारी चळवळ भारतात व महाराष्ट्रात रुजण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात (१९१२-१३) कोल्हापूर संस्थानात सहकारी संस्था अधिनियम राजर्षी शाहू महाराजांनी लागू केला होता. तसेच सहकार तत्त्वाच्या अगदी जवळ जाणरी भिसी पद्धत किंवा पुष्टीफंड योजना १९ व्या शतकात फक्त कोल्हापूर जिल्ह्यात अस्तित्वात होती. भिशी पद्धत सहकारी बँकेची छोटी प्रतिकृती असून गेली २०० वर्षे जिल्ह्यात अस्तित्वात आहे. याचाच परिणाम म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यात हजारो सहकारी संस्था (सहकारी बँका, पतसंस्था, दूध सोसायट्या, सहकारी साखर कारखाने, शेतकी सहकारी संस्था… इ.) कार्यरत आहेत.

जिल्ह्यात कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी, हुपरी, यड्राव, हातकणंगले शिरोळ, शिरोली, हलकर्णी व गडहिंग्लज या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. इचलकरंजी येथील औद्योगिक वसाहत ही सहकारी तत्त्वावरील देशातील सर्वांत मोठी वसाहत आहे. जिल्ह्यातील इचलकरंजी या गावाला महाराष्ट्राचे मँचेंस्टर म्हटले जाते. येथील यंत्रमाग व हातमाग उद्योग प्रसिद्ध आहे. दी डेक्कन को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल (१९६२) व कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी संस्था (१९६२) या महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी सूत गिरण्या इचलकरंजी येथे सुरू करण्यात आल्या. (काही पुस्तकांत या गिरण्या देशांतील पहिल्या सूत गिरण्या असल्याचा उल्लेख आढळतो.)

जिल्ह्यातील अभियांत्रिकी उद्योग भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील हजारो अभियांत्रिकी कार्यशाळांमध्ये, फाऊंड्रीजमध्ये ऑईल इंजिन्स, शेतीची अवजारे, विविध यंत्रांचे सुटे भाग, तांब्याची व ॲल्युमिनियमची तार इत्यादी गोष्टी बनवल्या जातात. येथील यंत्रांची, सुट्या भागांची फिलिपाईन्स, सिरिया, इराण, घाना, इजिप्त या देशांमध्ये निर्यात केली जाते.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ ही जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण संस्था गोकूळ या नावाने ओळखली जाते. या संस्थेच्या गोकूळ दुधाचा पुरवठा पूर्ण महाराष्ट्रात (प्रामुख्याने मुंबईला) केला जातो. एकूण २५०० सहकारी दूध सोसायट्या (डेअर्‍या) या संघाच्या सभासद आहेत. जिल्ह्यात वारणानगर येथे दुधाचे पदार्थ तयार करण्याचा उद्योग आहे. वारणा सहकारी दूध उत्पादक संघाचे वारणा दूध तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ मुंबई, ठाणे, पुण्यासह कर्नाटक व गोवा या राज्यातही जातात.

पूर्वीपासूनच्या उसाच्या भरघोस उत्पादनामुळे जिल्ह्यातील गूळ उद्योगाला सुमारे १५० वर्षांची परंपरा आहे. येथील गूळ महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांतही प्रसिद्ध आहे. येथील साखरही प्रसिद्ध असून पूर्वीपासून साखरेची निर्यात केली जाते.

जिल्ह्यातील कागल, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यामुळे जिल्ह्यात विडी उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालतो.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत बनणार्‍या कोल्हापुरी चपला भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पर्यटकांसाठी हा आकर्षणाचा मुद्दा आहेच, शिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांत कोल्हापुरी चपलांची निर्यात केली जाते. कागल तालुक्यातील कापशी हे गावही या चपलांसाठी प्रसिद्ध आहे.

येथील हुपरी हे गाव चांदीवरील कलाकुसरीच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. येथे सोनार समाजासह मराठा, ब्राह्मण, जैन व मुस्लीम कारागीरही या उद्योगात व्यस्त आहेत. कोल्हापुरी डोरले (मंगळसूत्र) व कोल्हापुरी साज (गळ्यातील दागिना) महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत.

जिल्ह्यात हिरडा या औषधी वनस्पतीची खूप झाडे आहेत. त्यामुळे हिड्यांपासून टॅनिन (औषधी अर्क) बनवण्याचा कारखाना आंबा गावाजवळ सुरू करण्यात आला आहे.

शेती

जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. पश्चिमेकडील भागात मुख्यत: भात पिकतो. खरीप पिकांमध्ये मुख्यत: भाताव्यतिरिक्त ऊस, भुईमूग, सोयाबीन व ज्वारी, नाचणी काही प्रमाणात असतात. रब्बी पिकांमध्ये मुख्यतः ज्वारी, गहू आणि तूर ही पिके घेतली जातात. तांदूळ हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. प्रामुख्याने चंदगड, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांत ते मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. ऊस हेही जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक आहे. त्याचप्रमाणे कागल, हातकणंगले व शिरोळ या तालुक्यांत तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. दर हेक्टरी खतांचा सर्वांत अधिक वापर करणारा हा जिल्हा आहे.

सहकारी तत्त्वावर ऊस शेती ही पद्धत कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे २०० वर्षांपासून रूढ आहे. या पद्धतीस उसाची फड पद्धत असे म्हणतात. कोणताही लिखित कायदा, नियमावली, लेखी करार या गोष्टी नसतानाही केवळ शेतकर्‍याच्या परस्पर सहकार्याच्या भावनेमुळे ही पद्धत अखंडपणे चालू आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात ही सहकारी शेती पद्धत आजही अस्तित्वात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात भात संशोधन केंद्र (राधानगरी), फळ संशोधन केंद्र (आजरा) ही उपकेंद्रे असून ऊस संशोधन केंद्र (कोल्हापूर) हे प्रादेशिक संशोधन केंद्रही कार्यरत आहे. कृषी मालाची विक्री, कृषीविषयक आवश्यक माहितीचा प्रचार यांसाठी इंटरनेटने जोडलेले देशातील पहिले गाव म्हणजे जिल्ह्यातील वारणा हे होय.

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.

पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते..

कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.

मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे.अकराव्या शतकातील शिलालेखात ‘लिंगशैषाघौषहारिणी’ असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.

मंदिराची वास्तू

कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणार्‍या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे.

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिरासही देवपण येते व म्हणूनच देवळाची डागडुजी किंवा वाढ करणे संमत असले तरी कोणताही भाग काढून टाकणे किंवा पाडणे मान्य नाही. यामुळे जुन्या देवळांची मोठी वाढ झालेली दिसते. चैत्र पौर्णिमेच्या वेळी एका मागे एक अशा चढत जाणार्‍या व दीपांनी पाजळेल्या तीन शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो .

देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणार्‍या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्‌साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत. देवळाच्या प्राकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत.

महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे ( जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो.

शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. दर शुक्रवारी व आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार-चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायकिणींचे गाणे व नाच होत असे.

नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळदकुंकू वाहून तांब्यापितळेच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर ऊद घालून उदवायच्या व देवीसमोर फेर धरून फुंकावयाच्या असतात. या घागरी फुंकणार्‍या काही स्त्रियांचे अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो. व त्या भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात. इच्छा असल्यास पूर्ण होण्याचा उपाय सांगतात, असा समज आहे. एकंदर कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा आणि संबंधित उत्सव व पूजाअर्चा महाराष्ट्रीय मंदिर-प्रथांचे उत्तम उदाहरण आहे.

इतिहास व माहिती

महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबद्दल निश्चिती झालेली नाही. देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले.

. ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे माहात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते; कारण राष्ट्रकूट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आला आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्‍तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सीम भक्‍त होते. आपणास देवीचा “वरप्रसाद” मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो.

काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर-चालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणार्‍या काळया दगडात केली आहे. देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्‍वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. या उलट जैन पंथीयांचा असा दावा आहे की, हे देऊळ मूळचे जैन देवता पद्‍मावतीचे आहे आणि त्याचे शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले. मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे इ.स. १७२२ मध्ये दुसर्‍या संभाजीने त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली. ही प्रतिष्ठापना करण्यासाठी संभाजीने सिधोजी हिंदूराव घोरपडेला पन्हाळयाहून कोल्हापूरास रवाना केले होते.

हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्‍विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा करतात.

स्वरूप

प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दॄष्टीस पडतो. या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या मूर्ती बसविलेल्या आहेत. यापैकी प्रमुख मूर्ती म्हणजे तथाकथित भरत आणि शत्रुघ्न यांच्या होय. या मूर्तीबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. या मंडपातून मणि मंडपाकडे जाता येते. या मंडपाच्या पाठीमागील भिंतीच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या दोन सुंदर मूर्ती आहेत. या द्वारपालांना जय आणि विजय अशी नावे असून त्या मूर्ती (३.०५ मी.उंच) लढाऊ पवित्र्यामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मणि मंडपामधून महालक्ष्मीची मूर्ती ज्या आतील गाभार्‍यात आहे त्या ठिकाणी जाता येते. त्या ठिकाणी बंदिस्त केलेला मार्ग असून पूर्वी तेथे काळोख होता. देवीला प्रदक्षिणा घालण्यार्‍या भाविक लोकांना त्रास होऊ नये म्हणून विजेचे दिवे लावलेले आहेत. गाभार्‍याच्या प्रदक्षिणा मार्गातील भिंतींना तसेच गाभार्‍यात व मणि मंडपात संगमरवरी फरशी बसविलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीला बरेच मजले असून त्या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती असलेल्या जागेच्या वरच्या बाजूस एक लिंग आहे. मुख्य देवळाच्या बाहेरील बाजूला अप्रतिम कोरीव काम आहे. थोडया थोडया अंतरावर कोनाडे असून प्रत्येक कोनाडयामध्ये काळया दगडात कोरलेल्या स्वर्गीय वादक आणि अप्सरांच्या मूर्ती आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले त्या बांधकामाला एक लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. ज्याला गरुड मंडप किंवा सभा मंडप म्हणतात. तो इ.स. १८४४ ते इ.स. १८६७ या दरम्यान बांधण्यात आला. महालक्ष्मीच्या मुख्य देवळाभोवती दत्तात्रय, विठोबा, काशीविश्‍वेश्‍वर, राम आणि राधा कॄष्ण अशी इतर लहान मोठी देवळे आहेत. देवळाच्या सभोवारच्या मोकळया जागेत फसरबंदी केलेली आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला पूर्वी एक एक कुंड होते आणि त्यात कारंजे होते. या कुंडामध्ये भाविक लोक धार्मिक विधी करीत.

शिलालेख

देवळाच्या निरनिराळया भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्‍वराच्या देवळाच्या भिंतीवर शके ११४० मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८ चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे, आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो.

व्यवस्था व पालखी

महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दूरदूरच्या अंतराहून शेकडो अनेक भाविक येतात. त्यात पुण्या-मुंबईहून जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी एकंदर २० पुजारी आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. वर्षातून तीन वेळा उत्सव करण्यात येतो. त्यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो.या दिवशी महालक्ष्मीची पितळी प्रतिमा पालखीमध्ये घालून तिची मिरवणूक काढण्यात येते. दुसरा उत्सव म्हणजे आश्विन महिन्यातील पंचमीच्या दिवशी. या दिवशी कोल्हापूरपासून ४.८३ कि. मी. वर असलेल्या टेंबलाईच्या देवळापर्यंत महालक्ष्मीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक नेण्यात येते. त्यावेळी कसबा बावडा गावाचा जो प्रमुख असतो त्याच्या अविवाहित मुलीकडून टेंबलाईला कोहळयाचा नैवेद्य दाखवला जातो. अश्विन पौर्णिमेला दिवे आणि ज्योती लावून देवळाची आरास करण्यात येते आणि देवीला महाप्रसाद अर्पण करण्यात येतो.

अंबाबाई मंदिरातला किरणोत्सव

दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत आणि नोव्हेंबर्मध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. ती अशी :-

१. ३१ जानेवारी (आणि ९ नोव्हेंबर) : सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात.
२. १ फेब्रुवारी (आणि १० नोव्हेंबर : सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोचतात. ३. २ फेब्रुवारी (आणि ११ नोव्हेंबर) : मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात.

या सोहळ्याला महालक्ष्मीचा किरणोत्सव म्हणतात. हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात पार पडला जातो.

परिसर

महालक्ष्मीच्या देवळाच्या परिसरात असलेल्या देवळांपैकी शेषशायी व नवग्रहांचे देऊळ शिल्प आणि प्राचीनत्व या दॄष्टीने महत्त्वाची आहेत. शेषशायीचे देऊळ पूर्व दरवाजाच्या दक्षिणेला आहे. या देवळामध्ये विष्णूची मूर्ती शेषनागाच्या अंगावर पहुडलेली आहे. या देवळामध्ये एक लिंग असून देवळाच्या समोरच सुंदर मंडप आहे. त्याच्या छताच्या आतल्या बाजूला जो घुमट आहे त्याच्यावरील शिल्प आणि कोरीव काम इतके अप्रतिम आहे की, त्याची तुलना अबू येथील विमलसभा या वास्तूच्या छतावरील कोरीव कामाबरोबरच करता येईल. या कोरलेल्या छताच्या खालच्या बाजूला जैन तीर्थकरांच्या दिगंबर मूर्ती कोरलेल्या असून त्यांच्या बाजूला कन्नड भाषेतील शिलालेख आहे. या मंडपाची बांधणी बहुधा एखाद्या भाविक जैन राजाने केली असावी.

नवग्रहांच्या देवळालाही दर्शनी बाजूला एक सुंदर मंडप असून त्या मंडपाच्या छताला आतील बाजूवर असलेल्या नऊ तावदानावरून या मंडपाला नवग्रह मंडप म्हणतात. वास्तविक या उत्तर-चालुक्य अथवा होयसाळ काळातील छताप्रमाणे या मंडपाच्या छतावर मुख्य देवतेभोवती अष्ट दिक्‌पालांचे चित्रण आहे. ही मुख्य देवता जैन असावी अशा अनुमानास बराच आधार आहे. आवरातील दोन देवळे (शेषशायी व नवग्रह) जैन आहेत हे अर्थपूर्ण आहे. हा मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्पाचा एक अतिशय उत्कृष्ट असा नमुना आहे. मंडपाच्या वरच्या बाजूला हंसांच्या प्रतिकृती व टोकाला अप्सरांच्या अतिशय सुंदर मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. उजव्या बाजूच्या एका छोटया देवळात महिषासुराला मारणार्‍या दुर्गेची प्रतिमा आणि सूर्यदेवाला वाहून नेणार्‍या सात घोडयांच्या रथाचे उत्कृष्ट कोरीव काम आहे.डाव्या बाजूला असलेल्या देवळात नवग्रहांच्या मूर्ती असून त्यांची प्रतिष्ठापना अगदी अलीकडे करण्यात आलेली आहे.

वरील दोन देवळांव्यतिरिक्‍त आणखी छोटीछोटी पूजेची ठिकाणे मुख्य मंदिराच्या परिसरात असून त्या मध्ये हरिहरेश्‍वर, मुक्‍तेश्‍वरी आदि देवळांचा उल्लेख करावा लागेल. मंदिराच्या उत्तरेकडे पूर्वी काशी आणि मनकर्णिका या नावांची दोन कुंडे होती. ही कुंडे आता मातीने भरून गेलेली आहेत आणि तेथे असलेल्या मूर्ती आणि इतर प्रतिमा वस्तुसंग्रहालयात वा इतरत्र हलविण्यात आलेल्या आहेत. हल्ली महालक्ष्मीच्या देवस्थानाचा सर्व कारभार जिल्हाधिकारी एका समितीच्या मदतीने पहतात.

About takmukteshwar

Check Also

Ballaleshwar Ganpati,Pali

पालीचा गणपती

Ballaleshwar Ganpati,Pali पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *