यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI – Unified Payment Interface)

यूपीआय ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामुळे अनेक बँकाच्या अनेक खात्यांना एकाच मोबाइल अॅप्लिकेशन द्वारे एकत्र आणून सोयिस्कर पैसे पाठवणे, रक्कम भरणे, खरेदी एकाच ठिकाणी एकाच अॅपमध्ये उपलब्ध होते! सोबतच यामध्ये peer to peer रक्कम जमा करण्याची पद्धत ज्यामध्ये सोयीनुसार नियोजित दिवशी आणि गरजेप्रमाणे रक्कम पाठवली जाते.
यूपीआयमधून पैसे पाठवताना लॉगिनची गरज नाही, खातेक्रमांकांची गरज नाही, IFSC ची गरज नाही.
केवळ एका छोट्या यूजरनेम (वापरकर्त्याच नाव) ज्याला यूपीआयमध्ये VPA किंवा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस म्हटलं जातं या VPA सहाय्याने कोणालाही अवघ्या काही सेकंदात पैसे पाठवता येतात!

यूपीआयची गरज काय ?
नेटबँकिंगसारख्या पद्धती इंटरनेटवर व्यवहार अधिक सुरक्षित बनवण्यासाठी सादर करण्यात आल्या. पण यावरून पैसे पाठवणे बर्‍यापैकी वेळखाऊ आणि सामन्यांच्या दृष्टीने अवघड आहे. त्यासोबतच बर्‍याच पर्यायांच्या गर्दीने नेमकी कोणती सेवा घ्यायची याविषयीसुद्धा गोंधळ उडतो! म्हणूनच एका सरळसोप्या पद्धतीची सुरुवात केली गेली असून याचं नाव यूपीआय असं आहे. ही पद्धत सर्व दिवशी कोणत्याही सुट्टीविना वापरता येते. आणि यासाठी तुमच्याकडे असलेल्या मोबाइलचा वापर केला जातो!

समजा तुम्ही जवळच्या दुकानामध्ये गेलात किंवा कोणाला पैसे खात्यावर पाठवायचे असतील तर त्यावेळी पैसे देताना तुम्हाला त्यांच्या खात्याची माहिती मिळवून बँकमध्ये beneficiary जोडावी लागते. त्याला वेळ लागू शकतो तसेच दरवेळी OTP टाका बसावा लागतो. प्लॅस्टिक मनी जसे की क्रेडिट/डेबिट कार्ड वापरताना तुमचा पिन सुरक्षित राहत नाही. मोबाइल वॉलेटला त्या वॉलेटमध्ये रक्कम भरावी लागते. या सर्वावर उपाय म्हणजे यूपीआय यामध्ये थेट बँकमधून व्यवहार होतो.

मोबाइल वॉलेट आणि यूपीआयमधील फरक : पेटीएमसारख्या मोबाइल वॉलेट आणि यूपीआयमधला फरक म्हणजे वॉलेटमध्ये बँकमधून रक्कम भरावी लागते मगच ते वॉलेट वापरता येते. तसेच वापर झाला नाही तर मोबाइल वॉलेटमध्ये पैसे बिनव्याजी तसेच पडून राहतात. मात्र यूपीआयमध्ये थेट बँकखात्यातून व्यवहार केला जातो. त्यामुळे निम्मा वेळ वाचून सहज पैसे पाठवता येतात! यूपीआय एकच्या बँक खात्यामधून सरळ दुसर्‍याच्या खात्यात जमा होतात.
यूपीआयमुळे मोबाइल वॉलेट लगेच बंद होतील अशी परिस्थिती सध्या नसली तर भविष्यात यूपीआयचा वापर वाढीस लागून मोबाइल वॉलेटमध्येच यूपीआयचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे!

यूपीआयचे उपयोग :
सध्या यूपीआयद्वारे ती सर्व कामे करता येतात जी नेटबँकिंगने करता येतात! (पैसे पाठवणे, पैसे स्वीकारणे, रीचार्ज, बिल भरणा, तिकीट आरक्षण,खरेदी,इ.)
सध्या मोबाइल वॉलेट प्रसिद्ध असले तरी यूपीआयमधील सोपेपणा लक्षात येताच याचा वापर नजीकच्या काळात नक्कीच वाढेल आणि इतर ठिकाणी जसे की टॅक्सी, कॅब, रिक्षा अशा ठिकाणी सुद्धा यूपीआयचा वापर होईल.

यूपीआय कसे वापरायचे ?
I. मोबाइल अॅप (ऑनलाइन – इंटरनेट असताना)
II. USSD (ऑफलाइन-इंटरनेट शिवाय)

I. यूपीआय मोबाइल अॅप : यासाठी तुम्ही अॅप स्टोअरवर जाऊन तुमच्या बँकचं नाव टाकून पुढे UPI लिहा आणि सर्च करा. तुम्हाला बँकचं UPI अॅप दिसेल. उदा SBI UPI, Axis UPI, ICICI UPI, PhonePe, Google Tez इ. जवळपास सर्वच प्रमुख बँकांनी UPI अॅप्स सादर केली आहेत. याऐवजी फ्लिपकार्ट तर्फे सादर केलेलं PhonePe फोनपे हे अॅपसुद्धा वापरू शकता. जवळपास 25 हून अधिक यूपीआय अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. सर्वच अॅप सारखच काम करणार आहेत आणि यातलं कोणताही अॅप घेतलं तरी ते सर्वच बँक खाते धारकांना चालणार आहे!

“फोनपे” वापरण्याची पद्धत खाली दाखवली आहे. इतर अॅप्ससुद्धा थोड्याफार बदलाने असेच काम करतील.

टीप : ह्यास स्टेप्स मोठ्या वाटत असल्या तरी अजिबात अवघड नाहीत. स्पष्टता यावी म्हणून अधिक विश्लेषण केलं आहे. खरेतर या सर्व पायर्‍यांसाठी केवळ पाच मिनिटाहून कमी कालावधी लागतो!

१. सर्वात आधी PhonePe अॅप डाऊनलोड करा.
२. यानंतर तुमचा फोन क्रमांक टाका आणि verify करा. लक्षात ठेवा हा फोन क्रमांक तुमच्या बँकला जोडलेलाच असायला हवा आणि हाच कायम वापरला जाईल! Verify वर टॅप करताच SMS द्वारे OTP मिळेल. तो टाका आणि Verify करा.
३. यानंतर काही प्राथमिक माहिती जसे की तुमचं नाव, ईमेल आयडी विचारल जाईल तो टाका आणि नंतर एक चार अंकी पिन सेट करा. लक्षात ठेवा हाच पिन तुम्हाला दरवेळी वापरावा लागणार आहे. त्यामुळं काळजीपूर्वक पिन निवडा. I Accept वर टिक करा आणि Activate Account वर टॅप करा.
४. यानंतर तुमचा VPA निवडा. तुमचं नावच असलं पाहीजे असं नाही. तुमच्या मनाप्रमाणे लक्षात ठेवता येईल असे नाव निवडा. उदा. myupi@ybl, testupi@sbi नाव टाकल्यानंतर Create New VPA वर टॅप करा.
(लक्षात ठेवा हे नावच पुढे तुमच्या व्यवहारांसाठी वापरले जाणार आहे!)
VPA abc@sbi अशाच स्वरुपात असतील हे case sensitive नाहीत म्हणजे ABC@sbi व abc@sbiएकच!
४. यानंतर तुम्हाला तुमची बँक निवडायला सांगितलं जाईल. आणि तुम्ही योग्य ती बँक निवडताच लगेच तुमचं अकाऊंट तयार होईल. जर तुमच्याकडे MPIN नसेल तर नवा तयार करा व SET PIN वर टॅप करा.
अन्यथा RESET MPIN निवडून जुना MPIN बदलून नवा लावता येईल.
(काही जणांना दरम्यान तुमच्या कार्डवरील शेवटचे सहा अंक विचारले जातील व पिन विचारला जाईल. जर आधी MMID वापरला असेल वगैरे कारणास्तव, जे काही विचारले जाईल ते टाकत जा)
५. यानंतर तुम्हाला फोनपे सुरू झालेल दिसेल. आता तुम्ही कधी केव्हाही व्यवहार करू शकता!

वरील स्टेप्स थोडक्यात सांगायच्या तर अॅप डाऊनलोड करा, फोन क्रमांक टाका, फोनपेसाठी पिन, MPIN सेट करा झाल अकाऊंट तयार.
व्यवहार करताना चार अंकी फोनपे पिन आणि सहा अंकी MPIN यांची गरज पडते

यूपीआयद्वारे पैसे कसे पाठवायचे ?
वरील प्रमाणे यूपीआय अॅप इंस्टॉल करा आणि नंतर पुढे जा
१. आता Transfer Money खालील Send पर्याय निवडा.
२. आता तुम्हाला Contacts, VPAs, Bank Accounts असे तीन पर्याय दिसतील.
३. तुम्ही कसे पैसे पाठवणार आहात त्यानुसार पर्याय निवडा आम्ही उदाहरणार्थ VPA निवडत आहोत.
४. आता Add VPA वर क्लिक करून Beneficiary VPA मध्ये ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचा VPA टाका व नंतर Verify वर क्लिक करा. त्यांचं नाव खाली आपोआप दिसेल! आता Confirm वर टॅप करा
५. आता किती रक्कम पाठवायची आहे ते टाइप करा व Send वर टॅप करा.
६. शेवटी तुम्हाला खात्री करण्यासाठी MPIN विचारला जाईल व लगेच पैसे ट्रान्सफर सुद्धा होतील!

वरील स्टेप्स थोडक्यात सांगायच्या तर पैसे पाठवताना अॅप उघडा > Phone Number & PhonePe पिन टाका > Send > VPA टाका Verify करा > रक्कम टाका > MPIN टाका > झाले पैसे ट्रान्सफर !!!

याचप्रमाणे तुम्ही रीचार्ज, खरेदी, बिल भरणा करू शकता! तुमच्या बँक खात्यामधील शिल्लक सुद्धा तुम्ही लगेच ह्या अॅप मध्येच तपासता येते!
पैसे स्वीकारण्यासाठी Request हा पर्याय निवडा. व ज्यांच्याकडून पैसे हवे आहेत त्याचा VPA निवडा. त्यांना तसा मेसेज जातो व ते लगेच तुम्हाला पैसे पाठवू शकतात!

यूपीआय वापरासाठी काही बँकच्या नियमांनुसार आधी एकदा बँक मध्ये तुमचा मोबाइल क्रमांक नोंदवायला हवा. ज्यानंतर तुम्हाला MMID मिळेल.
रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया केवळ एकदा करावी लागेल जी नवं कार्ड घेण्यासारखी किंवा नेटबँकिंग सुरू करण्यासाखीच आहे. याद्वारे तुम्हाला userid व mpin पुरवला जाईल. याबद्दल तुम्ही तुमच्या बँक शाखेमध्ये चौकशी करा आणि USER ID व MPIN मिळवा!

II. यूपीआय साठी ऑफलाइन पद्धत म्हणजे USSD द्वारे व्यवहार :
यूपीआयद्वारे ऑफलाइन व्यवहार NUUP (National Unified USSD Platform) म्हणता येईल.
USSD म्हणजे आपण बॅलन्स तपासण्यासाठी जसे *121# सारखे क्रमांक डायल करतो तेच.
USSD – Unstructured Supplementary Service Data
आरबीआयने सर्व बँक खातेधारकांसाठी एकच क्रमांक सादर केला असून तो *99# असा आहे.
यामध्ये सुद्धा MMID व MPIN ची गरज पडते.
पैसे पाठवताना तीन पर्याय उपलब्ध
a. MMID द्वारे : ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचा मोबाइल क्रमांक व MMID लागतो.
b. खाते क्रमांकद्वारे : यामध्ये अकाऊंट नंबर, IFSC लागतो.
c. आधार क्रमांकाद्वारे : जर आधार कार्ड बॅंकला जोडले असेल तर हा पर्याय वापरता येतो.

बाकी यामध्ये अॅप इतक्या सोयी नसल्या तरी या पद्धतीच वैशिष्ट्य म्हणजे हे अगदी साध्या फीचर फोन पासून स्मार्टफोन पर्यन्त सर्वच फोनमध्ये चालतं. तेसुद्धा इंटरनेट शिवाय! त्यामुळं याचा उपयोग अनेकांना होऊ शकतो!

भीम अॅप : आता सरकारतर्फे नवं अॅप भीम सादर करण्यात आलं असून यामधून सुद्धा यूपीआय द्वारेच व्यवहार केले जातात. याविषयी मराठीटेकचा व्हिडिओ नक्की पहा.
Bhim – Bharat Interface for Moneyडाऊनलोड लिंक : Bhim App on Google Play

About admin

Check Also

रेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर !

Railway Timetable & Live Status on Whatsapp रेल्वे प्रवासापूर्वी आपल्या ट्रेनचं लाईव्ह स्टेट्स म्हणजे सद्य …