Andhar Far zala

थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला
पणती जपून ठेवा  अंधार फार झाला

आले चहु दिशांनी तुफान विस्मृतीचे
नाती जपून ठेवा अंधार फार झाला

काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून
घरटी जपून ठेवा अंधार फार झाला

हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात
ह्रदये जपून ठेवा अंधार फार झाला

वणव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची
स्वप्ने जपून ठेवा अंधार फार झाला

हे  वाटतील परके आपुलेच श्वास आता
हातात हात ठेवा अंधार फार झाला

शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे
हरणे जपून ठेवा अंधार फार झाला

बाजार हा फुलांचा येथे फुलेच विकती
कलिका जपून ठेवा अंधार फार झाला

ह्रदयात पाळलेल्या जखमातुनीच आता
कंदील एक लावा अंधार फार झाला

~  हिमांशू कुलकर्णी
(संग्रह ” बाभूळवन ” मधून  धारा प्रकाशन -औरंगाबाद )

Check Also

स्वाभिमान विकू नकोस

Swabhiman Viku Nakos फुलासारखे तळवे तुझे फुलावरच पडू दे. तुझ्या हातून जगाची अमाप सेवा घडू …

Leave a Reply