Home / Aarti Sangrah / devi aarti / Ashwinshuddha paksh amba

Ashwinshuddha paksh amba

आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसलि सिंहासनी हो ॥
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो ॥
मूलमंत्रजप करुनी भोंवते रक्षक ठेउनी हो ॥
ब्रह्माविष्णुरुद्र आईचे पूजन करिती हो ॥ १ ॥

उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्ण तिचा हो ॥ ध्रु०॥
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो ॥
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ॥
कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो ॥
उदोकारें गर्जती सकल चामुंडा मिळुनी हो ॥ उदो० ॥ २ ॥

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो ॥
मळवट पातळ चोळी कंठीं हार मुक्ताफळां हो ॥
कंठींचीं पदकें कांसे पीतांबर पिवळा हो ॥
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ उदो० ॥ ३॥

चतुर्थीचे दिवशीं विश्वव्यापक जननी हो ॥
उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणीं हो ॥
पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो ॥
भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणीं हो ॥ उदो० ॥४॥

पंचमीचे दिवशीं व्रत तें उपांगललिता हो ।
अर्थ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो ।
रात्रीचे समयीं करिती जागरण हरिकथा हो ।
आनंदें प्रेम तेंआलें सद्भावें क्रीडतां हो ॥ उदो० ॥ ५ ॥

षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो ॥
घेउनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफळां हो ॥
जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥ उदो० ॥ ६ ॥

सप्तमीचे दिवशीं सप्तश्रृंगगडावरी हो ।
तेथें तूं नांदसी भोंवतीं पुष्पं नानापरी हो ॥
जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो ।
भक्त संकटींपडतां झेलुनि घेसी वरचेवरी हो ॥ उदो० ॥७ ॥

अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायनी हो ॥
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ॥
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो ॥
स्तनपान देउनि सुखी केलें अंतःकरणीं हो ॥ उदो० ॥ ८ ॥

नवमीचे दिवशीं नवदिवसांचे पारणें हो ॥
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो ।
षड्रसअन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो ॥
आचार्यब्राह्मणां तृप्त केलें कृपेंकरुनी हो ॥ उदो० ॥ ९ ॥

दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो ॥
सिंहारूढे दारुण शस्त्रे अंबे त्वां घेउनी हो ॥
शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो ॥
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो । उदो० ॥ १० ॥

Leave a Reply