Global warming Marathi Essay

Global Warming Marathi Essay

ग्लोबल वॉर्मिंग निबंध

जगासमोरील अनेक समस्यांमध्ये आजकाल जास्त चर्चेमध्ये असणारी एक महत्वाची समस्या आहे ग्लोबल वॉर्मिंगची. पण ही ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नक्की आहे तरी काय? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमानात वाढ होणे. वर वर पाहता हि काही फार मोठी समस्या वाटत नसली तरी तिचे दूरगामी परिणाम फार घातक आहेत. हळू हळू तापमानात वाढ होत असल्यामुळे दिवसेंदिवस पृथ्वीवरील तापमानात सुद्धा वाढ होत आहे, ध्रुवांवरील बर्फ जास्त वेगाने वितळू लागला आहे, पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. आणि जागतिक तापमानवाढ हल्लीच्या काही वर्षांमध्ये जास्त वेगाने होऊ लागली आहे.

जागतिक तापमानात वाढ होण्याची अनेक कारणे आहेत, काही नैसर्गिक आहेत तर काही मानवनिर्मित आहेत. हरितगृह वायूंची निर्मिती हे जागतिक तापमानात वाढ होण्याचे प्रमुख कारण आहे. हे वायू काही नैसर्गिक प्रक्रिया तसेच मानवनिर्मित कारखान्यांमुळे तयार होतात. दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे व उद्योग धंदे वाढत असतात. अश्या कारखान्यांमधून पर्यावरणाला हानिकारक असे वायू तयार मोठ्या प्रमाणावर तयार होतात व हवेत मिसळले जातात. कारखान्यांसोबतच वाहंनामधून सोडल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईड व इतर वायूंमुळे गेल्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंग दहा पटींनी वाढले आहे. सेंद्रिय घटकांच्या विघटनातून तयार होणारा मिथेन हा अजून एक हरितगृह वायू आहे जो ग्लोबल वॉर्मिंग वाढण्यास कारणीभूत आहेत. घरातील फ्रीज व एसी मधून बाहेर पडणारा CFC वायू हा सुद्धा ग्लोबल वॉर्मिंग वाढविणारा वायू आहे. हे सर्व वायू वातावरणात मिसळतात, किरणोत्सर्गाचे संतुलन बिघडवतात, सूर्याच्या किरणांमधील गर्मी शोषून घेतात आणि परिणामी पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान वाढवितात.

जागतिक तापमानात वाढ होण्याचे दुसरे प्रमुख कारण ओझोनच्या स्तराचे कमी होणे. पृथ्वीच्या वातावरणाभोवती ओझोनचा स्तर असतो जो सूर्याच्या अतिनील किरणांना पृथ्वीवर येण्यापासून थांबवितो परंतु आता प्रदूषणामुळे हा स्तर हळूहळू कमी होत चालला आहे ज्यामुळे अतिनील किरणे मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर येऊन वातावरणाचे तापमान वाढवीत आहेत. फ्रीज व इतर मानवनिर्मित साधनांमुळे निर्माण होणऱ्या CFC मुळे ओझोनच्या स्तराला हानी पोहचत आहे. त्यामुळे सूर्याची किरणे वातावरणात दाखल होतात, आणि हरितगृह वायू या किरणांना शोषून घेतात. वैद्यानिकांच्या मते प्रदूषणामुळे ओझोनच्या स्तराला खूप मोठी भगदाडे पडत आहेत जी एखाद्या राष्ट्राएवढी मोठी आहेत. हे तथ्य खूप भयानक आहे.

वातावरणात उपस्थित असलेल्या विविध एरोसॉल्समुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते आहे. हे वातावरणीय एरोसॉल्स सौर किरणे आणि रेडिएशनला शोषून घेण्यास आणि त्यांना पसरविण्यात सक्षम आहेत. ते वातावरणाचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म बदलू शकतात. वातावरणात वाढणाऱ्या एरोसॉल्सचे मुख्य कारण मानवी हस्तक्षेप आणि कारखान्या व वाहनांच्या संख्येत वाढ आहे. त्याचप्रमाणे सेंद्रिय घटकांच्या ज्वलनातून सुद्धा एरोसॉल्स तयार होत असतात. वाहतुकीदरम्यान उत्सर्जित होणाऱ्या विविध प्रदूषक घटक अनेक रासायनिक प्रतिक्रियांच्या माध्यमातून एरोसॉल्स्मध्ये रूपांतरित होतात.

गेल्या काही वर्षात ज्या प्रकारे झपाट्याने प्रदूषण वाढत आहे त्याच प्रमाणात जागतिक तापमानात सुद्धा वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणजे गेल्या काही वर्षात तापमानात झपाट्याने वाढ झाल्यामुळे कित्येक हिमदुर्ग व हिमनद्या वितळू लागले आहेत. तसेच वरचेवर होणारी चक्रीवादळे दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागली आहेत हे सुद्धा जागतिक तापमान वाढीचे परिणाम आहेत. पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणांच्या तापमानातील बदलामुळे आणि तफावतीमुळे वारा जोरोजोरात वाहू लागतो व बघता बघता वादळे भयंकर स्वरूप धारण करतात. ह्याचे मूळ कारण जागतिक तापमान वाढ आहे.

जागतिक तापमानात होणाऱ्या वाढीमुळे ऋतू मध्ये सुद्धा बदल होत आहेत. दिवसेंदिवस उन्हाळा लांबत चालला आहे आणि हिवाळा ऋतू छोटा होतो आहे. पूर्वीप्रमाणे कडाक्याची थंडी न पडता थोडीशीच थंडी पडते व ती सुद्धा फार थोड्या कालावधी साठी. पावसाचे प्रमाण सुद्धा गेल्या काही दशकात लक्षणीय प्रमाणात कमी झालेले आहे व त्यात अनियमितता आली आहे. गर्मी वाढणे, अनियमित पाऊस, हिमदुर्गाचे वितळणे, ओझोनच्या स्तराला पडणारी भोके, पूर, वादळ हे सर्व काही ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आहेत.

ह्यावर फक्त एकच उपाय आहे तो म्हणजे लोकांमध्ये या विषयाबाबत जागरूकता निर्माण करणे. सर्व देशांनी मिळून उद्योगधंद्यावर व कारखान्यांवर प्रतिबंध घातले पाहिजेत ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. वैयक्तिक पातळीवर सुद्धा सर्वांनी प्रयत्न सुरु केले पाहिजेत कारण हि एक गंभीर समस्या असून त्यावर उपाययोजना लवकरात लवकर केली गेली पाहिजे. त्यासाठी आपण वैयक्तिक वाहनांचा वापर कमी करून प्रदूषण कमी करू शकता. तसेच सौर उर्जेचा किंवा पवन उर्जेचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे. गावात चुलींचा वापर कमी केला पाहिजे कारण त्यातून होणाऱ्या धुरामुळे फार प्रदूषण होते. आणि सर्वात उत्तम उपाय म्हणजे वृक्ष तोड थांबवून जास्तीत जास्त वृक्षारोपण केले पाहिजे. जंगलांचे संवर्धन केले गेले पाहिजे. प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे उत्तम संगोपन केल्यास ग्लोबल वॉर्मिंग कमी करणे काही अशक्य नाही परंतु गरज आहे ती सर्वांनी आपली जबाबदारी समजून योग्य पाउल उचलण्याची.

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

Leave a Reply