माझी माय

Mazhi Maay Marathi Kavita

किती वर्ष झाली
गेली जरी माय
परी तिची सय
जात नाही ||

घरासाठी तिने
काया झिजवली
तक्रार न केली
कधी काही ||

अवघे सहज
नच ठरवून
प्रेमाने भरून
दिले आम्हां ||

नच घडविले
संस्कार सांगून
अवघे जीवन
हेची गुरु ||

असे वागायचे
हे न करायचे
नव्हते शब्दांचे
काही काम ||

वाट्या आले जैसे
तिने ते जीवन
आनंदे जगून
दाखविले ||

दुःखाचे चटके
सोसले हसत
नच सुस्थितित
गर्व केला ||

आणि मृत्यू रोगी
लढली खंबीर
मानली न हार
कदापीही ||

भोगियले दु:ख
वेदना अनेक
अश्रू परी एक
न दाविला ||

तिची ती दुर्दम्य
जिगीषा पाहून
मृत्यूही लपुनी
हळू आला ||

सोबत अजून
तिच्या आठवणी
जणू ती होवुनी
वावरती ||

मज संभाळती
हळू निजवती
चुकता दावती
मार्ग कधी ||

हवी ती शिक्षा
देवा कुणा देई
कधी पण आई
नेवू नको ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

admin

Leave a Reply

Next Post

तरी भी जय भिम बोलतोस

Thu May 16 , 2019
Tari bhi jay bhim boltos तरी भी जय भिम बोलतोस देवाला मानतोस जातोस पंढरपुरला अंगारा आणतोस दगडांचा बोलबाला रात्रीचा तु टाईट करतोस फाईट शिव्यांचा तु दास म्हणतोस मी खास दादागीरी तुझी संगत जुगारीत झालास अंधत तोंडात घालतोस मावा खिशात तुझ्या तंबाखु चुना झालास तु मोठा आहेस तु खोटा लबाडगिरी करुनी […]
WhatsApp chat
%d bloggers like this: