मी शाळा बोलतेय Marathi Essay

मी शाळा बोलतेय Marathi Essay

mi shala boltey marathi essay
शाळा मुलांना म्हणाली, ‘खरंच मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. इतर शाळांचं पाहिलं तर त्यांच्याकडे उत्तीर्ण होऊन गेलेला कुणी विद्यार्थी परतून पाहतही नाही, मग इथे येणं तर सोडाच. तुमचं तसं नाही. तुम्ही इथे येता. असंही ऐकलंय तुमच्यापैकी काही जण तर सतत संपर्कात असतात कुणा शिक्षकांच्या. मला वाटायचं, उडून गेलेली पाखरं परत येतील का? पण तुम्ही येता.. छान वाटतं.’
एकदा बाहेर पडलेली पावलं परत शाळेकडे कशी वळतील ही चिंता सगळ्याच शाळांना असते. शाळेत येणारे प्रत्येक जण विचारतात, ‘माजी विद्यार्थी येतात का? शाळेच्या संपर्कात राहतात का?’ शाळेतलं वयच मुळी गमतीशीर असतं. जीव गुंतलेलाही असतो आणि जीव बाहेर पडण्यास उतावीळही असतो. वयाचा एक देखणा कप्पा. सुखद आठवणींची शिदोरी म्हणजे शाळेचं वय.
याच वयात मनावर बरंच काही कोरलं जातं. शाळा मनात असते नि मन शाळेत असतं. एकदा शाळेनं माजी विद्यार्थ्यांच्या एका गटाला विचारलं, ‘तुम्हाला शाळा आठवते म्हणजे काय आठवतं?’ मुलं विचारात पडली. असा प्रश्न अनपेक्षित होता. तरी गटातल्या मुलांनी वेगवेगळी मतं नोंदवली, कुणी म्हणालं, आमचे वर्ग आठवतात, आमच्या मित्र-मैत्रिणी आठवतात, काही शिक्षकांचे काही तास आठवतात, शिक्षा केलेली आठवते, कार्यक्रम आठवतात.. असं बरंच काही.
शाळा मुलांना म्हणाली, ‘खरंच मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय.
इतर शाळांचं पाहिलं तर त्यांच्याकडे उत्तीर्ण होऊन गेलेला कुणी विद्यार्थी परतून पाहतही नाही, मग इथे येणं तर सोडाच. तुमचं तसं नाही. तुम्ही इथे येता. रेंगाळता. कुणाकुणाशी गप्पा मारता. असंही ऐकलंय तुमच्यापैकी काही जण तर सतत संपर्कात असतात कुणा शिक्षकांच्या. मला वाटायचं, उडून गेलेली पाखरं परत येतील का? पण तुम्ही येता.. छान वाटतं.’
पण हे असं तेव्हाच घडतं जेव्हा शाळा वेगळं काहीतरी करते. मुलांनी लक्षात ठेवून तिच्याकडे यावं, तिला भेटावं असं घडतं काही तरी तिथे! याही शाळेचं असंच. कित्येक र्वष झाली पण, मुलं येतात इथं. ही शाळा एका खेडय़ातली. शाळेतली फार थोडी मुलं आता गावात राहतात. बाकी नोकरी-धंद्यासाठी बाहेरगावी जातात. सगळ्यांनाच पुढं शिकता येत नाही. पण, आजही या शाळेतली मुलं गावात काही कार्यक्रम असला, सणसमारंभ असला, लग्नकार्य असलं की या शाळेला, इथल्या शिक्षकांना निमंत्रण पाठवतात. मग कसं म्हणता येईल शाळेला मुलं विसरली? उलट मुलांच्या या वागण्याचा शाळेला गर्वच वाटतो.
आज या शाळेत कसली गडबड होती? काय होतं आज सण-समारंभ-जयंती-पुण्यतिथी! काय आहे काय? हॉलमध्ये सगळी तयारी झालेली दिसतेय. फळ्यावर आगत-स्वागताचा बोर्ड लावलाय. काही तरी मोठा कार्यक्रम दिसतोय. कुणालाच अंदाज बांधता येईना. इतक्यात एक गाडी शाळेसमोर थांबली नि शाळेतली मुलं आपणहून सामान उतरवून घ्यायला पुढे आली. बरंच सामान होतं. बांधलेले खोके होते.
घंटा झाली. एका विशिष्ट प्रकारे घंटा झाली की सगळ्यांनी एकत्र जमायचं असा संकेत होता. मुलांना हे ठाऊक होतं. कारण या शाळेत घंटेची रीतही वेगळी होती. आज तशीच घंटा झाली नि सगळी मुलं हॉलमध्ये जमली. खोके उघडून कुणी कुणी टेबलावर लावत होतं. सगळे शिक्षक आणि पाहुणे येऊन व्यासपीठावर स्थानापन्न झाले नि मुलं अवाक्च झाली. कारण ज्याला पाहुणे म्हणून औपचारिकपणे संबोधलं गेलं तो दुसरा तिसरा कुणी नव्हता तर जवळच्याच गावातला एक विद्यार्थी होता. छोटय़ा गावात सगळेच एकमेकांना ओळखतात. त्यातही ही छोटय़ा गावातली छोटीशी शाळा. वाडय़ावस्त्यावरून येणारी मुलं नि जिवाला जीव लावून त्यांच्यावर प्रेम करणारे शिक्षक.
वातावरणातच जिव्हाळा भरून राहिलेला असे. अशा कार्यक्रमात तर वेगळाच नूर असे. पटकन मुलांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘अरे, हा तर सचिनदादा. कधी आला गावाहून.’ कारण एरवी कुणी पाहुणे आले तर मुलं जरा घाबरून जायची, गप्प गप्प व्हायची. कुठल्या तरी दडपणाखाली असायची. आज असं झालं नाही. ‘काय सचिनदादानं केलंन् काय? आणि आपण सगळे का जमलोय?’ मुलांच्या मनात किती प्रश्न? प्रश्नच प्रश्न. नि मग सगळ्या हॉलभर फक्त चिवचिवाट, किलबिलाट. सरही आपापल्या कामात दंग. त्यामुळे मुलांना दंगा करायला मस्त वेळ मिळाला होता.
या शाळेचं नको तिथं ‘गप्प बसण्याचं बंधन’ नव्हतं. त्यामुळे असा दंगा शाळेला मंजूर होता. सगळी औपचारिकता गळून पडली नि मुलांनी सचिनभोवती कोडाळं केलं. सर आले. मुलं जागेवर बसली. कार्यक्रमाला सुरुवात झाली. ‘सचिनला तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल. हा तुमचा, होय तुमचाच सचिनदादा. नवल वाटलं ना! त्यानं काही वेगळं केलंय, तो काय करतो हे आज त्याच्याचकडून समजून घेऊ या मित्रांनो!’
सचिन बोलायला उभा राहिला, ‘मला बोलायची सवय नाही. आज बोलेन. शाळेत आलोय ना! ही शाळा माझी आहे. माझ्या हातात, डोक्यात आणि मनात या शाळेनं बळ दिलंय. शाळा नसती तर मी कुठं असतो? कदाचित मुंबईत गुंडगिरी करत फिरलो असतो. आताही मुंबईलाच असतो, पण चांगले आयुष्य जगतोय. शिकलो नाही. दहावीपर्यंत इथे शिकलो तेवढंच! काम कसं करायचं हे या शाळेनं शिकवलंय. मुंबईत उद्योगपती झालोय. गाडी घेतली आहे.
पण ते दिवस आठवतायत. तेव्हा चालत यायचो शाळेत. काहीच नव्हतं जवळ. भूक लागली तर डबा नाही. सर बोलवायचे जेवायला. जेवलो मी त्यांच्या डब्यातलं अनेकदा. खूप वाईट दिवस होते, पण शाळेमुळे आनंदाचे झाले. किती बरं वाटलंय इथं आल्यावर. तिकडे उंच उंच इमारती असतात, पण जीव सारखा घाबरलेला असायचा. कुणाकुणाची दमदाटी. खरं सांगतो पोरांनो! मुंबईत एकटं वाटलं की गावाकडं येतो. गावाला आलो की आता सगळे दूर जातात, मी ‘शेठ’ झालो म्हणून! मला नाही वाटत तसं, पण लोकांना वाटतं त्याला काय करू.. पोरांनु आज तुम्हाला वह्य़ा, पेन, रंगपेटय़ा, कंपासपेटय़ा, पुस्तकं असं सगळं घेऊन आलोय..’
मुलांचं लक्ष टेबलावरच्या साहित्याकडं गेलं नि मुलांचे चेहरे तर खुललेच, ते सचिनकडे वेगळ्या भावनेनं बघू लागले. साहित्याचं वाटप झालं. प्रत्येक मुलाच्या हातात नवंनवं सगळं साहित्य पाहून शाळेला आनंद झाला होता.
एवढय़ावरच थांबणं नाही झालं. सचिनने शाळेला रोख देणगीही दिली आणि सरांना म्हणाला, ‘यातून गरीब विद्यार्थ्यांचा खर्च मी करणार. तुम्ही नावं कळवा.’ मग नेहमीप्रमाणे या शाळेतला प्रश्नांचा तास सुरू झाला. शिवाय आज प्रश्न विचारणं जड जाणार नव्हतं. कारण सचिन त्यांच्या ओळखीचाच होता. मुलं प्रश्न विचारत होती. सचिन बोलत होता. एका गरीब घरातला मुलगा. गरिबीनं पोळलेला. पण आता श्रीमंतीनं उजळलेला. श्रीमंतीच्या प्रकाशात मूल्यं, जाणिवा मात्र तशाच झळाळत होत्या. म्हणून तर खूप कष्ट करून मुंबईच्या त्या वेगळ्या जगात तो स्थिरावला होता.
नवे व्यवहार करताना ताणतणावानं अस्वस्थ होई तेव्हा त्याला गावाकडच्या या शाळेची आठवण होई. शरीरानं शहरात, मनानं गावात.
गप्पा सुरू झाल्या. वेळ होती सचिनदादाला प्रश्न विचारायची. ‘तू एवढे पैसे खर्च का केलेस?’ ‘मुंबईत झोपडपट्टीत गरीब मुलं राहतात. त्यांना मदत का नाही दिलीस?’ ‘तुला मदत द्यावीशी का वाटली?’ ‘तुला आपल्या या शाळेबद्दल काय वाटतं?’ सगळ्यांचे प्रश्न ऐकून सचिन थोडा गडबडला. त्याला वाटलं नव्हतं की गावाकडच्या शाळेत मुलं एवढे प्रश्न विचारत असतील!
शेजारी बसलेल्या सरांना तो म्हणाला, ‘आमी बोलायचो पण नाही. पोरं आता धीट झालीत.’ सर म्हणाले, ‘इतके दिवस हे व्हायला हवं होतं. कारण या प्रश्नांची उत्तरं मुलांना मिळाली नाही तर मग प्रश्न तसेच राहतात. मनातल्या लपून राहिलेल्या गोष्टींना वाट मिळायला हवी. आता आपण शाळेत हा उपक्रम सुरू केलाय. कोणताही कार्यक्रम झाला की प्रश्नोत्तरांचा तास ठेवतो. मुलांनी प्रश्न विचारायचेच.’
‘खरंय सर. आम्हालापण वाटायचं काय काय विचारावं.. पण.’ सचिन सरांशी एवढं बोलला नि मुलांकडे पाहून म्हणाला, ‘माझ्या गावात गरीब मुलं आहेत. गाव आणि शाळा यांच्याशी माझं नातं आहे. पैसे मिळवतो. या शाळेनं माझ्यासाठी काय काय केलंय, मला काय दिलंय हे कसं सांगू! तुमच्याएवढा असताना एक पाहुणे आले होते. श्रीमंत नव्हते फार! पण ते नेहमी कुणा कुणाला मदत करायचे. तशी मदत फार नव्हती.
भाव महत्त्वाचा होता. मी पण ठरवलं मला पैसा मिळाला तर मीपण अशीच मदत करेन..’ शाळा हे सारं ऐकत होती नि ऐकता ऐकता तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ‘माझी लाडकी पिल्लं नुसती माझ्या कुशीत येत नाहीत तर..’ तिच्या मनात विचार येत होते. वातावरण भारावून गेलं होतं. एक छोटीशी घटना पण मुलांना खूप काही शिकवून गेली.. आणि म्हणत राहिली. ‘मुलांनो, घेत राहावं, घेत राहावं नि घेतलेलं देत राहावं..’

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

Leave a Reply