Pandharpur Wari Marathi Essay

Pandharpur Wari Marathi Essay

पालखी सोहळा, पंढरीची वारी

पालखी म्हटलं कि सगळीकडेच वारकरी, टाळ-मृदूंगाचा नाद आणि भक्तांची गर्दी पाहायला मिळते. या नयनरम्य अशा पालखी सोहळ्यासाठी बऱ्याच गावोगावातून लोक येतात. दरवर्षी प्रमाणे या पालख्या, जसे की संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. या आषाढी वारीसाठी, विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेले हे वारकरी आपली शेतीची कामे आटोपून १५ दिवस न कंटाळता, न थकता या वारीमध्ये सहभागी होतात आणि पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करतात.

पायी वारीची ही परंपरा जवळपास ७०० वर्षे जुनी आहे. दरवर्षीप्रमाणे पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी देवस्थान सज्ज झालेले असते. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालयाची सोय केलेली असते, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवलेली असते, संपर्कासाठी कर्मचाऱ्यांकडे वॉकीटॉकी देण्यात आलेली असते. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी भाविकांची बरीच गर्दी यावेळी आळंदीमध्ये पाहायला मिळते.

पालखी मार्ग, विश्राम स्थळे
दर वर्षी वारीचे नियोजन अगदी अचूक केले जाते. वारी ही २०० होऊन अधिक दिंडीमध्ये विभाजली जाते. प्रत्येक दिंडीमध्ये १०० ते ५०० पर्यंत सदस्य असू शकतात. पालखी मधोमध असते आणि निम्म्या दिंड्या पालखीच्या पुढे आणि निम्म्या मागे असतात. प्रत्येक दिंडीचे एक नियोजित स्थान असते आणि ते काटेकोरपणे पाळले जाते. या व्यतिरिक्त वारीमध्ये सामील होणारे लोक एकतर वारीच्या पुढे जातात, किंवा वारीच्या मागे चालतात.

संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वरांची महाराजांची पालखीचे वेळापत्रक अगोदरच तयार होते. सुरुवातीचे स्थान, जेवण, विश्रांती, रात्री मुक्कामाचे स्थान, वेळ यांचे सुस्पष्ट तपशील त्यामध्ये असतात. वारकऱयांसाठी लागणारे जेवण, रात्रीच्या विश्रामासाठी तंबू आदी सर्वाची तयारी अगोदरच केली जाते.

संत तुकाराम महाराजांची पालखी ही देहूतून आकुर्डी, पुणे, लोणीकाळभोर, यवत, वरवंड, बारामती, इंदापूर, अकलूज, आणि वाखरी यामार्गे पंढरपूरला जाते तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदीतून पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, शेगाव आणि वाखरी यामार्गे पंढरपूरला जाते.

दरवर्षी येणाऱ्या या पालखी सोहळ्याची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे ज्यादिवशी ही पालखी पंढरपूरकडे जाण्यासाठी प्रस्थान करते त्यादिवशी पहाटे मंदिरामध्ये काकड आरती असते. त्यावेळी घंटानाद मंदिरातील वातावरण प्रसन्न करून टाकतो. त्यानंतर अशा या प्रसन्न वातावरणातच माउलींच्या समाधीवर अभिषेक, पंचामृत पूजा केली जाते. यादिवशी लाखो दिंड्यांमधून वारकरी आळंदीमध्ये येतात. या आषाढी वारीसाठी दोन्ही पालख्या वेगवेगळ्या फुलांनी सजवण्यात येतात. अशी ही भव्य दिव्य पालखी पाहताच मन प्रसन्न होते. तो क्षण प्रत्येक माणसासाठी एक अविस्मरणीय क्षण ठरतो.

त्यानंतर काही वेळातच ही पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करते. पालखीचा पुण्यामध्ये एक मुक्काम असतो. संत तुकाराम महाराजांची पालखी ही पासोड्या विठोबा मंदिर येथे तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठ येथे विसाव्यासाठी थांबते. या सर्व वारकऱ्यांची पुण्यातील बऱ्याच गणेशोत्सव मंडळांतर्फे वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाची सोय केलेली असते. तसेच काही लोक आपला खारीचा वाट म्हणून कोणी उपवासाचे लाडू, चिवडा, खिचडी, केळी यांचे वाटप करतात तर कोणी बिसलेरी बॉटल, बिस्कीट यांचे वाटप करतात. प्रत्येकजण या वारीदरम्यान विठ्ठलाची सेवा म्हणून या वारकऱ्यांची सेवा करत असतात. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मदत सुद्धा करतात.

पालखी दरम्यान पुण्यातील बहुतेक रस्ते हे वाहतुकीसाठी बंद केलेले असतात. या दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी पुण्यातील बहुतेक लोक विसाव्याच्या ठिकाणी गर्दी करतात. एक मुक्काम झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसर दिवेघाट मार्गे सासवडला जाते तर तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रोड मार्गे यवतला जाते. संत ज्ञानेश्वरांची पालखी दिवे घाट चढण्याआधी वडकी येथे विसाव्यासाठी थांबते. त्यावेळी दर्शनासाठी लांबच लांब रांग पाहायला मिळते. त्यानंतर ही पालखी बैलांच्या मदतीने संपूर्ण घाट चढते. दिवे घाट चढत असताना हेलिकॉप्टर मधून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीवर फुलांचा वर्षाव केला जातो. त्यानंतर झेंडेवाडी येथे पालखी पुन्हा विसाव्यासाठी आणि दर्शनासाठी ठेवली जाते. त्यानंतर सासवडमध्ये या पालखीचा मुक्काम असतो आणि दुसऱ्या दिवशी या पालखीचा मुक्काम जेजुरीला असतो.

या दोन्ही पालख्यांच्या दरम्यान रिंगणे असतात. या दोन्ही पालख्या एकत्र आल्यानंतर वाखरी येथे मोठे रिंगण असते. त्यावेळी घोडे या पालख्यांना प्रदक्षिणा घालतात. तसेच रिंगणाच्यावेळी रांगोळी काढली जाते. वारकरी विठ्ठलाचे नाव घेत नाचत असतात,तसेच ताल मृदूंगाच्या गजरात भजन-कीर्तन म्हणत असतात. या पालख्यांचे नयनरम्य असे हे रिंगण पाहण्यासाठी बरीच गर्दी तिथे जमलेली असते. खूप आनंदाने आणि उत्साहाने न दमता हे वारकरी रिंगणामध्ये नाचतात. या पालखीची विसाव्याची आणि मुक्कामाची ठिकाणे ठरलेली असतात. त्यानुसार या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. आषाढी एकादशीच्या दिवशी या दोन्ही पालख्या पंढरपूरमध्ये पोहचतात.

पंढरीची वारी आणि आजकालची पिढी
गेले काही दशक पंढरीची वारी किंवा पालखी सोहळा म्हणजे वारकरी मंडळी असेच समीकरण होते. पण आता हे चित्र थोडे थोडे बदलत आहे. आजकाल शहरी लोक सुद्धा वारीमध्ये भाग घेत आहेत, तरुण वर्ग सुद्धा वारीमध्ये आवडीने भाग घेत आहे. मागील काही वर्षी तर काही परदेशी लोक सुद्धा वारीमध्ये सामील झाले होते.

ही युवा आणि शहरी पिढी वारीमध्ये असताना फोटोस, व्हिडिओस काढतात, ते फेसबुक, इंस्टाग्राम वर अपलोड करतात. तसे पाहायला गेले तर हे चुकीचे आहे, पंढरीच्या वारीत किंवा पालखी सोहळयात विठ्ठलाच्या प्रेमासाठी जायचे असते, आपले मी-पण विसरण्यासाठी जायचे असते; फोटो आणि सेल्फी साठी नव्हे. पण यामुळे नवीन पिढी वारीकढे आकर्षित होते आहे, हे पण खर आहे. कदाचित अध्यात्माकडे वळण्याचे हे पहिले पाऊल असावे.

जर तुम्हाला हा निबंध, भाषण आवडले असेल तर कृपया कंमेंट सेकशन मध्ये तुमचं मत कळवा. धन्यवाद…

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

Leave a Reply