फूलराणी

Phulrani Marathi Kavita

हिरवे हिरवेगार गालिचे – हरित तृणाच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती – फुलराणी ही खेळत होती

गोड निळ्या वातावरणात – अव्याज मने होती डोलत
प्रणयचंचला त्या भूलीला – अवगत नव्हत्या कुमारिकेला
आईच्या मांडीवर बसुनी – झोके घ्यावे, गावी गाणी
याहुन ठावे काय तियेला – साध्या भोळ्या फुलराणीला ?

पुरा विनोदी संध्यावात – डोल डोलवी हिरवे शेत
तोच एकदा हासत आला – चुंबून म्हणे फुलराणीला
“छानी माझी सोनुकली ती – कुणाकडे ग पाहत होती ?
तो रविकर का गोजिरवाणा – आवडला अमुच्या राणींना ?”
लाजलाजली या वचनांनी – साधी भोळी ती फुलराणी

आंदोली संध्येच्या बसुनी – झोके झोके घेते रजनी
त्या रजनीचे नेत्र विलोल – नभी चमकती ते ग्रहगोल
जादूटोणा त्यांनी केला – चैन पडेना फुलराणीला
निजली शेते निजले रान – निजले प्राणी थोर लहान
अजून जागी फुलराणि ही – आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा – काय जाहले फुलराणीला

या कुंजातुन त्या कुंजातुन – इवल्याश्या या दिवट्या लावुन
मध्यरात्रिच्या निवांत समयी – खेळ खेळते वनराणी ही
त्या देवीला ओव्या सुंदर – निर्झर गातो; त्या तालावर
झुलुनि राहिले सगळे रान – स्वप्नसंगमी दंग होउन
प्रणयचिंतनी विलीन वृत्ती – कुमारिका ही डोलत होती
डुलता डुलता गुंग होउनी – स्वप्ने पाही मग फुलराणी

कुणी कुणाला आकाशात – प्रणयगायने होते गात
हळुच मागुनी आले कोण – कुणी कुणा दे चुंबनदान
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति – विरहार्ता फुलराणी होती
तो व्योमीच्या प्रेमदेवता – वार्यावरती फिरता फिरता
हळूच आल्या उतरुन खाली – फुलराणीसह करण्या केली
परस्परांना खुणवुनी नयनी – त्या वदल्या ही अमुची राणी

स्वर्गभूमीचा जुळवित हात – नाचनाचतो प्रभात वात
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला – हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शांती – मंद मंद ये अवनी वरती
वीरू लागले संशयजाल – संपत ये विरहाचा काल
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि – हर्षनिर्भरा नटली अवनी
स्वप्नसंगमी रंगत होती – तरीहि अजुनी फुलराणी ती

तेजोमय नव मंडप केला, – लख्ख पांढरा दहा दिशाला
जिकडे तिकडे उधळित मोती – दिव्य वर्हाडी गगनी येती
लाल सुवर्णी झगे घालुनी – हासत हासत आले कोणी
कुणी बांधिला गुलाबि फेटा – झकमणारा सुंदर मोठा
आकाशी चंडोल चालला – हा वाङनिश्चय करावयाला
हे थाटाचे लग्न कुणाचे – साध्या भोळ्या फुलराणीचे

गाउ लागले मंगल पाठ – सृष्टीचे गाणारे भाट
वाजवि सनई मारुत राणा – कोकिळ घे तानावर ताना
नाचु लागले भारद्वाज – वाजविती निर्झर पखवाज
नवरदेव सोनेरी रविकर – नवरी ही फुलराणी सुंदर
लग्न लागते सावध सारे – सावध पक्षी सावध वारे
दवमय हा अंतपट फिटला – भेटे रविकर फुलराणीला
वधूवरांना दिव्य रवांनी – कुणी गाइली मंगल गाणी
त्यात कुणीसे गुंफित होते – परस्परांचे प्रेम अहा ते
आणिक तेथिल वनदेवीही – दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी – फुलराणीची गोड कहाणी
गुंतत गुंतत कवि त्या ठायी – स्फुर्तीसह विहराया जाई
त्याने तर अभिषेकच केला – नवगीतांनी फुलराणीला

कवी: बालकवी

admin

Leave a Reply

Next Post

हे सूर्यभास्करा

Thu May 16 , 2019
He Suryabhaskara हे सूर्यभास्करा करतो नमन तुम्हाला होता समय उदयाचा उधळतो रंग केशरी चहूदिशांना अभ्राअभ्रांत डोकावे, प्रकाश किरणांचा रंगात रंगे सोनेरी, काठ मेघराजाचा लालीत खुले दृश्य, विहंगम देखाव्याचा लागे तीट उदयास, उडता थवा पाखरांचा दृश्यात अदृश्य चमके, चांदण्या आकाशा जसा समर्थ पुरुषाच्या, पाठी उभ्या सुकांता दडतो आदित्य पाठी, फिरणाऱ्या पृथेच्या […]
WhatsApp chat
%d bloggers like this: