गुणधर्मात फरक आढळतो. त्यानुसार पृथ्वीच्या अंतरंगाचे भूकवच,
प्रावरण व गाभा असे तीन भाग मानले जातात. यासाठी आकृती
पहा. यांतील सर्वांत बाहेरचा थर घन खडकांनी तयार झाला
आहे. यांस भूकवच म्हणतात. भूकवचाच्या खालील भागास
प्रावरण म्हणतात. भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग यास
शिलावरण असे म्हणतात. शिलावरणाची जाडी सुमारे १०० किमी
असते. प्रावरणाच्या खालील भागास गाभा म्हणतात. (आकृती पहा.)
 
भूकवच
| भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी आढळत नाही.
भूखंडाखाली ती सुमारे ४० किमी, तर सागरतळाखाली ती सुमारे ८ किमी आढळते. हिमालयासारख्या पर्वतक्षेत्रात ही जाडी सुमारे ७० किमीपर्यंत आढळते. भूकवचाची सरासरी जाडी ३० किमी
आहे. भूकवचाचे पुढील दोन भाग केले जातात.
(अ) सियाल : भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल असे
म्हणतात. या थरातील खडकांमध्ये प्रामुख्याने सिलिका व
अॅल्युमिनिअमचे प्रमाण अधिक आढळते. ही मूलद्रव्ये वजनाने
हलकी असल्याने भूकवचाच्या वरच्या भागात असतात. बहुतेक
खंडांची निर्मिती सियालपासून झाली आहे. या थराची जाडी
भूखंडामध्ये जास्त असून सागरतळाशी कमी असते.
(ब) सायमा : सियालच्या खालील थरास सायमा असे
म्हणतात. बहुतांश सागरतळ या थराने बनलेला आहे. या थरातील
खडक सिलिका व मॅग्नेशिअमच्या संयुगाने बनलेले आहेत. हा थर वजनाने सियालपेक्षा जड असतो.
प्रावरण भूकवचाच्या खालील थरास प्रावरण असे म्हणतात. या थराची जाडी सुमारे २८७० किमी आहे. प्रावरण लोह-मॅग्नेशिअम यांच्या संयुगाने तयार झाले आहे.
प्रावरणामध्ये १०० ते २०० किमीच्या भागात उष्णतेमुळे खडक वितळतात. येथे निर्माण होणा-या शिलारसामुळे या भागात शिलारस कोठी तयार होतात. ज्वालामुखी क्रियेतून भूपृष्ठावर येणारा लाव्हारस येथे निर्माण होतो.
 
गाभा
हा थर प्रावरणाखाली असून याची जाडी ३४७१ किमी
आहे. या थराचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे दोन भाग पडतात.
बाह्य गाभा द्रवरूप तर अंतर्गाभा घनरूप आहे.
या थरात जड व कठीण खनिजे आढळतात. अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने निकेल व लोह खनिजांचे प्रमाण जास्त आढळत असल्यामुळे या भागाचा निफे (NIFE) असाही उल्लेख केला जातो.