Sant Sopandev

Sant Sopandev

Sant SopanDev

संत सोपानदेव

विठ्ठलपंत म्हणजे सोपानदेवांचे वडील. ते पैठणपासून
चार कोसांवर असलेल्या आपेगावचे राहणारे होते. त्यांचे घराणे पिढीजात कुलकर्त्यांचे होते. विठ्ठलपंतांचे वडील गोविंदपंत कुलकर्णीपणाचे काम पाहत असत. विठ्ठलपंतांचे आजोबा त्र्यंबकपंत हे बीड देशाचे देशाधिकारी होते.

गोविंदपंत व त्यांच्या पत्नी नीराबाई यांना बरेच वर्षे
पुत्रप्राप्ती झाली नाही. मग त्यांनी गोरक्षनाथांचे शिष्य
गहिनीनाथ यांच्याकडून गुरूपदेश घेऊन विठ्ठलाची
मनोभावे उपासना केली. गोविंदपंतांना गुरूंच्या व
विठ्ठलाच्या कृपेमुळे पुत्र झाला. त्याचे नाव त्यांनी आपले आराध्य दैवत श्री विठ्ठलावरून ‘विठ्ठल’ असे ठेवले. विठ्ठलपंतांच्या ठायी असलेली विरक्त वृत्ती ही त्यांच्या आजोबांपासून त्यांच्यामध्ये आलेली होती.

विठ्ठलपंत म्हणजे मूर्तिमंत वैराग्यच होते. ते लहान वयातच वेदशास्त्रात निपुण झाले होते. परमेश्वर भक्तीची ओढ असल्यामुळे वेदशास्त्राचे अध्ययन पूर्ण होताच त्यांनी तीर्थयात्रेस जाण्यासाठी आपल्या वडिलांची आज्ञा मागितली.

उतारवयात आधार असलेल्या आपल्या एकुलत्या एक
बुद्धिमान् व विद्यासंपन्न तरुण मुलाला तीर्थयात्रेला
जाण्यासाठी परवानगी देणे गोविंदपंतांच्या अगदी जिवावर आले होते. पण त्यांना विठ्ठलपंतांची परमेश्वर-भक्तीची ओढ माहीत होती; म्हणूनच त्यांनी आपल्या इच्छेविरुद्ध त्यांना जाण्याची अनुज्ञा दिली.

पित्याची आज्ञा होताच विठ्ठलपंतांनी तीर्थयात्रेस
सुरुवात केली. तीर्थयात्रा करीत-करीत ते आळंदीला आले. तिथे सिधोपंत ह्या सद्गृहस्थाच्या दृष्टीस विठ्ठलपंत पडले. त्यांची एकंदर चर्या व धर्मनिष्ठा पाहून आपण याला आपलाजावई करून घ्यावा, असा विचार त्यांच्या मनात आला.

आपला मनोदय त्यांनी विठ्ठलपंतांना सांगितला; पण
विठ्ठलपंतांनी त्यांच्या म्हणण्यास नकार दिला. त्याच रात्री त्यांना स्वप्नात पांडुरंगाने दर्शन देऊन ‘तू सिधोपंतांच्या मुलीचा स्वीकार कर,’ असा दृष्टांत दिला.
आता परमेश्वराच्या आज्ञेपुढे विठ्ठलपंतांचा नाईलाज
झाला व त्यांनी सिधोपंतांची मुलगी मीनाक्षी हिच्याशी
विवाह करण्यास संमती दिली आणि एका शुभ मुहूर्तावर ‘मीनाक्षी’ विठ्ठलपंतांशी विवाहबद्ध होऊन ‘रुक्मिणी’ झाली.

पुढे विठ्ठलपंतांनी आपली उरलेली तीर्थयात्रा पूर्ण केली
व आपल्या पत्नीसह आपल्या माता-पित्याच्या दर्शनासाठी आपेगावला आले. आपला मुलगा इतक्या दिवसांनी तीर्थयात्रा पूर्ण करून परत आला व तोही सत्शील, सदाचारी व संपन्न घरातील, तसेच कुलीन व सुलक्षणी पत्नीसह, हे पाहून विठ्ठलपंतांच्या वृद्ध माता-पित्यांना फार आनंद झाला. आपेगावला जाऊन विठ्ठलपंत संसार करू लागले.

आपल्या मुलाचा संसार फार काळ बघणे
विठ्ठलपंतांच्या माता-पित्याच्या नशिबी नव्हते. काही काळानंतर त्यांचे माता-पिता कालवश झाले. संपूर्ण
प्रपंचाचा भार विठ्ठलपंतांवर येऊन पडला.
ते मुळातच विरक्त वृत्तीचे होते. त्यातच अल्प वयात
माता-पित्याचे छत्र डोक्यावरून गेल्याने त्यांची विरक्ती
आणखीनच वाढली.

त्यांचे प्रपंचातून लक्ष उडाले. त्यांची पत्नी रुक्मिणीबाई ह्यांनी आपल्या वडिलांना सर्व वृत्तांत कळविला. सिधोपंत तातडीने आपेगावला गेले व आपल्याबरोबर विठ्ठलपंत व रुक्मिणीला घेऊन आळंदीला
आले. आळंदीला आल्यावर विठ्ठलपंत आपला वेळ भजन-पूजन, देवदर्शन, आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन ह्यात घालवू लागले. अशातच सात वर्षे निघून गेली.

इतकी वर्षे संसार करूनही अपत्यप्राप्ती न झाल्यामुळे त्यांची उदासीन वृत्ती अधिकाधिकच वाढू लागली.आता आपण संन्यास घेऊन परमार्थमार्गाला लागावे,असे त्यांना वाटू लागले. पण पुढे त्यांचा सन्यास घेणे आणि संसाराचा त्याग करणे त्याच्या गुरुंना अवडले नाही। त्यांनि विठ्ठलपंतांना परत संसार करण्याची आज्ञा केली। नंतर कालांतराने त्यांना ४ अपत्य झाली.

  1. निवृत्ती
  2. ज्ञानदेव
  3. सोपान
  4. मुक्ताबाई

संस्कार

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई ही चारही
भावंडे उपजत ज्ञानी होती. त्यांच्या ज्ञानाचे वर्णन नामदेव महाराज अशा शब्दांत करतात –

‘उपजत ज्ञानी हे वर्म जाणोनी।
आले लोटांगणी चांगदेव॥

त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या वागण्या-
बोलण्यातून त्यांच्या ठायी असलेली वैराग्यवृत्ती दिसत
होती. ही चारही भावंडे आपल्या माता-पित्याशी परमार्थावर चर्चा करीत. त्यांच्या लहानपणीच त्यांच्यावर खऱ्या ज्ञानाचा संस्कार विठ्ठलपंत करीत होते. विठ्ठलपंत स्वत: परमेश्वर भक्त असल्यामुळे घरात सतत नामस्मरण, ईश्वरचिंतन चालत असे. त्यामुळेच ह्या भावंडांच्या मनावर ईश्वरभक्तीचे पूर्ण संस्कार झाले होते.

लहानपणीच त्यांच्या बाललीलांत दिसणाऱ्या
परमार्थाच्या गोष्टी पाहून ही मुले महान ईश्वरभक्त होणार,असे वाटून विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना आनंद होत असे. त्यांच्या सहवासात विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई लोकांकडून मिळणाऱ्या वाईट वागणुकीमुळे होणारे दु:ख विसरून जात.
त्यांना वाटत होते, आपल्या मुलांच्या अंगी असलेल्या दैवी गुणांमुळे आपल्याप्रमाणे आपल्या मुलांचा लोकांकडून छळ होणार नाही. पण तसे झाले नाही.

लोक ही संन्याशांची मुले आहेत, असे म्हणून ह्या
भावंडांची हेटाळणी करीत. त्यांना आपल्या मुलांमध्ये
मिसळू देत नसत. त्यांना त्रास देत. एवढा छळ होत असूनही त्यांनी आपल्या वडिलांना कधीही विचारले नाही की, हे
लोक आम्हाला संन्याशांची मुले का म्हणतात ?

निवृत्तिनाथ व ज्ञानेश्वर मोठे असल्यामुळे त्यांना
लवकर जाण आली होती; पण सोपानदेव व मुक्ताबाई
त्यांच्या मानाने लहान असल्यामुळे त्यांना परिस्थितीची
जाण थोडी उशिरा आली. बाहेरचे लोक ह्या भावंडांना
आपल्यात मिसळू देत नसल्यामुळे ही भावंडे आपल्या
झोपडीतच एकमेकांशी खेळत.

ही मुले उपजत ज्ञानी असल्यामुळे लोकांनी केलेल्या
टीकेचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असे. विठ्ठलपंतांच्या हातांखाली त्यांचे शास्त्राचे अध्ययन चालू होते. बालपणापासूनच त्यांच्या ठायी असलेली संतपणाची लक्षणे पाहून विठ्ठलपंत संतुष्ट झाले होते. ही मुले मुळातच बुद्धिमान असल्यामुळे ती
लहान वयातच वेदांत पारंगत झाली.
सोपानदेवांना वारकरी संप्रदायात सोपानकाका असे संबोधले जाते. सोपानदेवांचे पन्नास एक अभंग उपलब्ध असून सोपानदेवी नावाचा त्यांनी लिहिलेला ग्रंथ सुद्धा आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला समाधी घेतल्यावर एक महिन्याने संत सोपानकाकांनी सासवड येथे समाधी घेतली.

सोपानदेवी या ग्रंथांचे लेखन.

१२९७ साली ‌

सासवड येथे समाधी घेतली.

अभंग

पंढरी महात्म्य

उघडली दृष्टी इंदियासकट । वैकुंठीची वाट पंढरी जाणा ।।
दृष्टीभरी पाहे विठ्ठल दैवत । पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे ।।२।।
हाची मार्ग सोपा जनासी उघड । विषयाचें चाड टाकी परतें ।।३।।
सोपान म्हणे गुंफसी सर्वथा । मग नव्हे उलथा भक्तीपंथे ।।४।।

चला रे वैष्णवहो जाऊ पंढरीयेसी । प्रेमामृत खुण मागों त्या विठ्ठलासी ।।१।।
चालिले गोपाळ दाविताती वाकुंलिया । भरले प्रेमरसे मग ते वाताती टाळीया ।।२।।
दिंड्या गरुडटके मृदुंगाचे नाद । गाताती विठ्ठलनाम करिताती आल्हाद ।।३।।
पावले पंढरी भीमा देखियेली दृष्टी । वैष्णवाचा गजरु आनंदे हेलावली सृष्टी ।।४।।
गजरु गोपाळांचा श्रवणी पडियेला । शंखचक्र करीं विठ्ठल सामोरा आला ।।५।।
कांसवदृष्टी न्याहाळीतु रंगी नाचतु पै उगला । सोपान म्हणे आम्ही केला वाळूवंटी काला ।।६।।

आणीक ऐकेगा दूता । जेथे रामनाम कथा । तेथे करद्वय जोडूनी हनुमंता । सदा सन्मुख असिजे ।।१।।
रामनामी चाले घोषु । तो धन्य देशु धन्य दिवसु । प्रेम कळा महा उल्हासु । जगन्निवासु विनवितुसे ।।२।।
दिंड्या पताका मृदंग । टाळ घोष नामें सुरंग । तेथे आपण पांडुरंग । भक्तसंगे नाचत ।।३।।
तया भक्ता तिष्ठती मुक्ती । पुरुषार्थ तरी नामें कीर्ति । रामनामीं तया तृप्ती । ऐसे त्रिजगती यमु सांगतु ।।४।।
ज्या नामें शंकर निवाला । गणिका अजामेळ पद पावला । अहिल्येचा शाप दग्ध जाला ।तोची पान्हा दिधला पांडुरंगे ।।५।।
चित्रगुप्त म्हणती यमा । काय करावे गा धर्मा । लोक रातले रामनामा । पुरुषोत्तमा विठ्ठल देवा ।।६।।
कळिकाळासी दाटुगें नाम । रुद्रे धरिलें महा प्रेम । त्रिभुवनी विस्तारलें सप्रेम । रामनाम उच्चारी यम । तोही तरला जाणा ।।७।।
ऐसे नाम अगाध बीज । उच्चारी तो होय चतुर्भुज । सोपान म्हणे हे गुज । उमाशंकर देवाचे ।।८।।

अभंग – ४
सर्वकाळ ध्यान हरिरूप ज्याचें । तया सर्व रूप साचे जवळी असे ।।१।।
हरि हरि जाला प्रपंच अबोला । हरिसुख निवाला तोचि धन्य ।।२।।
हरि हेचि मन संपन्न अखंड । नित्यता ब्रह्मांड त्याचे देही ।।३।।
सोपान विदेही सर्वरूपी बिंबतू । हरिरूपी रतु जीव शिव ।।४।।

अभंग ५
मनाचे मवाळ हरिरूप चिंतिती । रामकृष्ण मूर्ति नित्य कथा ।।१।।
रामकृष्ण ध्यान सदा पै सर्वदा । न पवेल आपदा नाना योनी ।।२।।
हरि ध्यान जप मुक्त पै अनंत । जीव शिवी रत सर्वकाळ ।।३।।
सोपान प्रेमा आनंद हरीचा । तुटला मोहाचा मोहपाश ।।४।।

अभंग ६
आवडीचें मागे प्रवृत्तीचे नेघें । नाममार्गे वळगे निघे राया ।।१।।
नाम परब्रह्म नाम परब्रह्म । नित्य रामनाम जपिजेसु ।।२।।
अंतरींचिया सुखे बाहिरिलिया वेखें । परब्रह्म मुखें जपतुसें ।।३।।
सोपान निवांत रामनाम मुखांत । नेणे दुजी मात हरिविण ।।४।।

अभंग ७
सबाह्य कोंदले निवांत उगलें । रामरसें रंगलें अरे जना ।।१।।
हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण । दिननिशी प्रश्न मुखें करा ।।२।।
तरा पै संसार रामनामें निरंतर । अखंड जिव्हार रामरसा ।।३।।
सोपान जपतु रामनामी रतु । नित्यता स्मरतु रामकृष्ण ।।४।।

अभंग ८
अव्यक्ताच्या घरी प्रकृति कामारी । निघे माजि घरी दडोनिया ।।१।।
तैसे नका करू प्रगट सर्वेश्वरू । हरीनाम उच्चारू जपा वाचे ।।२।।
विज्ञानी पै ज्ञान आटलेसे संपूर्ण । उभयता चैतन्य तैसा हरि ।।३।।
सोपान निवांत रामनामी रत । संसार उचित रामनामें ।।४।।

अभंग ९

मोक्षलागी धन वेंचावे नलगे । रामकृष्ण बोलगे जपीजेसु ।।१।।
रामकृष्ण मुखें तया अनंत सुखे । तो जाय विशेषे वैकुंठभुवनी ।।२।।
वेगाचेंनी वेगे जपा लागवेगें । प्रपंच वाऊगे हरिनामे ।।३।।
सोपान संचित रामनामामृत । नित्यता सेवित हरिकथा ।।४।।

अभंग १०
ज्याचे मुखी हरि तोचि धन्य ये जगी । तरला पै वेगी वेदु बोले ।।१।।
हरि हाचि आत्मा तत्व पै हे सोपे । हरितील पापे हरिनामे ।।२।।
वैकुंठीचे सुख नलगे पै चित्ती । हरि हेचि मूर्ति विठ्ठल ध्यावो ।।३।।
याचेनि स्मरणे कैवल्य साचार । सोपान विचार हरि जपे ।।४।।

हे हि वाचा

संत नरहरी सोनार

संत तुकाराम

Check Also

Sant Tukaram

Sant Tukaram

संंत तुकाराम Sant Tukaram  संत तुकाराम( तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध …

Leave a Reply