Tag: marathi essay writing

माझा आवडता प्राणी कुत्रा – मराठी निबंध

माझा आवडता प्राणी कुत्रा

माझा आवडता प्राणी हा तसा नेहमी विचारला जाणारा निबंध चा विषय. यामध्ये तशी मोठी यादी आहे,हत्ती, ससा, गाय, मांजर, वाघ, सिंह, गाय, बैल आदी. आजकाल तुम्हाला इंटरनेट वर माझा आवडता प्राणी या विषयावर खूप सारे निबंध मिळतील,त्यांत काही चांगले सुद्धा आहेत. आम्ही इथे या विषयावर थोडा वेगळा निबंध देण्याचा प्रयत्न केलं आहे.आशा करतो तुम्हाला आवडेल.
इथे आम्ही कुत्रा या प्राण्याबद्दल लिहिले आहे, जर तुमचा आवडता प्राणी कोणी दुसरा असेल तर, या निबंधातून एक अंदाज घ्या आणि तुमच्या आवडत्या प्राण्याबद्दल लिहा.

माझा आवडता प्राणी कुत्रा – मराठी निबंध

तसे मला प्राणी फारसे आवडत नसत, मला प्राण्यांची थोडी भीतीच वाटत असे.
पण आता एका प्राण्याची मला आजिबात भीती वाटत नाही तो म्हणजे, आमचा “ब्रूनो”.ब्रूनो हा आमचा माझा पाळीव कुत्रा आहे. तो जेमतेम
१ वर्षांचा आहे,पण तो वाटतो ३ ते ४ वर्षांचा. मागच्या वर्षी माझ्या घराशेजारच्या परिसरात त्याचा जन्म झाला. दुर्देवाने काही दिवसात त्याच्या
आईला एक गाडीने उडवले. बिचारी दोन पिल्ले आई शोधात होते. मला तसे प्राणी आवडत नसत, पण त्या दोन पिल्लांची अवस्था बघून मला
आणि माझ्या मित्राला दया आली. आम्ही दोघांनी एक एक पिल्लू घरी आणले.

हलका तांबूस रंग, टपोरे डोळे, बघता क्षणीच तो घराच्या सर्वाना आवडला. त्याच्या ब्रूनो नावामागे हि एक गम्मत आहे. घरी आल्यावर त्याचे काय ठेवणार यावर चर्चा सुरु झाली. कोणी म्हणे टॉमी, तर कोणी
म्हणे टायगर, मला काहीतरी वेगळं नाव ठेवायचे होते. एके दिवशी मी माझ्या एका आवडत्या इंग्रजी गायकाचे गाणे ऐकत होतो, त्याचे नाव आहे
“ब्रूनो मार्स”. त्या क्षणी मी ठरवले, त्या चिमुकल्याला मी ब्रूनो म्हणणार. आई, बाबा, आजीला सुरवातीला थोडे अवघड वाटले,पण नंतर सवय झाली.

सुरवातीला त्याची सर्व काळजी मी घेत असे. त्याला अंघोळ घालणे, खायला घालणे, खेळवणे, डॉक्टरकडे घेऊन जाणे आदी.
काही महिन्यांत मात्र सगळ्यांना त्याचा लळा लागला. आता आम्ही सर्व मिळून त्याची काळजी घेतो.

मागच्या सुट्टी मध्ये मी कुत्रा आणि मानव  यांच्यातल्या खास नात्याबद्दल वाचायला लागलो. मला असे कळले की, दुसऱ्या कुठल्याही प्राण्यापेक्षा कुत्राचे आणि माणसाचे दृढ आणि विश्वासाचे असते.
या नात्याचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे. कुत्रे अगोदर जंगलात राहत असत, म्हणूनच त्यांना जंगली कुत्रे म्हणत.
अजूनही काही कुत्रांच्या जाती कोल्हे आणि लांडग्यांसारख्या दिसतात. हळू हळू मानवाने कुत्र्यानं पाळीव बनवण्याच्या पद्धती शोधून काढल्या.

हि पाळीव कुत्री मानवाच्या घराची राखण करत, शिकारी प्राणी आले की ते आपल्या मालकाला सावधान करत. मग ते मानवाला शिकारी मध्ये सुद्धा मदत करू लागले.
कुत्रांची एक खासियत जी मनुष्याला उपयोगी पडते ती म्हणजे त्याची हूंगण्याची क्षमता. कुत्रे वासाचे विश्लेषण मानवापेक्षा ४० पटीने जास्त चांगल्या प्रमाणाने करतात.
म्हणूनच गुन्हेगार किंवा बॉम्ब शोधण्यात त्यांची मदत घेतली जाते. शेकडो वर्षांच्या अश्या प्रवासानंतर कुत्रा हा आता पाळीव प्राणी झाला आहे.
आता जंगली कुत्रे खूप क्वचितच पाहायला मिळतात. आता कुत्रा आणि मानवाचे नाते हे आणखी प्रबळ झाले आहे. आता आपण कुत्रा घर राखण्यासाठी घेत नाही.
आता लोक कुत्र्यांना, मांजरांना अगदी मित्रच नव्हे तर मुलांसारखे मानतात. आजकालच्या स्वतंत्र जीवनशैलीमध्ये लोक एकटे एकटे पडतात,
अश्या कुत्रा, मांजरीसारखे प्राणी त्यांना एक मानसिक आधार देतात, त्यांना एक विरंगुळा देतात.

मला हे सारे विचित्र वाटायचे, पण आता एक वर्षांनंतर कळते की ब्रुनो हा आता माझा फक्त मित्र झाला नाही तर, आमच्या कुटुंबाचा जणू एक सदस्यच झाला आहे.

१० लाईन्स (वाक्य) निबंध – माझा आवडता प्राणी कुत्रा.
माझ्या कुत्र्याचे नाव सिम्बा आहे. त्याचे नाव मी माझ्या आवडत्या कार्टून वरून ठेवले आहे.
त्याचा रंग पांढरा आहे, आणि त्याच्या अंगावर काळे ठिपके आहेत. तो दोन वर्षांचा आहे. मी सिम्बा सोबत खूप खेळतो.
रोज संध्यकाळी मी त्याला बागेत फिरायला घेऊन जातो. रविवारी मी आणि दादा त्याला अंघोळ घालतो. आम्ही त्याला खायला पेडीग्री आणतो.
त्याचे केस खूप मऊ आणि लांब आहेत. सिम्बा आम्हा सगळ्यांना खूप आवडतो.

vachaltrvachal marathi essay

वाचाल तर वाचाल – मराठी निबंध (Essay on Vachal Tar Vachal in Marathi)

 

vachaltrvachal marathi essayवाचाल तर वाचालहा तसा नेहमी विचारला जाणारा मराठी निबंध विषय आहे. खूप साऱ्या निबंध पुस्तकांत या वर निबंध मिळतील, आणि आता तर वाचाल तर वाचाल मराठी निबंध इंटरनेट वरही मिळतील. आम्ही या आर्टिकल मध्ये तुम्हाला थोडा वेगळा निबंध देण्याचा प्रयत्न करत आहोत. आशा करतो तुम्हाला आवडेल. आवडला तर ५-स्टार रेटिंग नक्की द्या.सर्वसाधारण लोकांची धारणा असते कि वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट, पण हे साफ चुकीचे आहे. वाचन खूप महत्वाचे आहे, आणि आत्ताच्या जलद गतीने बदलणाऱ्या जगात, वाचनाला पर्याय राहिलाच नाही. ज्याने आपने ज्ञान वेळेनुसार वाढवले नाही तो मागे राहील यात काही दुमत नाही.

“वाचाल तर वाचाल” याचा खरा अर्थ समजायचा असेल तर आपणास पहिल्यांदा काही गैरसमज दूर करावे लागतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व साधारण लोक समजतात की वाचन हे शाळा, महाविद्यालयापर्यंत मर्यादित आहे. हे समजण्यासाठी आपल्याला दोन इंग्रजी शब्द समजून घ्यावे लागतील, एडुकेशन (Education) आणि लर्निंग (Learning). तसे दोन्ही शब्द आलटून पालटून वापरले जातात, पण यांत खूप मोठा फरक आहे. एडुकेशन म्हणजे शाळेत, महाविद्यालयात जी एक औपचारिक शिक्षण प्रक्रिया असते, जी एका ठराविक वेळे नंतर थांबते ती. एडुकेशन हे दुसऱ्यांकडून मिळते, म्हणजे शिक्षक, गुरु आदी. त्याच्या परे लर्निंग जन्मापासून मृत्यू पर्यंत चालू राहते. ही अनौपचारिक शिक्षण प्रक्रिया आहे, यात परीक्षा नसते, गुण नसतात. मनुष्य आयुष्यभर शिकतच असतो. एडुकेशन महत्वाचे आहेत, पण लर्निंग खूप महत्वाचे आहे. आणि दोन्ही मध्ये प्रगती करण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. एडुकेशन आपणास गणित, विज्ञान, समाजशाश्त्र आदी शिकवते, नोकरी मिळवण्यास मदत करते. पण लर्निंग आयुष्य जगायला शिकवते, आनंदी राहायला शिकवते.

नोकरी आयुष्यात महत्वाचा भाग आहे पण नोकरी पलीकडे पण खूप काही शिकावे लागते. चार लोकांसमोर आत्मविश्वासाने कसे बोलावे, इंटरनेट वापराने, बिल भरणे, जागा, घर नावावर करणे, योगा, डाएट, बँक, कर व्यवहार अश्या हजार गोष्टी शिकाव्या लागतात. आणि या शाळेत शिकवल्या जात नाहीत, त्यासाठी वाचन करावेच लागते. किंवा कोणी तज्ज्ञ व्यक्तीकडून ते अर्जित करावे लागते. पण असे तज्ज्ञ दरवेळी मिळतीलच असे नाही, त्यामुळे वाचन हे करावे लागतेच.

आत्ताच्या तांत्रिक प्रगतीमुळे “वाचाल वर वाचाल” या म्हणीचा अर्थच बदलला आहे. जेव्हा ही म्हण प्रचलित झाली तेव्हा माहिती किंवा ज्ञान वाटपाचे नेमकेच प्रकार होते. मुख्य म्हणजे शाब्दिक प्रकार, पुस्तक, कादंबरी आदी च्या रूपात. आजच्या डिजिटल क्रांतीने ज्ञान वाटपाचे नव-नवीन प्रकार सादर केले आहेत. आज ज्ञान हे इमेजेस, विडिओ, इन्फोग्राफिक्स, चार्ट्स, ऍनिमेशन, सिम्युलेशन, वर्चुअल रिऍलिटी च्या माध्यमात प्रसारित केले जाते. त्यामुळे वाचन म्हणजेच ज्ञानार्जन खूप सोपे झाले आहे, आता वाचनालयात जावे लागत नाही; सर्व काही मोबाईल फोन वर मिळते.

आताच्या जगात फक्त वाचनापर्यंत मर्यादित राहून जमणार नाही, मिळालेल्या ज्ञानावर विचार, मनन केले पाहिजे आणि त्याच्यावर अमल सुद्धा केले पाहिजे. मिळालेले ज्ञान वाटले पाहिजे,त्याने ते वाढते; त्यावरती कृतीही केली पाहिजे.

वाचनासाठी नवीनतम सोयी आता उपलब्ध आहेत, आणि आजच्या बदलत्या आणि माहिती प्रधान जगात यशस्वी व्हायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाहीच. वाचाल तर वाचाल या पेक्षा मी तर म्हणेन वाचाल तरच वाचाल”.

मराठी भाषा

Marathi Language Essay Writing.

मराठी हि एक खूप सुंदर भाषा आहे जी मुख्यता महाराष्ट्रात आणि थोड्या प्रमाणात गोवा इथे बोलली जाते. मराठी हि भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी भाषा हि भारतात सगळ्यात जास्त बोलली जाणारी चौथी भाषा आहे. मराठीच्या तश्या ४ मुख्य पोटभाषा आहेत,त्या म्हणजे वऱ्हाडी, कोळी, मालवणी आणि कोंकणी. मराठी भाषा २००० वर्षांपासून अस्तित्वात आहे, म्हणूनच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न चालू आहे.

मराठी भाषेचा इतिहास (History of the Marathi Language)

मराठी भाषा हि इंडो-आर्यन कुटुंबातील मानली जाते. साताऱ्यामध्ये सापडलेले तांब्याचे शिलालेख ७९५ सी.ई. चे मानले जातात. असेच काही शिलालेख रायगड जिल्ह्यातील अक्षी तालुक्यात सापडले जे १०१२ सी.ई. चे मानले जातात. दिवे इथे सापडलेले जमीन व्यवहाराचे तांब्याचे शिलालेख हे १०६० किंवा १०८६ सी.ई. चे आहेत. याचा अर्थ असा कि मराठी हि १२व्या शतकापर्यंत एक अधिकृत लिखित भाषा झाली होती.

यादव काळ

११८७ सी.ई. नंतर यादव काळात मराठीचा वापर वाढला. यादव राजे अगोदर कन्नड आणि संस्कृत भाषा वापरत असत. १४ व्य शतकाच्या शेवटी पर्यंत मराठी वर्णलेखनाची प्रमुख भाषा झाली होती. असे मानले जाते कि यादवांनी मराठीला प्राधान्य दिले कारण ते मराठी बोलणाऱ्या प्रजेशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करत होते.

पुढे मराठी भाषेचा प्रसार महानुभाव आणि वारकरी पंथांमुळे झाला. यांनी आपल्या धर्माचा आणि शिकवणीचा प्रसार करण्यासाठी मराठीचा उपयोग केला. सेउण राज्याच्या काळात मराठी भाषा न्यायालयात सुद्धा वापरली जाऊ लागली. यादव राजवटीतील शेवटच्या तीन राज्यांच्या काळात ज्योतिष, आयुर्वेद, पुराण, वेदांत वर मराठी साहित्य गद्य आणि काव्य रूपात तयार करण्यात आले.

मराठीतील सर्वात जुने गद्य पुस्तक हे “विवेकसिंधु” मानले जाते, जे मुकुंदराज यांनी लिहिले. मुकुंदराज हे एक नाथ योगी होते, ते त्या काळातील अग्रगण्य कवी होते. मुकुंदराजांनी शंकराचार्यांच्या कथन आणि शिकवणींवरून हिंदू तत्वज्ञान आणि योग मार्ग यांच्या मूलभूत सिद्धान्तांचे वर्णन केले. मुकुंदराजांचा “परमात्म” ग्रंथ मराठी भाषेत वेदांत स्पष्ट करण्याचा पहिला पद्धतशीर प्रयत्न समजला जातो.

पुढे १२३८ मध्ये माहीमभट्ट यांनी “लीळाचरित्र” लिहिले, हे महानुभाव पंथातील चक्रधर स्वामी यांचे आत्मवृत्त होते. पुढे माहीमभट्ट यांनी चक्रधर स्वामी यांचे गुरु गोविंदप्रभू यांचे आत्मवृत्त “गोविंदप्रभूचरित्र” लिहिले. महानुभाव संप्रदायाने धर्म आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी मराठीला वाहन बनवले. महानुभाव साहित्यात साधारणपणे देवतांच्या अवतारांचे वर्णन, संप्रदायाचा इतिहास, भगवद्गीतावरील टीका, श्रीकृष्ण भगवानांच्या कथा आणि व्याकरणाचे वर्णन करण्यात आले.

मध्ययुगीन आणि डेक्कन सल्तनत कालावधी

१३ व्या शतकातील महान वारकरी संत ज्ञानेश्वर यांनी भगवद्गीतेवर मराठीत “ज्ञानेश्वरी” ग्रंथ लिहिला. त्यांचे समकालीन, संत नामदेव यांनी मराठीत तसेच हिंदी भाषेत श्लोक, अभंग लिहिले. मुकुंदराज हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध कवी होते,त्यांनी “विवेक-सिद्धी” आणि “परममित्र ” ग्रंथ लिहिले जे पौराणिक वेदांताशी संबंधित आहेत. १६ व्या शतकात संतकवी एकनाथ यांनी “एकनाथी भागवत” लिहिले जे भागवत पुराणावरील भाष्य आहे. तसेच संत एकनाथांनी भारुडे सुद्धा लिहिले जी आजच्या काळातही प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम महाराज यांनी मराठी एक समृद्ध साहित्यिक भाषा बनविली. संत तुकाराम यांनी सुमारे ३००० अभंग लिहिले.

सल्तनत काळातही मराठीचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. या काळात जरी शासक मुस्लिम होते, तरी स्थानिक जमीनदार, महसूल अधिकारी आणि बहुसंख्य लोकसंख्या हिंदूच होती. यामुळे मराठीचा वापर व्यवहारात करण्यात आला. या काळात खूप सारे पर्शिअन शब्द मराठीमध्ये प्रचलित झाले, जसे बाग, शहर, कारखाना, बाजार, कागद, हुशार, जमीन, खुर्ची, हजार, जाहिरात आदी. हे शब्द आजही मराठीमध्ये वापरले जातात.

मराठा साम्राज्य

आज मराठी ज्या रूपात जिवंत आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या काळात मराठीला खरे महत्व प्राप्त झाले. शासकीय कामकाज आणि बोली भाषा म्हणून मराठीचा विस्तार झाला. मराठी भाषेवरील पर्शिअन भाषेचा प्रभाव या काळातच कमी झाला. जसा जसा मराठी साम्राज्याचा विस्तार झाला तसा मराठीचा ही विस्तार झाला. या काळात मराठी ही मोडी लिपीत लिहली जात असे.

१८ व्या शतकात, पेशवा काळात खूप मराठी साहित्य लिहिले गेले. यातील काळातील प्रसिद्ध काम म्हणजे वामन पंडित यांचे “यथार्थदीपिका”,रघुनाथ पंडित यांचे “नळदमयंती स्वयंवर”. या काळात नवीन साहित्यिक प्रकारचा प्रयोग करण्यात आला. संत एकनाथांचे नातू मुक्तेश्वर यांनी “ओवी” प्रकार निर्माण केला. त्यांनी महाभारत आणि रामायणाचे मराठी भाषांतर ही केले. याच काळात “पोवाडा” आणि “लावणी” प्रकारचा उगम झाला. अनंत फंदी, राम जोशी आणि होनाजी बाळा यांनी पोवाडा आणि लावणी प्रसिद्ध केले.

ब्रिटिश राज कालावधी

१९व्या शतकाच्या सुरुवातीला ख्रिश्चन धर्मप्रचारक विल्यम केरी यांनी मराठी व्याकरणाचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बायबल चे मराठी भाषांतरही केले. साल १८३१ मध्ये कॅप्टन जेम्स थॉमस मॉलवर्थ आणि मेजर थॉमस कँडी यांनी पहिला मराठी-इंग्रजी शब्दकोश (डिक्शनरी) संकलित केला. १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी वर्तमानपत्र “दर्पण”सुरु केले. याच काळात संगीत नाटक ही विकसित झाले. मराठी नाटकाच्या प्रसिद्धीमुळे मराठीचा विस्तार झाला. आधुनिक मराठी काव्याचे पिता केशवसुत यांनी आपली पहिली कविता १८८५ मध्ये प्रकाशित केली.

१९व्या शतकाच्या उत्तरार्धात निबंधकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपले नियतकालिक सुरु केले. ज्योतिबा फुले आणि गोपाळ हरी देशमुख यांनी “दिनबंधू” आणि “प्रभाकर” नियतकालिकांची सुरुवात केली. २०व्या शतकात मराठी भाषेने पुढचा टप्पा गाठला. मराठी साहित्य,नाटक, चित्रपट यांनी मराठी भाषा आणखी विस्तारली. एन.के. केळकर यांचे जीवनचरित्र लेखन, हरि नारायण आपटे, नारायण सीताराम फडके आणि व्ही. एस. खांडेकर यांचे कादंबरी, विनायक दामोदर सावरकर यांचे राष्ट्रवादी साहित्य आणि मामा वरेरकर आणि किर्लोस्कर यांची नाटके यांनी मराठी भाषा समृद्ध केली.

भारतीय स्वातंत्र्यानंतर

भारताच्या स्वातंत्र्यानंतर मराठीला घटना दुरुस्ती (आर्टिकल) ३४४(१) आणि ३५१ नुसार शासकीय राजभाषेचा दर्जा मिळाला. १९६७ मध्ये झालेल्या २१ व्या घटना दुरुस्तीपर्यंत १४ भाषांना अधिकृत दर्जा होता. आताच्या सुधारणेनुसार कोंकणी, मणीपुरी, सिंधी, आणि नेपाळी वगैरेंचा अधिकृत भाषांमध्ये समावेश करण्यात आला. त्यानुसार अधिकृत भाषांची संख्या ही २२ झाली. मराठीला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. यासाठी मागील दोन दशक प्रयत्न केले जाते आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य मंत्र्यानी भारतीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे तसा अर्ज भरला आहे. एखाद्या भाषेला अभिजात भाषा ठरवण्यासाठी काही अटी असतात. त्या म्हणजे ती भाषा प्राचीन असावी (१५०० ते २००० वर्ष जुनी), प्राचीन आणि मूळ साहित्य हवे इत्यादी. संस्कृत, तेलुगू, तमिळ,कन्‍नड,ओडिया, मल्याळम या भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता आहे. लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा अंदाज आहे.

१ मे १९६० मध्ये विदर्भ आणि मराठवाडा प्रदेश महाराष्ट्रात जोडण्यात आले. हे एकत्रीकरण भाषेच्या आधारावर झाले होते. राज्य आणि सांस्कृतिक संरक्षणामुळे ९० च्या दशकात मराठीभाषेची खूप प्रगती झाली. दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाटक संमेलन आयोजित केले जाते. तसेच दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात जसे “सवाई गंधर्व” इत्यादी जे मराठी कला, संगीत, संस्कृती आणि भाषेचा गौरव करतात. २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठीत उल्लेखनीय कार्ये झाली, यात प्रमुख वाटा होता तो म्हणजे खांडेकर, विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, विष्णू वामन शिरवाडकर, पी.के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आणि आणखी खूप साहित्यिक, कलाकारांचा.

२१ वे शतक

२१ व्या शतकात व्यावहारिक फायद्यांमुळे इंग्रजीला खूप महत्व प्राप्त झाले. इंग्रजी भाषा सरकार सुद्धा व्यवहारासाठी वापरते. जागतिकारणामुळे इंग्रजीची मागणी वाढली. आता अशे दिसून येते कि शहरी भागातील पालक मुलांना इंग्रजी शाळेंत भरती करतात त्यामुळे हळू हळू मराठीचा ऱ्हास होऊ शकतो असे मानले जाते. मराठी चित्रपट, नाटक, संगीत, वर्तमानपत्रे हे आजच्या पिढीला मराठीशी जोडून ठेवण्यात आपली जबाबदारी बजावत आहे.

निष्कर्ष

मराठी हि एक प्राचीन आणि सुंदर भाषा आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे. बदलत्या काळात इंग्रजी सुद्धा शिकली पाहिजे, हिंदी सुद्धा बोलावी लागते पण जो गोडवा मराठीत आहे तो कशातच नाही. आपण वेळेनुसार बदलले पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की आपण आपले मूळ, आपली भाषा, मराठी संस्कृती विसरली पाहिजे. यासोबत आपण हे पण लक्षात ठेवले पाहिजे कि आदर, प्रेम हे परस्पर असते, म्हणजे दोन्ही बाजूंनी ते असावे लागते. जर आपल्याला भारतात, जगात मराठीला आदर आणि प्रेम मिळवून द्यायचे असेल तर आपल्याला दुसऱ्या भाषेंचा सुद्धा आदर केला पाहिजे.

Reference: Wikipedia

Marathi Essay

Marathi Essay-Letter-Application

मराठी निबंध/पत्र/अर्ज


 

  • Marathi Essay

[table id=4 /]
  • Marathi Letters

[table id=5 /]
 
 

%d bloggers like this: