त्र्यंबकेश्वर नाशिक

त्र्यंबकेश्वर नाशिक

त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे.

भौगोलिक स्थान

त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी – मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नांवाने प्रसिद्ध आहे.

श्री त्र्यंबकेश्वर मंदिर (इतिहास)

त्र्यंबकेश्वर तीर्थस्थान

दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे..

ती शिवालये अशी : गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे – बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे – टाकेदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी – रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळाउगमस्थानी असलेल्या – हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ – खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ्च्या – पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या – पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी – वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यातच त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे.

नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.

ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे.

येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ(?) आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते.

भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात .

गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.

या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्यतः तांदूळ व नाचणी ही पिके घेतली जातात. ग्रामीण आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कांसाठी काम करीत असतात. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात.

नाशिक किंवा नासिक (प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप नाशक) हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या थहरात उत्तर महाराष्ट्राचे, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी लेणी ही बौध्द लेणी आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे ‘भारताची नापा व्हॅली’ म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशकात गंगापूर येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी ॲन्ड इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे.

पंचवटी हाही नाशिकचा एक भाग आहे.

==भूगोल== नासिक जिल्हा दख्खन पठारावरील, सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील जिल्हा . या जिल्ह्यात पश्चिमवाहिनी तापी व पूर्ववाहिनी गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यांचा भाग येत असल्याने या जिल्ह्याच्या उत्तरेस दख्खन पठाराच्या भूस्तररचनेत महत्त्वपूर्ण बदल होतात. सह्याद्रीची प्रमुख रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागातून दक्षिणोत्तर दिशेने जाते व या रांगेच्या तीन शाखा या जिल्ह्यात पश्चिम–पूर्व दिशेने जातात. अगदी उत्तर भागात पश्चिमेस १,३०० मी. पासून पूर्वेस ६५० मी. पर्यंत उंचीची सेलबारी डोंगररांग असून, तिच्यातील मंगीतुंगी डोंगराची उंची १,३३१ मी. पर्यंत आहे. त्यांच्या पूर्वेस सेलबारी व हिंदबारी खिंडी व थेरमाळ आणि गाळणा किल्ले आहेत. गाळण्याच्या टापूत दक्षिणोत्तर रस्त्यावर खिंड आहे. याच्या दक्षिणेस १,६१३ मी. पर्यंत उंचीची घोलबारी डोंगररांग आहे. या रांगेतच घोलबारी खिंड व साल्हेर किल्ला आहे. या रांगेच्या दक्षिणेस जिल्ह्याच्या मध्यातून जाऊन तापी व गोदावरी यांची खोरी अलग करणारी सातमाळा किंवा चांदवड वा अजिंठा डोंगररांग आहे. ही रांग प्रथम पूर्वेस, त्यानंतर आग्नेयीस व शेवटी ईशान्येस पसरते. तिची सरासरी उंची १,१०० ते १,३५० मी. असून धोडप, सप्तशृंरगीसारखी काही शिखरे १,४०० मी. पेक्षा उंच आहेत. अचल व जावाता हे किल्ले या रांगेमध्ये असून डोंगरमाथे अरुंद व सपाट आहेत. या रांगेच्या दक्षिणेकडील छोट्या रांगेत, आलंदी व बाणगंगा नद्यांदरम्यान रामशेज डोंगर आहे. त्याच्या पूर्वेस एका शंकु–टेकडीत चांभार लेणी नावाची जैन लेणी आहेत. सातमाळेच्या दक्षिणेस त्रिंबक–अंजनेरी डोंगररांग असून, भास्करगडाच्या पूर्वेस हरीश किल्ला आहे. आणखी पूर्वेस तीन अलग टेकड्या आहेत, त्यांस त्रिरश्मी म्हणतात.

त्यांतील अगदी पूर्वेची टेकडी त्रिशीर्ष नावाची असून तेथे पांडव लेणी आहेत. त्रिंबक डोंगररांगेतच गंगाद्वार येथे गोदावरीचा उगम आहे. डोंगरपायथ्याशी त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे. अंजनेरी डोंगररांग बरीच उंच व खडकाळ आहे. त्रिशूळ ही त्या रांगेची शाखा विशेष प्रसिद्ध आहे. तिच्या पूर्व भागातच घारगड व शिव डोंगर आणि बहुला किल्ला आहेत. या डोंगरांतील एका खिंडीतून मुंबई–आग्रा महामार्ग जातो. जिल्ह्याच्या आणि इगतपुरी तालुक्याच्या अगदी दक्षिण टोकाशी पश्चिम–पूर्व पसरणाऱ्या उपशाखेमध्येच कळसूबाई (१,६४६ मी.) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. या रांगेत १,५०० मी. पेक्षा उंच अशी अनेक शिखरे आहेत. कळसूबाईच्या उत्तरेस इगतपुरीजवळच्या खिंडीवर झुकलेला एक प्रचंड कडा आहे. या डोंगराळ प्रदेशात मदनगड–बितनगड, अलंग–कुलंग, रौलिया–जौलिया, अंकाई–टंकाई, औंढा–पट्टा, साल्हेर–मुल्हेर, मंगिया–तुंगिया, इ. अनेक जोडकिल्ले मोक्याच्या जागी बांधलेले आढळतात. जिल्ह्यात सु. ३८ डोंगरी किल्ले असून त्यांपैकी २३ सह्याद्रीत आणि १५ सातमाळा रांगेत आहेत.सह्याद्रीच्या पश्चिमेस वाहणाऱ्या, तापीच्या खोऱ्यातील व गोदावरी खोऱ्यातील नद्या असे नद्यांचे तीन प्रमुख भाग आहेत. कोकणात किंवा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून वाहणाऱ्या नद्यांत चोंदी, कावेरी, सासू किंवा तान, मान किंवा बामती, नार, पार, बारीक, दमणगंगा, वाल, वैतरणा व भीमा या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी काही नद्या जिल्ह्यांच्या किंवा राज्याच्या सीमेवरून काही अंतर वाहतात. त्या तीव्र उताराच्या आणि बऱ्याच लहान आहेत. वैतरणा नदीने दारणेच्या खोऱ्यात नदी अपहरण केले असल्याची शक्यता आहे.तापीच्या खोऱ्यातून ईशान्य दिशेस वाहणाऱ्या नद्यांत गिरणा व बोरी या नद्या प्रमुख आहेत व त्या स्वतंत्रपणे तापीस मिळतात. गिरणा नदी सह्याद्रीमध्ये हातगडपासून ८ किमी. नैऋत्येस, चेराई गावाच्या दक्षिणेस उगम पावते व कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यांतून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात शिरते.नासिकजिल्ह्यात गिरणेस तांबडी, पुनंद, आराम, मोसम वपांझण या प्रमुख उपनद्या मिळतात.

मन्याड ही गिरणेची उपनदी या जिल्ह्यात उगम पावते आणि गिरणेस जळगाव जिल्ह्यात मिळते. पांझण आणि मन्याड या खोल, अरुंद दऱ्यांतून व उंच दरडींमधून वाहत असल्यामुळे जलसिंचनास फारशा उपयुक्त नाहीत; परंतु गिरणा व तिच्या बाकीच्या उपनद्या मात्र त्या दृष्टीने चांगल्या उपयोगी पडतात.या जिल्ह्यात गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वांत मोठी नदी, नासिकपासून जवळच गंगाद्वार (त्र्यंबकेश्वर) येथे उगम पावते. तिला १४ किमी. वर किकवी मिळते. काश्यपी (कास)–गोदावरी संगमापासून जवळच गंगापूर धरण बांधले आहे व तेथून दहा किमी. अंतरावर नासिक शहर आहे. जलालपूरजवळ आलंदी नदी गोदावरीस मिळाल्यानंतर काही अंतरावर गोदावरी अरुंद, खडकाळ पात्रातून जाऊन सु. १० मी. खोल उडी घेते व तोच दूधस्थळी धबधबा होय. नासिक शहरात प्रवेश करण्यापूर्वी ती सु. दोन मी. ची छोटीशी उडी घेते. तिच्या काठी अनेक देवळे असून पात्रात अनेक कुंडले बांधलेली आहेत. नासिक व निफाड या दोन तालुक्यांतील गोदावरीचा ९६ किमी. प्रवाह या जिल्ह्यातून वाहतो. दारणा ही गोदावरीची या जिल्ह्यातील प्रमुख उपनदी होय. ती इगतपुरीच्या आग्नेयीस १३ किमी. वर सह्याद्रीमध्ये उगम पावते. दारणेवर नांदगावजवळ धरण बांधण्यात आले आहे व त्यामुळे लेक बीले हा जलाशय निर्माण झाला आहे. दारणेस वाकी, उंदुलोह व वालदेवी या प्रमुख उपनद्या मिळतात व त्यांसह दारणा निफाड तालुक्यात गोदावरीस मिळते. या पूर्ववाहिनी नद्या बऱ्याच उथळ असून वर्षातून सहा ते आठ महिने कोरड्या असतात. दारणेशिवाय गोदावरीस या जिल्ह्यात देव, झाम, बाणगंगा, काडवा व गुई या प्रमुख नद्या मिळतात. गोदावरी व तिच्या उपनद्या यांचा जिल्ह्याला सिंचनाच्या दृष्टीने बराच उपयोग होतो. नाशिक समुद्र सपाटीपासून ६०० मीटर (२,००० फूट) उंचीवर आहे.

गोदावरी नदीचा उगम नाशिकपासून 24 किमी (15 मैल) त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर झाला असून ती जुन्या निवासी भागातून शहराच्या उत्तर सीमेलगत वाहते. कारखान्यातील निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे नदी खूप प्रमाणात दुषित झाली आहे. गोदावरी व्यतिरिक्त वैतरणा, भीमा, गिरणा, कश्यपी, दारणा इत्यादी महत्वाच्या नद्या नासिक मधून वाहतात. ज्वालामुखीच्या उद्रेकापासून निर्माण झालेल्या दख्खन पठाराच्या पश्चिम काठावर नासिक वसलेले आहे. संपूर्ण जिल्ह्यात, चुनखडी व कंकर प्रत्यक्षपणे आढळतात. जळगाव आणि औरंगाबाद नाशिकच्या पूर्वेला आहेत. ठाणे व गुजरात भाग नाशिकच्या पश्चिमेस आहेत, तर अहमदनगर दक्षिणेला आहे. येथील काळी माती शेतीसाठी अनुकूल आहे. त्र्यंबकेश्वर जेथे गोदावरी नदी उगम पावते, नासिक शहरापासून ३०किमी (१९ मैल) अंतरावर आहे. शहराचे एकूण जमीन क्षेत्र २५९,१३ चौ..कि.मी.(१००.०५ चौरस मैल) असून महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश व पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रदेशांनंतर तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे.

नाशिकमधील मंदिरे

काळाराम मंदिर – पंचवटीमधील हे प्रमुख मंदिर असून रंगराव ओढेकर यांनी इ.स .१७८० साली त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा दगड हा रामशेज डोंगरातून आणला गेला. प्रत्येक दगड उकळत्या दुधात टाकून बराच वेळ तो तसाचा ठेवला जाई. जो दगड तडकला नाही तोच दगड मंदिरासाठी वापरला गेला असे सांगतात. या मंदिरावर कलाकुसर फारशी नाही. आहे तो भव्यपणा आणि डोळ्यात भरण्यासारखा नितळपणा. मंदिराभोवती चिरेबंदी कोट असून त्याच्या आत चारही दिशांना यात्रेकरूंसाठी अग्रशाला बांधलेल्या आहेत. अगस्ती मुनींनी दाखविलेल्या वाटेवरून प्रभू रामचंद्र हे पंचवटी क्षेत्री आले. येथील निसर्गसौंदर्य त्यांना आवडल्याने त्यांनी जवळच लक्ष्मणाकरवी येथे एक सुंदर पर्णकुटी बांधली. आजचे काळाराम मंदिर ह्या प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर उभे आहे, असे सांगतात. ह्या मंदिरातील राम हा आत्माराम आहे. त्याच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजवा हात हृदयावर ठेवलेला आहे. ह्याच्या केवळ क्षणमात्र दर्शनाने भाविकांच्या मनाला आध्यात्मिक शांती मिळते आणि त्यांचे मनोविकार शून्य होतात, अशी समजूत आहे. मंदिरासमोर सभामंडपात उभा मारुती आहे. ह्याची मुद्रा दासमारुतीची आहे. प्रभू रामचंद्रांचे चरण आणि मारुतीचे मस्तक हे सरळ रेषेत आहेत. रामनवमी उत्सवात रामदास स्वामी येथे पुराण वाचन करीत असत. रामदास स्वामींना “रघूनायका मागणे हेचि आता” हे पद येथेच सुचले.

सीतागुंफा – राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायर्‍या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायर्‍यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खरी सीता ह्या गुहेत राहिली होती.

नारोशंकर मंदिर – (रामेश्वर मंदिर) सरदार नारोशंकर यांनी १७४७ साली बांधले. मंदिरावर टांगलेली घंटा नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला फिरंग्यांकडून सर केल्यानंतर तिथून ही घंटा नारोशंकरांनी आणली व देवापुढे टांगली. ही घंटा इ.स. १७२१ साली पोर्तुगालमध्ये ओतली असल्याचा उल्लेख आहे. घंटेचा आवाज तीन कोस (१०किलोमीटर) दूरपर्यंत जातो, असे म्हणतात. १९६९ साली गोदावरी नदीला पूर आला त्यावेळी घंटेला पाणी लागले आणि मोठा घंटानाद झाला होता असे सांगतात.

गंगामंदिर – रामकुंडाजवळचे हे मंदिर इ.स. १७०० साली गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले. हे मंदिर बारा वर्षांतून एकदा म्हणजे केवळ सिंहस्थ पर्वात वर्षभर उघडे ठेवतात व इतरवेळी बंद असते.

याशिवाय बालाजी, मुरलीधर, गोराराम, तिळभांडेश्वर, एकमुखी दत्त, निलकंठेश्वर, विठ्ठल, तिळ्या गणपती, मोदकेश्वर आदी बरीच मंदिरे आहेत.

नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचे (जगदंबेचे) मंदिर आहे. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे, अशी मान्यता आहे. बाकीची तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती व माहूरची महाकाली. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात.

सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो.

Check Also

महडचा वरदविनायक

Varadvinayak Mahad महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ …

Leave a Reply